
वरुणराजाची आतुरतेने वाट
दि. 03 मेच्या मोहोरसाठी चिंतन
वरुणराजाची आतुरतेने वाट
यंदा अगदी वेळेत म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच वरुणराजाचे आगमन होण्याची अपेक्षा आहे. पाऊस आता सक्रीय होऊ लागला असून यंदा वेळेत पाऊस येण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यानंतर जूनमध्ये जेमतेम पाऊस असेल तरीही यंदा सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. मात्र अल नियोचे संकट यंदा आहे, असे सध्या तरी दिसते. कोकणातील शेतकरी यंदा वेळेत येणाऱ्या पावसाचे उत्सुकतेने स्वागत करावयास सज्ज असला तरी दोन वर्षापूर्वीच्या चक्रीवादळामुळे त्याच्या मनात काहीशी भीती दडली आहे. या चक्रीवादळातून रायगड जिल्हा आता सावरला असून आजही सरकारने केवळ आश्वासनेच दिली, ठोस नुकसानभरपाई काही दिलीच नाही ही खंत तर शेतकऱ्यांच्या मनात आहेच. चक्रीवादळाने झालेले नुकसान सहन करीत त्याने आता पावसाळा तोंडावर आला असल्याने शेतीची कामे सुरु केली आहेत. भाताचा राब पेरण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्हा झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणानंतर आता भाताचे कोठार राहिले नसले तरी सर्वाधिक भात येथे अजूनही पिकवला जातो. त्यामुळे भाताच्या लागवडीची सर्व पूर्वतयारी आता सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात पहिल्या मोसमी पावसाचा शिडकावा झाल्यावर शेतकरी खऱ्या अर्थाने सुखावेल. यंदा अतिप्रचंड उकाड्ने सर्व जनता हैराण झालेली आहे. जोपर्यंत वरुणराजाचे जोरदार आगमन होत नाही तोपर्यंत यातून दिलासा मिळणार नाही हे नक्कीच आहे. यंदा सरासरीपेक्षा किंचीत कमी पाऊस अपेक्षीत असला तरी फारशी कोणती अन्य संकटे येणार नाही अशी अपेक्षा आहे. हवामान खात्याचा जर यंदाचा चांगला पाऊस होण्याचा अंदाज खरा ठरावा, असे त्याचे मागणे आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या साथीमुळे इतर सर्व कामे ठप्प झालेली असली तरीही शेतकऱ्याला यातून काही आराम नव्हता. शेतीची सर्व कामे याकाळातही सुरुच होती. आता कोरोना जवळजवळ संपुष्टात आल्याने सर्वांना दिलासा मिळालेला आहे. आपल्याकडे अर्ध्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र हे निव्वळ पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे आपल्याकडे किती पाऊस पडतो याला फार महत्व असते. जूनपासून सुरुवात होणा-या संपूर्ण चार महिन्यांच्या हंगामासाठी हवामान खात्याच्या मते पावसाची सरासरी, 96 टक्के आणि 104 टक्केच्या 50 वर्षांच्या सरासरीच्या 104 सेंटीमीटरमध्ये निर्धारित करते. देशभरात वर्षभरात पडणार्या एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस हा येत्या तीन-चार महिन्यात पडत असतो व त्यावरच भारतातील कृषि क्षेत्राचे यश-अपयश अवलंबून असते. विभागवार पाहिले तर पश्चिमोत्तर भारतात मान्सून काळात 9८ टक्के पावसाची शक्यता आहे. मान्सूनचे केंद्र अरबी समुद्रात असणे, हे चांगले चिन्ह नाही. यामुळे मोसमी वारे वायव्य दिशेला जास्त प्रमाणात सरकून, ते देशाच्या पठारी भागापासून दूर जातील. यंदा मध्य भारतातील मराठवाडा, विदर्भ, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याच्याजोडीला यंदा भारताला अल निनोचा परिणाम भोगावा लागेल असे दिसते. अल निओच्या प्रभावामुळे मोसमी वाऱ्याची दिशा बदलते. हमखास पावसाच्या भागात पाऊस पडत नाही, तर पाऊस न पडणाऱ्या भागात मुसळधार पाऊस पडतो. सध्या उष्णतेच्या लाटेने कानपूर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात घामाच्या धारा वाहत आहेत. एप्रिलचा उकाडा सुरु झाला की प्रत्येक जण मान्सूनची वाट पाहू लागतो. यंदा चांगला पाऊस पडू देत अशी हाक बळीराजा देतो. परंतु त्याच्या या हाकेकडे वरुणराजा लक्ष देतोच असे नाही. असा वेळी पावसाच्या अंदाजाचे महत्त्व आणखी वाढते. हवामान खात्यातर्फे दरवर्षी दोन टप्प्यांत मान्सूनचे पूर्वानुमान वर्तवण्यात येते. भारतासारख्या मोसमी हवामानाच्या देशात सर्व अर्थकारण, समाजकारण, राजकारण पावसावर अवलंबून असते. गेल्या दहा-बारा वर्षांत हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरले आहेत. स्कायमेटला तर काही वर्षांपूर्वी अंदाज चुकले म्हणून जाहीर माफी मागावी लागली होती. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहात असून, 50 टक्के लोक रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत़. आपल्याकडे मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून असून त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो़ त्यामुळे मान्सून कसा असणार, याकडे सर्वांचे लक्ष असते़ पावसाचे प्रमाण कितीही असले तरी शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. अर्थात त्याला सरकारी धोरणे जबाबदार आहेत. यंदा देखील चांगला पाऊस अपेक्षित असल्याने व प्रत्यक्षात तसा चांगला पाऊस पडल्यास हे सलग चांगल्या पावसाचे दुसरे वर्ष असेल. त्यामुळे एकूणच शेती क्षेत्राला नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. कोरोनानंतर थबकलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेग घेण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेसह विकसीत जग मंदीच्या छायेत गडद होत असताना भारतात मात्र अर्थव्यवस्थेचे आशादायी चित्र दिसते आहे. अशा वेळी चांगला पावसाळा झाल्यास केवळ शेतकरीच नाही तर सर्वानांच चांगले दिवस येतील. पावसावर आपले बरेच अर्थकारण अवलंबून असते. यंदा चांगला पाऊस पडून सर्व जनता सुखी समाधानी होईल, अशी आशा आपण पावसाच्या आगमनाच्या निमित्ताने व्यक्त करु या.
0 Response to "वरुणराजाची आतुरतेने वाट"
टिप्पणी पोस्ट करा