-->
निसर्गाचे बदललेले चक्र...

निसर्गाचे बदललेले चक्र...

रविवार दि. 10 नोव्हेंबर 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
निसर्गाचे बदललेले चक्र...
-----------------------------
गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्रच पार बदलून गेले आहे. कोणत्याच ऋुतूचे आता टाईमटेबल राहिलेले नाही. पूर्वी घडाळ्याच्या काट्याप्रमाणे सर्व ऋुतूंचा कालावधी ठरलेला असायचा. परंतु हे सर्व आता गेल्या काही वर्षात इतिहासजमा होत आहे. पाऊस कधी संपले याचा नेम नाही, तर उन्हाळ्यात किती तापमान पोहोचेल हे कोणी सांगू शकत नाही, थंडीतही कधी नव्हे एवढे तापमान घसरु लागले आहे. एकूणच निसर्गाचे चक्र पार बदलून गेले आहे. आता पर्यावरणवादी म्हणतील की, निसर्गाचा र्‍हास मानवाने सुरु केला आहे, त्यामुळेच हे चक्र बिघडले आहे. हे कारण खरे की खोटे हे काळाच्या ओघात सिध्द होईलही. मात्र सध्याचे बदललेले चक्र सर्वांसाठीच चिंतादायक ठरणारे आहे हे मात्र नक्की. यंदा पावसाने आपला मुक्काम तब्बल पाच महिने ठेऊन सर्वांनाच चकवा दिला आहे. यंदा खरे तर सगळेच अंदाज चुकवत केरळात आठ दिवस विलंबाने पाऊस दाखल झाला होता. मात्र त्यानंतर त्याला काही वेग येत नव्हता, त्याचे रेंगाळणेच वाढले होते. त्यातच अरबी समुद्रात वायू वादळ आले. हे वादळही समुद्रात दक्षिणेकडून वायव्येकडे प्रवास करत राहिले. त्यामुळे मान्सूनची वाटचाल संथ झाली. यंदा पावसाळा फारसा पडणार नाही. अल् निओमुळे पावसाचा प्रभाव कमी होणार असे अंदाज वर्तविले गेले. यातच जून महिना पावसाशिवाय किंवा अल्प पावसात गेला. परंतु या पावसाने मात्र जुलै महिन्यात वेग धरला. मजल दरमजल करत मान्सूनने जुलैअखेर संपूर्ण देश व्यापला आणि मग मात्र हळूहळू वेग धरला. असे असले तरीही महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा येथे दुष्काळाचीच स्थिती होती. त्यामुळे राज्यात काही भागात ओल दुष्काळ तर काही भागात दुष्काळ अशी स्थिती होती. मात्र लवकरच संपूर्ण राज्य पावसाने व्यापल्यावर विदर्भ व मराठवाड्यालाही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. देशव्यापी विचार करता यंदा महाराष्ट्र, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात महापुरांनी थैमान घातले. कुठे अतिवृष्टी, तर कुठे टिपूसही नाही असा नेहमीचा पॅटर्नही काही काळ दिसला. महाराष्ट्राला तर यंदा पावसाच्या रुद्र अवताराने बरेच काही शिकवले. सांगली, कोल्हापुरातील महापूर, मुंबईची दैना, मराठवाड्यातील ओढ, विदर्भाला मिळालेला दिलासा, कोकणातील अतिवृष्टी बरेच काही शिकवून गेली. नेहमीप्रमाणेच या वर्षीही पावसाळ्याचा नेमका अंदाज फारसा कोणाला येऊ शकला नाही. हवामान खात्याने यंदा 96 टक्के, तर स्कायमेटने 93 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहील, या आणि अशा अंदाजांना चुकवत जून ते सप्टेंबर या काळात देशात 110 टक्के पाऊस झाला. आपल्याकडील हवामान खात्याची नेहमीप्रमाणे यंदाही थट्टाच झाली. त्यामुळे आता हवामान खात्यात आमुलाग्र बदल करावे लागणार आहेत. त्यांना जसे आत्याधुनिक करावे लागेल तसेच जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान त्यांना आत्मसात करावे लागणार आहे. त्यासाठी सरकारने तातडीने हालचाली करणे आवश्यक झाले आहे. कोल्हापूर- सांगली तीन दिवस पाण्यात होते, मुंबईत चार ते पाच वेळा पाणी तुंबले. शहराचे नियोजन करताना ज्या अनेक चुका झाल्या त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागले आहेत. मुंबईत 2005 साली आलेल्या पुरातून धडा राज्यकर्त्यांनी काही घेतला नाही. त्यामुळे मुंबई पुन्हा पुराखाली आली. त्यावर आता तरी उपाययोजना केल्या जाणार आहेत किंवा नाही हा सवाल आहे. पूररेषेतील अतिक्रमणे, नाल्यांवरील अवैध बांधकामे ही शहरांतील पुरासाठी कारणीभूत ठरणारी कारणे दूर करणे आपल्याच हाती आहे. हवामान बदल आणि मान्सूनचा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्ती टाळता येत नसली, तरी त्यापासून होणारी हानी टाळण्यासाठी वेळीच उपायही करायला हवे. योग्य नियोजन केले नाही तर आगामी काळात मान्सूनच्या या बदलत्या पॅटर्नमुळे शेती आणि शहरे वाचवणे, हे मोठे आव्हान असेल. वादळ, पूर, अवकाळी पाऊस ही आता नित्याची बाब झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सरकार यंत्रणेनेे दाखविलेली तत्परता, हवामानखात्याचा अचूक अंदाज या सर्व बाबींमुळे मे महिन्यात ओडिसातील फानी वादळाचा यशस्वी मुकाबला केला गेला. राज्य सरकारने सर्व यंत्रणा तेवढ्याच ताकदीने वापरुन नवीन तंत्रज्ञानातचा खरा फायदा जनतेला करुन दिला. यातून आपण एक बोध घेतला पाहिजे तो म्हणजे, गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्यानंतर आपण नवे तंत्रज्ञान अवगत तर केलेच व त्याच उपयोग जनतेला करुन देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. गेल्या 70 वर्षात काय केले असा प्रश्‍न विचारण्यांना लावलेली ही चपराकच आहे. एकीकडे मागास म्हणून हिणविलेल्या ओडिसा या राज्याने ही भरीव कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. एखाद्या विकसीत जगातील देशाप्रमाणे येथे सर्व यंत्रणा हलली व जनतेला या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यात आले. ओडिसा सरकारने तब्बल 15 लाख लोकांचे स्थलांतर केले होते. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचे स्थलांतर करणे ही काही सोपी बाब नाही. पूर्व किनारपट्टीला वादळाचा तडाखा हा वर्षातून एखाद दिवस बसतोच. यावेळी 200 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे हे फानी वादळ म्हणजे भीषणच होते. यातून मोठ्या प्रमाणात जिवीत व मालमत्ता हानी होण्याची शक्यता जास्त असते. ओडिसा हे एक गरीब राज्य असल्यामुळे त्यांच्यासाठी होणारी हानी ही त्यांना फारच आर्थिक फटका पडणारी असते. परंतु या भयानक वादळात ओडिसा ताठ उभा राहिला आहे. ओडिसा राज्याची लोकसंख्या साडेचार कोटी इतकी आणि दरडोई उत्पन्न दिवसाला तीनशे रुपये वा त्याहूनही कमी आहे. अगदी भौगोलिक विचार करता स्पेनच्या आकारमानाएवढे या राज्याचे आकारमान भरते. येथील सर्व अर्थकारण शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकर्‍यांचे या वादळात नुकसान मोठे होण्याची शक्यता. अगदी 90च्या दशकापर्यंत या पूर्वेकडील राज्यात वर्षातून एकदा पूर किंवा वादळ हे ठरलेलेच असायचे. दर वेळी यात हजारो लोक मरायचे. 1999 साली 10 हजारांहून अधिकांचे प्राण घेतले होते आणि कलहंडीसारख्या भूकबळींच्या घटना याच राज्यात घडल्या होत्या. म्हणजे या राज्यात एकतर दुशष्काळ किंवा पूर तरी अशी टोकाची परिस्थिती ओढावलेली असतेच. अशा स्थितीत येथील जनता आपले आयुष्य कंठीत असते. गेल्या काही विध्वंसक चक्रीवादळांच्या तुलनेत या वेळी ओडिसाच्याबळींची संख्या पन्नासच्या आत झाली आहे. एवढे मोठे आलेले राज्यावरील संकट पाहता झालेले नुकसान हे नगण्यच म्हणावे लागेल. राज्याला तब्बल तीन दिवस अगोदर हवामान खात्याने या वादळाची चाहून दिली. तेव्हापासून येथील सर्व यंत्रणा कामी लागली. तब्बल 2 कोटी 60 लाखांहून अधिक एसएमएस संदेश पाठविण्यात आले. 43 हजार स्वयंसेवक यासाठी कामाला लागले. हजारांहून अधिक वैद्यक आणि आणीबाणीच्या सेवेत उपयोगी कार्यकर्ते तैनात ठेवण्यात आले. साधारण 10 हजार मदत छावण्या आणि तेथे नेण्यासाठी असंख्य वाहने ठेवण्यात आली. आत खोल समुद्रात तैनात नौदल नौका आणि मदतकार्यास सज्ज विमानतळ असे हे सर्व चक्रीवादळाच्या सामन्यासाठी तैनात करण्यात आले होता. या सगळ्या यंत्रणांत साधला गेलेला ताळमेळ ही निश्‍चितच आश्‍चर्याची बाब. संकटे माणसास काय शिकवू शकतात याचे हे मूर्तिमंत उदाहरण ठरते. उत्तर खरगपूरच्या आयआयटीच्या संशोधकांनी यापूर्वीच्या वादळांचा अभ्यास करून खरगपूर आयआयटीने या वादळांना तोंड देऊ शकेल अशा पद्धतीच्या इमारती उभ्या करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञान आणि इमारत आराखडे संपूर्ण देशी बनावटीचे आहेत. 1999 सालच्या वादळात जेथील इमारती उद्ध्वस्त झाल्या, तेथेच या नव्या तंत्रज्ञानाने उभ्या राहिलेल्या इमारतींनी ताज्या चक्रीवादळाचा सामना करीत ताठपणाने उभ्या राहिल्या. हे सर्व तंत्रज्ञान देशात विकसीत झालेले आहे, ही आणकी एक अभिमानाची बाब आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवावहरलाल नेहरु यांनी स्थापन केलेल्या आयआयटीसारख्या संस्थांचे महत्त्व आणि त्यांचे द्रष्टेपणदेखील या निमित्ताने देशासमोर आले. गेल्या सात दशकात काँग्रेसने काय केले असा सवाल विचारणार्या विद्यमान पंतप्रधानांना या तंत्रज्ञानाने चांगलीच चपराक लगावली आहे. देशाच्या हवामानखात्याने देखील केलेली ओजस्वी कामगिरी लक्षात घ्यावी लागेल. नवीन तंत्रज्ञानााने आपण आता सज्ज झालो आहेत हेच यातून सांगितले गेले. आपल्याकडे हवामान खात्याची नेहमीच टिंगल टवाळी केली जाते, परंतु आता ओरिसात याच हवामानखात्याच्या इशार्‍यामुळे हजारो जणांचे प्राण वाचविले आहेत. ओडिसाने केलेली ही कामगिरी खरोखीच कौतुकास्पद होती. गेल्या वर्षी 115 वर्षांतील सर्वांत कोरडा सप्टेंबर अनुभवणार्‍या महाराष्ट्रात यंदाचा ऑक्टोबर सर्वांत ओला ठरला. मागच्या वर्षी कसाबसा तीन महिन्यांचा पावसाळा अनुभवल्यानंतर यंदा पाच महिन्यांचा पावसाळा आपल्या वाट्याला आला. या मान्सूनच्या बदलत्या चक्रापासून धडा घेण्याची वेळ आता आली आहे. ज्यावेळी आपल्याकडे पाऊस पडतो त्यावेळी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन त्याची साठवण करुन ठेवण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास कितीही पाऊस पडला तरी दुष्काळ आपल्या पाचवीला पुजलेलाच आहे असे समजावे. आता यंदा देखील पाण्याच्या नियोजनाचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे एवढा पाऊस पडूनही दुष्काळ काही भागात पडलेला दिसेलच. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडूनही ते सर्व पाणी समुद्राला वाहून गेल्याने त्या पाण्याचा काहीच उपयोग होणार नाही. भविष्यात जसे हवामान खाते अत्याधुनिक करावे लागणार आहे तसेच पडणार्‍या प्रत्येक पावसाचा थेंबन थेंब कसा साठवून ठेवता येईल त्याचे नियोजन झाले पाहिजे.

0 Response to "निसर्गाचे बदललेले चक्र..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel