-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २१ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
लाल बावट्याचे बळ वाढले
---------------------
शेतकरी कामगार पक्षाचे रायगड व मावळ मधील दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने लाल बावट्याची ताकद वाढली आहे. राज ठाकरे हे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. मनसेच्या पाठबळामुळे शेकापच्या उमेदवारांचा विजय आता नक्की असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजयात काही वेगळी समिकरणे बांधली जात असल्याची चर्चा होती. अर्थात राजकीय समिकरणे ही काही एका झटक्यात बांधली जात नाहीत आणि जी राजकीय मोट तडकाफडकी बांधली जाते ती प्रदीर्घ काळ टिकत नाही. त्यामुळे शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन राज ठाकरे यांनी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. यातून भविष्यात काही नवी राजकीय जुळवाजुळव होऊ शकते. अर्थात अशा प्रकारची जुळवाजुळव ही राज्यातील जनतेच्या हिताचीच ठरेल असे म्हणावयास काही हरकत नाही. पूर्वी रायगड हा लोकसभेसाठी एक मतदारसंघ होता. परंतु पुनर्रचनेत त्याची दोन शकले करण्यात आली व त्यातील काही भाग मावळला जोडण्यात आला. तर रायगडच्या मतदारसंघातील काही भाग रत्नागिरीच्या काही विभागास जोडण्यात आला. राज्यकर्त्यांना असे वाटत आले की रायगड मतदारसंघाचे विभाजन केल्याने शेकापचा प्रभाव कमी होईल आणि त्याचा फायदा आपण उठवू सकतो. परंतु झाले मात्र उलटेच. या दोन्ही मतदारसंघात शेकापने दोन तगडे उमेदवार उभेे करुन विरोधकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. अशा प्रकारे विभाजन करुन शेकापला संपविण्याचा केलेला डाव हा सत्ताधार्‍यांच्या चांगलाच आंगलटी येणार आहे. शेकापने यावेळी मावळमधून लक्ष्मण जगताप व रायगडमधून रमेश कदम यांनी उभे करुन लोकसभेत कष्टकर्‍याचे नेते पाठविण्याचे आश्‍वासन या भागातील जनतेला दिले. अर्थात यापूर्वी शेकापने आपले प्रतिनिधी संसदेत पाठविले आहेत. मात्र गेल्या वेळी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने यावेळीही आपल्याला पाठिंबा मिळेल असा शिवसेनेचा अंदाज होता. मात्र यावेळी अन्य कुणालाही पाठिंबा देण्यापेक्षा आपल्या स्वबळावर लोकसभेत आपले दोन उमेदवार पाठविण्याचा निर्धार केला आणि त्यादृष्टीने दोन तगडे उमेदवार जाहीर केले आहेत. मावळमधून खरे तर जगताप भाऊंच्या विरोधात लढावयास कोणीच तयार नाही अशी स्थिती होती. शेवटी राष्ट्रवादीला व शिवसेनेला तेथून उमेदवार शोधून अखेरीस उभा करावा लागला. जगताप यांची जी या भागात ताकद आहे ती पाहता त्यांच्यापुढे उभे असलेले उमेदवार हे अतिशय फिके पडले आहेत. त्यामुळेे लक्ष्मण जगताप यांचा विजय नक्की असल्याचे त्यांचे विरोधकही खासगीत मान्य करतात. जगताप भाऊ हे जनतेत जसे आमदारकीच्या काळात विविध विकास कामे केल्यामुळे लोकप्रिय आहेत तसे ते हायटेक उमेदवार म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी त्यांचे तयार केलेले ऍप असो किंवा व्हॅटस्‌ऍपवर मतदारांना सतत करीत असलेले अपडेट हे मतदारांमध्ये लोकप्रिय झाले आहे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच केवळ मतदारांशी हायटेक पध्दतीने संपर्कात आहेत असा एक सर्वत्र समज आहे. मात्र हा समज जगताप यांनी चुकीचा ठरविला आहे. नरेंद्र मोदींपेक्षा काकणभर जास्तच हायटेक लक्ष्मण जगताप आहेत. त्यामुळेच मावळ व रायगड या दोन्ही मतदारसंघातील शेकापचे दोन्ही उमेदवार तरुणाईच्या अधिक जवळ झपाट्याने पोहोचणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत आणि त्यांची भाषणे तरुणांना आकर्षित करतात. आता शेकापच्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिल्याने तरुणांचे एक मोठे पाठबळ शेकापच्या मागे उभे राहाणार आहे. शेकाप हा पक्ष प्रत्येक क्षेत्रातील लोकांमध्ये, जनमानसात, तरुणांमध्ये रुजला आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना शेकाप हा जवळचा वाटला आहे. रायगड जिल्ह्यात अशा प्रकारे शेकापने घराघरात माणसे जोडलेली आहेत. त्याचा फायदा रमेश कदम यांना होणार आहे. राष्ट्रवादीने आपला उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांना उभे केल्याने त्यांचाच सहकारी असलेला कॉँग्रेस पक्षही नाराज आहे. तटकरे हे सिंचन घोटाळ्यात अडकलेले असल्याने आज ना उद्या त्यांचा लालूप्रसाद यादव होणार आहे. लालूप्रसाद यादव यांना १७ वर्षानंतर अखेरीस चारा घोटाळा प्रकरणी जेलमध्ये जावेच लागले. तटकरे यांचेही असेच होणार आहे. सध्या सत्तेच्या बळावर आपले हे आरोप जेवढे परतून लावता येतील त्याचा प्रयत्न तटकरे करीत आहेत. परंतु हे फार काळ चालणार नाही. त्यामुळे असा भ्रष्ट उमेदवार दिल्याबद्दल रायगडवासियांमध्ये स्पष्टपणे नाराजी आहे. त्याचबरोबर पालकमंत्री या नात्याने त्यांनी जनतेची कोणतीही कामे केलेली नाहीत. आता ते मुंबई-दिल्ली कॉरिडॉरला विरोध करुन शेतकर्‍यांची बाजू घेत आहेत. मात्र पूर्वी मंत्रिमंडळात असताना त्यांनी हा विरोध केला नाही. त्यामुळे तटकरे यांच्यावर कुणीही विश्‍वास ठेवायला तयार नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने असलेली मुस्लिम समजाची नाराजी त्यांना भोवणार आहे. त्यामुळे तटकरे यांच्या परड्यात नाराजी व नकारात्मक बाजूचेच वजन जास्त पडले आहे. खरे तर त्यांना पालकमंत्री या नात्याने भरपूर काम करण्याची संधी होती. परंतु या संधीचा फयदा घेऊन त्यांनी जनतेची कामे करण्याऐवजी  स्वतची तुंबडी भरली आहेत. त्याचा फायदा शेकापचे उमेदवार रमेश कदम यांना मिळेल. शेकापच्या उमेदवारांना मनसेने पाठिंबा दिल्याने लाल बावट्याचे बळ आता वाढले आहे.
------------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel