-->
मध्यप्रदेशातील भूकंप

मध्यप्रदेशातील भूकंप

गुरुवार दि. 12 मार्च 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
---------------------------------------------
मध्यप्रदेशातील भूकंप
कॉँग्रेसचे तरुण नेतचे ज्योर्तिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अखेर बंडाचे निशाण फडकावून कॉँग्रेस पक्षाला हादरा दिला आहे. त्यांच्या या बंडामुळे मध्यप्रदेशातील कॉँग्रेसचे काठावर असलेले सरकार अडचणीत आले आहे, खरे तर केव्हाही कोसळेल अशा स्थितीत आहे. त्यामुळे कॉँग्रेसमधील गटबाजी भाजपाला लाभदायक ठरली आहे. 2019 सालची लोकसभा निवडणूक हरल्यापासून शिंदे अस्वस्थ होते. त्यांनी लोकसभेत पराभव झाला असला तरीही विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचा जीव तोडून प्रचार राहूल गांधी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून केला होता. त्यावेळी कॉँग्रेसला निसटते बहुमत मिळाले असले तरीही ज्योर्तिरादित्यांना मुख्यमंत्री होण्याची मनिषा होती. परंतु कॉँग्रेसच्या पक्षश्रेंष्ठींनी कमलनाथ यांच्या बाजूने कौल दिला व शिंदे या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. त्यानंतरही पक्ष त्यांना प्रदेशाध्यक्ष करेल अशी पेक्षा होती. परंतु ती माळ देखील त्यांच्या गळ्यात पडली नाही. आता राज्यसभा खासदारी त्यांना कॉँग्रेसने देऊ केली होती. परंतु त्यापेक्षा भाजपामध्ये गेल्यास खासदारकी व मंत्रीपदाचा लाभ मिळणार तसेच मध्यप्रदेशात पुन्हा सत्ता मिळविल्याने त्यांचे भाजपातील वजन वाढणार होते. सध्या कॉँग्रेसमध्ये राहाणे म्हणजे, विरोधाची कास धरणे हे सूत्र पक्के आहे. त्यापेक्षा सत्तेच्या वर्तुळात राहणे केव्हाही चांगले हे गणित राजेमंडळी बांधण्यात हुशार असतात. कमलनाथ सरकार पाडल्याचे शिंदे यांना जरुर समाधान लाभेल परंतु सध्या जे त्यांच्यासोबत निवडून आलेले आहेत त्यांना पुन्हा निवडून आणण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. अर्थात हे सर्व आखाडे बांधूनच त्यांनी आपली राजकीय समिकरणे जुळविली आहेत. तसे पाहता शिंदे घराणे हे सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रदीर्घ काळ एकनिष्ठ होते. परंतु ज्योर्तिरादित्य शिंदेच्या वडिलांनी माधवरावांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ही सर्व गणिते बदलली. त्यावेळी मुलगा कॉँग्रेसमध्ये तर आई भाजपात अशी स्थिती होती. आता मात्र ज्योर्तिरादित्यांनी भाजपात प्रवेश करुन हे वर्तुळ पूर्ण केले असे म्हणावयास हरकत नाही. ज्योतिरार्दित्य शिंदे यांनी 2001 साली कॉग्रेसचे सदस्यत्व स्विकारले.त्यांनंतर अवघ्या सहा महिन्यातच सन 2002 साली ते प्रथमच कॉग्रेसतर्फे निवडणूक लढून लोकसभेचे खासदार झाले. तेंव्हापासून म्हणजे 2002 पासून सलग 17 वर्ष सन 2019 पर्यंत ते खासदार राहीले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या युपीए 1 आणि 2 मधील मंत्रीमंडळात सन 2004 ते 2014 सलग दहा वर्षे ते केंद्रिय राज्यमंत्री होते. वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री व उर्जा राज्यमंत्री असताना स्वतंत्र कार्यभार त्यांच्याकडे होता. अलिकडच्या काळात राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. राहूल गांदींच्या भोवती जी तरुणांची फळी होती त्यात ते आघाडीवर होते. संसदेतही ते राहुल यांच्या शेजारी ते बसलेले असत. कॉग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यानंतर तरूण खासदारापैंकी राहुल गांधीच्या नंतर त्यांनाच सभागृहात आमंत्रित केले जात असे. शिवाय ते ऑल इंडिया कॉग्रेस कमिटी, कॉग्रेस वर्किंग कमिटी आणि उत्तर प्रदेशातील प्रांत प्रभारी या पदावरही होते. खासदारकीही नाही किंवा मंत्रीपदही नाही असा त्यांच्या राजकीय जीवनातील कालावधी आहे केवळ  8 महिने 17 दिवस! म्हणजे 23 मे 2019 ते 9 मार्च 2020  हा तो कालावधी. कॉग्रेस मे 2014 मधे सत्तेतून पायउतार झाल्यामुळे शिंदे यांना त्यानंतर केंद्रीय मंत्रीपद देऊ शकली नाही हे वास्तव आहे. पण मे 2019 पर्यंत सिंधीया कॉग्रेसचे खासदार होते हेही वास्तव आहे. मागच्या लोकसभेला त्यांचा पराभव झाल्याने ते संसदेतही नव्हते. कॉँग्रेसने तब्बल 17 वर्ष खासदारकी आणि 10 वर्ष केंद्रीय मंत्रीपद अशा प्रदिर्घ कालावधीतील सत्ता, प्रतिष्ठा, सन्मान त्यांना दिला. मात्र केवळ 8 महिने 17 दिवसांच्या कालावधीतील कोणतेच पद नसल्याने ते अस्वस्थ झाले होते. अखेर त्यांनी बंडाचे निशाण फडकाविलेच व गेली 17 वर्षे ज्या विचारसारणीच्या बाजूने होते त्याच्या भिन्न विचारसारणीकडे म्हणजेच केवळ सत्ता संपादनासाठी ते गेले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी त्यांचे जुळत नव्हते. त्यातून त्यांचे अनेकदा वाद होत होते, परंतु त्यांच्यातील वाद मिटवायला केंद्रीय नेतृत्व अपयशी ठरले. मध्यप्रदेशातील राजकारणात हे सर्वात मोठे बंड ठरणार असून त्यामुळे कॉँग्रेसला पुन्हा एकदा विरोधात बसावे लागणार आहे. अशा प्रकारची बंड होणे ही काही नवीन बाब नाही. हिंदु महासभेतून बाहेर पडून शामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ हा स्वत:चा नवीन पक्ष काढला होता पण ते कॉग्रेसमधे सामिल झाले नाहीत. कॉग्रेसमधेही सिंडीकेट, इंडीकेट, संघटना कॉग्रेस, अर्स काँग्रेस, कॉग्रेस (जे), कॉग्रेस(आय) असे गट तयार झाले होते. अगदी प्रणव मुखर्जी, माधवराव शिंदे यांनीही कॉग्रेसमधून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केले होते पण ते विरोधकांत सामील झाले नव्हते. कारण त्यांच्या  बंडाचा आधार पक्ष विधारधारा सोडून वागतोय या आरोपावर होता. भाजपा नेते शंकरसिंग वाघेला यांनी बंड केल्यावर त्यांनीही सर्वप्रथम स्वत:चा पक्ष स्थापन केला होते, नंतर अनेक वर्षांनी ते कॉग्रेसमधे जाऊन पुन्हा स्वगृही आले. आत्ताचे ज्योर्तिरादित्यांचे बंड हे त्या प्रकारातील नाही ते केवळ सत्तासंपादनासाठी आहे.
----------------------------------------------------- 

0 Response to "मध्यप्रदेशातील भूकंप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel