-->
आखाताचे आकर्षण संपले

आखाताचे आकर्षण संपले

संपादकीय पान मंगळवार दि. ५ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आखाताचे आकर्षण संपले
ब्लू कॉलर कष्टकर्‍यांसाठी ८० व ९० च्या दशकात आखातातील नोकरी म्हणजे एक सुवर्णखाणच होती. कारण तेथे चांगला पगार व राहाण्याची सुविधाही उपलब्ध होती. त्यातुलनेत भारतात कामगार, कष्टकर्‍यांसाठी पगार कमीच होते. परंतु आता गेल्या दोन-तीन वर्षात नोकर्‍यांची ही खाण आता आटू लागली आहे. नव्याने नोकर्‍या मिळणे तर दूरच परंतु जुन्या लोकांनांही त्यांच्या नोकर्‍या टिकविणे जड जाऊ लागले आहे. अर्थातच त्याचा मोठा परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. नोकर्‍या सोडून आलेल्यांना भारतात नोकर्‍या कुठे मिळणार व आखातातून जो पैशाचा ओघ येत होता तो आटल्यामुळे आपल्यावर दुहेरी संकट येऊ आतले आहे. युनायटेड अरब अमिरातमधील एक कोटी लोकसंख्येपैकी सुमारे २६ लाख लोकसंख्या ही भारतीय आहे. त्यांच्याकडून देशात येणार्‍या पैशावर अनेक घरे चालतात. अमेरिकेत सबप्राईम घोटाळा २००८ साली उघडकीस आला त्यावेळी खनिज तेलाच्या प्रति बॅरलची किंमत १४५ डॉलर होती. आता ही किंमत ३० डॉलरवर आली असताना आखाताची अर्थव्यवस्थेची पूरती दमछाक झाली आहे. यातून पहिली गदा आली ती नोकरकपातीवर. तेल वायू उत्खनन, वित्तीय, बँकिंग, वाहन, बांधकाम या क्षेत्रातील यु.ए.ई. सौदी अरेबिया, बहारीन, कतार, कुवैत, ओमान या देशातील रोजगार जवळपास थांबला आहे. येथील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात लक्षणीय कपात केली आहे. दुबई ही अनेकांसाठी संधीची खाण अशी समजली जाते. मात्र या दुबईतही आता विविध प्रकारच्या संधी संपुष्टात आल्या आहेत. रुबल व युआनच्या अवमूल्यनामुळे दुबईतील पर्यटनउद्योगावर गदा आली आहे. हॉटेल्सच्या रुम्सची भाडी ४० टक्क्यांनी उतरली आहेत. सर्वाधिक फटका रिअल ईस्टेट उद्योगाला बसला असून गेल्या १० वर्षाच्या तुलनेत किंमतीचा निचांक गाठला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या धंद्यालाही अवकळा आली आहे. यु.ए.ई.मध्ये असलेल्या एकूण भारतीय लोकसंख्येमध्ये ४० टक्के लोक केरळी आहेत. तेथील मंदीमुळे तेथील भारतीयांचा मायदेशी पैसे पाठविण्याचा ओघ कमी झाला आहे. गेल्या वर्षी आखातातून आपल्याकडे ६९.६ अब्ज डॉलर एवढा पैसा आला होता. यंदा हा पैसा ६९ अब्ज डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता आहे. आखातात कष्टाची कामे करणारे लोक हे प्रामुख्याने केरळाच्या खालोखाल आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश या राज्यातील आहेत. हे मजूर जर भारतात परतले तर त्यांना या पगाराएवढा रोजगार देशात मिळणे अशक्यच आहे, मुळातच इकडे कामच मिळणे सध्याच्या स्थितीत कठीण वाटते. एका स्वयंसेवी संघटनेने केलेल्या पाहणीनुसार, ९५ टक्के लोकांना भारतात येऊन नव्याने काम शोधावे लागेल. आखातातील पैशामुळे त्यांची जीनवशैलीही सुधारली आहे. त्यामुळे भारतात ते हालाखीच्या स्थितीत राहू शकत नाहीत. दुबईच्या सरकारने सध्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आखल्या आहेत. तसेच अपारंपारिक उर्जा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. यातून रोजगार निर्मिती झाली तरी मर्यादीत असेल. एकूणच पाहता आखातातील या तणावाचा आपल्या देशावर परिणाम होणार आहे.

0 Response to "आखाताचे आकर्षण संपले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel