-->
चंदेरी दुनियेचे वास्तव

चंदेरी दुनियेचे वास्तव

संपादकीय पान मंगळवार दि. ५ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
चंदेरी दुनियेचे वास्तव
चमचमत्या चंदेरी दुनियाचे एक भयाण वास्तव प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने जगापुढे आले आहे. जमशेटपूर या पोलादी शहरातून आलेली प्रत्युषा बालिका बधू या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. परंतु गेल्या वर्षात तिच्याकडे फारशी कामे नव्हती. त्यातून तिच्यातील घुसमट वाढली होती. त्यातच प्रियकरासोबत होणारे वाद यातून तीने आत्महत्येचा मार्ग अवलंबला असावा असे दिसते. गेल्या काही वर्षात अशा प्रकारे या चंदेरी दुनियेतील डझनभर नायिकांनी आपली जीनवयात्रा आत्महत्या करुन संपविली आहे. यातील बहुतांशी नायिका या लहान व मध्यम शहरातून आलेल्या आहेत. त्यांना चंदेरी चमचमत्या दुनियेने खेचून नेले, यश दिले, मात्र हे यश काही सदैव टिकतेच असे नाही, त्यावेळी त्यांच्या मनाने खच खाल्ली. आपल्याभोवतीचे ग्लॅमर संपल्याचे दु:ख हे मोठे असते. या सर्व नायिकांच्या बाबतीत असेच झाले आहे. २०००च्या आसपास लहान व मध्यम आकारातील शहरातून नायिका शोधण्याकडे मालिकातील दिग्दर्शकांचा कल वाढू लागला. यातून मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली या परिसरातील नवीन चेहर्‍यांचा शोध घेतला जाऊ लागला. यासाठी लहान व मध्यम आकारच्या शहरातही टॅलेंट हंट सुरु झाले. चंदेरी दुनियांची सर्वांनाच भुरळ पडलेली असल्याने याकडे अनेक तरुणी आकर्षीत झाल्या. ठिकठिकाणी लहान शहरातही अभियनाचे धडे शिकविण्यासाठी क्लासेस सुरु झाले. भोपाळ, सुरत, दुर्गापूर, जमशेटपूर या शहरातून अनेक मालिकांत तरुण व तरुणी पुढे आल्या. प्रियांका चोप्रा, आर. माधवन, इम्तियाझ अली हे अशाच शहरातून आलेले असल्यामुळे तरुणांपुढे त्यांचा आदर्श ठेवला जाऊ लागला. अभियनासाठी आलेले हे तरुण-तरुणी झपाट्याने सेलिब्रेटींच्या वर्तुळात वावरतात व त्यांच्या भोवती एक भुरळ पडते. एखादी मालिका चांगली चालली की त्यातून हातात पैसे खेळू लागतात. ज्यावेळी चांगले पैसे येतात त्यावेळी जीम, चांगले घर, उंची कपडे, क्लब, पार्ट्या यांचा खर्चाचा सपाटा लागतो आणि या कलाकारांच्या डोळ्यावर एक पट्टी बांधल्यासारखे ते वावरु लागतात. मात्र अनेकांच्या बाबतीत हे ग्लॅमरस जीवन क्षणभंगूर असते. मालिकातील कामचा ओघ कमी झाल्यावर उत्पन्न कमी होते आणि पैशाची तंगी सुरु होते. यातील ६० टक्के कलाकार आपले करिअर संपले असे गृहीत धरुन पुन्हा आपल्या घरी जातात. मात्र ४० टक्के कलाकारांची पुन्हा घरी जाण्याची तयारी नसते, त्यांचा जीवनमरणाचा लढा सुरु होतो. घरात एकटेपणा असल्यामुळे कोणाशी ना कोणशी तरी मैत्रीचे संबंध निर्माण होतात. यातील अनेक बाबतीत अपयशाचा पाढा वाचावा लागल्याने नैराश्य वाढते व आत्महत्या होतात. यासाठी कलाकारांनी चंदेरी दुनियेचे वास्तव लक्षात घेण्याची गरज आहे.
------------------------------------------------------------------------

0 Response to "चंदेरी दुनियेचे वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel