-->
कर्तारपूर मार्ग खुला / स्वेच्छानिवृत्तीसाठी लाईन...

कर्तारपूर मार्ग खुला / स्वेच्छानिवृत्तीसाठी लाईन...

शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
कर्तारपूर मार्ग खुला
शीख भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कर्तारपूर मार्गिकेचे उद्घघाटन आज शनिवारी भारतात होणार आहे. पाकिस्तानातील या गावी शीखांचे प्रथम धर्मगुरू गुरू नानकदेव यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यामुळे हे स्थान शीखांसाठी अतिशय पवित्र आहे. भारतातील शीख भाविकांना कर्तारपूर येथे दर्शनासाठी जाता यावे व त्यासाठी मार्गाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ होती. ती आता पूर्ण झाली असून पंजाब राज्यातून कर्तारपूर येथे जाण्यासाठी 18 किलोमीटर लांबीची मार्गिका भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी त्यांच्या त्यांच्या भागात तयार केली आहे. मार्गिकेच्या उद्घघाटनाच्या निमित्ताने कर्तारपूर येथे जी भित्तीपत्रके लावण्यात आली, त्यावर खलिस्तानी हिंसाचाराचा दिवंगत म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले तसेच अन्य शीख दहशतवाद्यांची छायाचित्रे ठळकपणे होती. यातून पाकिस्तानच्या मनात नेमके काय शिजत आहे, हे या घटनेवरून उघड झाले. ही मार्गिका भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांचा परस्पर संपर्क यावा आणि त्यातून दोन्ही देशांच्या शांततामय सहजीवनाला चालना मिळावी, अशा उदात्त हेतूने तयार करण्यात आली असली तरी यातून उभय देशात चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत असा छुपा हेतूदेखील आहे. या मार्गिकेचा उपयोग पंजाबमध्ये पुन्हा फुटीरवाद, दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्यासाठी केला जाऊ शकतो, हा एक मोठा धोका आहे. याव्दारे भारतातून प्रतिदिन पाकिस्तानात 5 हजार यात्रेकरूंना जाण्याची अनुमती मिळणार आहे. या भाविकांच्या मनात भारताविरोधी भावनेची लागण व्हावी आणि पंबाजमध्ये पुन्हा खलिस्तानी हिंसाचाराचा भडका उडावा, अशी पाकची छुपी इच्छा आहे. त्यासाठीच आता पाक भिंद्रनवालेसारख्या दहशतवाद्यांचा आधार घेत आहे. पंजाब भारतापासून तोडण्याचे प्रयत्न पाकिस्तानने 70 च्या दशकापासून चालविले आहेत. 80 आणि 90 च्या दशकांमध्ये पाकपुरस्कृत फुटीरतावाद व दहशतवाद पंजाबमध्ये उफाळला होता. शेकडो लोकांचे त्यात बळी गेले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बळीही शीख दहशतवादानेच घेतला. परंतु हा हिंसाचार आणि फुटीरतेची भावना रोखण्यात भारताला यश आले. पाकिस्तानला शीख समुदायासंबंधी कोणतीही आपुलकी नाही. पाकिस्तानाचे नागरिक असणा़र्‍या शीखांचे जीवन तेथे सुरक्षित नाही. त्यांच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव नेहमी टाकला जातो. स्वतःच्या देशात शीख समुदायाला अशी अमानुष वागणूक देणारा पाकिस्तान भारतातील शीख समुदायासंबंधी मात्र भलताच पुळका दाखवितो. हे कारस्थान भारत आणि भारतातील शीख समुदाय या दोघांनीही समजून घेणे आवश्यक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि संरक्षण क्षेत्रात पूर्वापारपासून शीख समुदायाचे मोठे योगदान आहे. असा समाज पाकिस्तानच्या डावपेचांना बळी पडणार नाही. असे असले तरीही या समाजातील काही मोजक्या अपवादांना हाताशी धरून पाकिस्तान भारतात गोंधळ आणि रक्तपात घडविण्याचा प्रयत्न करणार हे वास्तव आहे. हा मार्ग खुला करुन भारताने मोठा धोका पत्करला आहे. मात्र यासंबंधी सावधानगी बाळगावी लागणार आहे.
स्वेच्छानिवृत्तीसाठी लाईन...
आर्थिक चणचणीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केल्यावर 70 ते 80 हजार कर्मचारी योजनेत पात्र ठरण्याची शक्यता असून, त्यातून कंपनीला वर्षांला 7,000 कोटी रुपयांच्या वेतन खर्चात बचत शक्य होणार आहे. केवळ दोन दिवसांच्या कालावधीतच बीएसएनएलच्या 22 हजार कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहे. सध्या बीएसएनएलमध्ये 1 लाख 50 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी 1 लाख कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीच्या कक्षेत येतात. अजून जवळपास 77 हजार कर्मचारी या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ही योजना जाहीर झाल्यापासून स्वेच्छानिवृत्तीसाठी लाईनच लागली आहे. सुमारे 70 ते 40 हजार कर्मचारी सेवेतून बाहेर पडतील, अशी अपेक्षा आहेे. ही आजवरची सर्वोत्तम स्वेच्छानिवृत्ती योजना आहे. वयाची 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील बीएसएनलच्या कर्मचार्‍यांना योजनेत सहभाग घेता येणार आहे. या कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदानापोटी मिळणार्‍या रकमेत 25 टक्के अधिक लाभ मिळणार आहे. हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा पाच हप्त्यांत विभागून मिळणार आहे. सेवेत कार्यरत वर्षांच्या 35 दिवसांइतकी आणि शिल्लक राहिलेल्या सेवेच्या वर्षांतील 25 दिवसांचे वेतनाइतकी रक्कम (निवृत्तिवेतन वगळून) सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ज्या कर्मचार्‍यांचे वय 56 वर्षे असेल त्यांना शिल्लक राहिलेल्या चार वर्षांचे वेतन किंवा 40 महिन्यांचे वेतन मिळणार आहे. पेन्शन व रजेबाबतही लागू असलेले भत्ते स्वेच्छानिवृत्ती योजनेत मिळणार आहेत. असा प्रकारे ही सरकारी कंपनी पूर्णपणे रिकामी होणार आहे. त्यानंतर बहुदा या कंपनीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. एवढे कर्मचारी खाली झाल्यावरही ही कंपनी कशी चालणार असा प्रश्‍न आहे. मग एवढी खोगीरभरती या कंपनीत करण्यात आली होती का असाही सवाल आहे. ही कंपनी व्यावसायिक तत्वावर सरकारी हस्तक्षेपाशिवाय चालविल्यास ही कंपनी अन्य कंपन्याशी स्पर्धा करु शकेल. यातच या कंपनीचे उज्वल भवितव्य आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "कर्तारपूर मार्ग खुला / स्वेच्छानिवृत्तीसाठी लाईन..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel