-->
गो फर्स्टने दिलेला धडा

गो फर्स्टने दिलेला धडा

दि. 7 मेच्या मोहोरसाठी चिंतन गो फर्स्टने दिलेला धडा
वाडिया उद्योगसमूहाची विमान सेवा उद्योगातील १७ वर्षे जुनी असलेली असलेली कंपनी गो फर्स्ट ने अखेरीस अपेक्षीत अशी दिवाळखोरी जाहीर केली आहे. गेल्या दोनशे वर्षाच्या वाडिया समूहाच्या इतिहासात दिवाळखोरीत निघालेली ही पहिलीच कंपनी ठरली आहे. काहीसे अनपेक्षीत व काहीसे अपेक्षित असेच या घटनेचे वर्णन करावे लागेल. आता जेट एअवेज पाठोपाठ या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे भविष्यही पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे. यातील पायलट व हवाई सुंदरी यांना अन्य विमानसेवेत नोकरी मिळू शकेल परंतु अन्य कर्मचाऱ्यांचे काय होणार असा मुख्य सवाल आहे. सरकार त्यांच्या रक्षणासाठी काही उपाय योजेल का असा प्रश्न भेडसावतो आहे. आपल्याकडे ९१ सालानंतर हवाई क्षेत्र खुले झाल्यानंतर विलीन झालेल्या किंवा दिवाळ्यात निघालेल्या कंपन्यांची संख्या आता तब्बल २७वर गेली आहे. त्यावर हवाईसेवा क्षेत्र किती अस्थिर असते याची पूर्णपणे कल्पना येते. यात सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असो किंवा खासगी उद्योगातील कंपनी त्याचे आर्थिक व व्यवस्थापकीय नियोजन योग्य न केल्यास हा कंपन्या तग धरु शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्याहून सर्वात महत्वाचा संदेश या घटनेतून मिळतो तो म्हणजे, आपल्याकडे खासगी उद्योगांचा उधोउधो करणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की, खासगी क्षेत्रातील कंपन्यांही दिवाळ्यात निघतात केवळ सरकारी कंपन्या तोट्यात जातात असे नव्हे. सुमारे तीन दशकांपूर्वी खासगी विमान कंपन्यांनी आकाशभरारी खुली केली गेल्यापासून, सरासरी एक या दराने दरवर्षी एक कंपनी या व्यवसायातून बाहेर फेकली गेल्याचे आढळून आले आहे. वाडिया समूहाच्या मालकीची आणि आर्थिक संकटाशी सामना करीत असलेली गो फर्स्ट ही कंपनी यातील ताजी भर ठरली. या कंपनीने ऐच्छिक दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला आणि बुधवारपासून तिची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांचा विचार करता याचा सर्वात पहिला मोठा परिणाम म्हणजे अनेक रुटवरील विमान प्रवासाचे भाडे वाढणार आहे. सरकारने खरे तर विमान प्रवासाच्या भाड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, हे देखील या निमित्ताने प्रवाशांना वारंवार पटत आले आहे. ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल्स अँड ट्रेड लिंक लिमिटेड ही १९९४ मध्ये सुरू झालेली देशातील पहिली खासगी विमान कंपनी होती. त्यापूर्वी सरकारी एअर इंडियाची या क्षेत्रात मक्तेदारी होती. जवळपास दोन वर्षांच्या सेवेनंतर, नोव्हेंबर १९९६ मध्ये तिचे कामकाज बंद पडले. त्याच वर्षी, मोदीलुप्त लिमिटेड या दुसऱ्या खासगी कंपनीने देखील गाशा गुंडाळला. विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडला २०१२ मध्ये उड्डाण थांबवण्यास भाग पाडले गेले. त्यापूर्वी २००८ मध्ये, किंगफिशर एअरलाइन्सने देशातील वाजवी दरातील हवाई प्रवासाचे प्रणेती डेक्कन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड (एअर डेक्कन) ही कंपनी विकत घेऊन आपल्यात विलीन करून घेतली होती. एअर कार्निव्हल प्रायव्हेट लिमिटेड, एअर पेगासस प्रायव्हेट लिमिटेड, रेलिगेअर एव्हिएशन लिमिटेड, एअर कोस्टा आणि क्विकजेट कार्गो एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्या २०१७ मध्ये संपुष्टात आल्या. डेक्कन कार्गो अँड एक्सप्रेस लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड (२०१४), आर्यन कार्गो एक्सप्रेस (२०११), पॅरामाउंट एअरवेज (२०१०), एमडीएलआर एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड (२००९), जगसन एअरलाइन्स लिमिटेड (२००८) आणि इंडस एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड (२००७) या क्रमाने बंद पडलेल्या विमानसेवा आहेत. १९९६ मध्ये एनईपीसी मायकॉन लि. आणि स्कायलाइन एनईपीसी लि. (पूर्वीची दमानिया एअरवेज लि.) या दोन कंपन्या १९९७ मध्ये बंद पडल्या. अधिकृत नोंदीनुसार, लुप्तान्सा कार्गो इंडिया प्रा. लिमिटेडने २००० सालामध्ये उड्डाण करणे बंद केले. एके काळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जेट एअरवेजने एप्रिल २०१९ मध्ये ऑपरेशन्स बंद केले. आर्थिक संकटांमुळे खाईत लोटल्या गेलेल्या या कंपनीला आणि दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेद्वारे यशस्वी बोलीदार निश्चित होऊन झपाट्याने मालकी हस्तांतरित केली गेली असली, तरी चार वर्षांहून अधिक काळ बंद पडलेली उड्डाणे पुन्हा सुरु करता आली असती. कर्मचाऱ्यांनी देखील ही कंपनी ताब्यात घेऊन चालविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यातून काही ठोस निघू शकले नाही. त्या आधी, जेट लाइटने (पूर्वाश्रमीची सहारा एअरलाइन्स) २०१९ मध्ये कामकाज बंद केले. तीन हवाई सेवा – झूम एअर नावाने कार्यरत झालेली झेक्सस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड; डेक्कन चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि एअर ओडिशा एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे कामकाज २०२० मध्ये बंद झाले तर हेरिटेज एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडने २०२२ पासून उड्डाणे बंद केली. आपल्याकडील खासगी विमानसेवांचा हा इतिहास पाहिल्यास या उद्योगातील अस्थिरतेचे चित्र स्पष्ट दिसते. आता आपल्याकडे एअर इंडियाचा ताबा सरकारने टाटा समूहाकडे दिला आहे. त्यामुळे या उद्योगात आता लक्षणीय बदल होऊ घातले आहेत. एअर इंडियाने आपली सरकारी मरगळ झटकून नव्याने कामास प्रारंभ केला आहे. त्याचे काही सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसू लागले आहेत. त्यातच आता टाटा समूहाची गुंतवणूक असलेल्या हवाई उद्योगातील कंपन्या व्हिस्टारा व एअर एशिया या नजिकच्या काळात एअर इंडियात विलीन होणार आहेत. तसेच एअर इंडियातील २५ टक्के भांडवल सिंगापूर एअरलाईन्सला देण्यात येईल. त्यामुळे त्यांच्याकडील व्यवस्थापन व नियोजनाचे एक चांगले तंत्र एअरइंडियाला उपलब्ध होईल. सिंगापूर एअरलाईन्स या कंपनीत सिंगापूर सरकारचे बहुतांशी भांडवल आहे, मात्र ही कंपनी कोणत्याही सरकारी ढवळाढवळीशिवाय व्यावसायिकदृष्ट्या चालविली जाते. त्यावरुन आपल्या सरकारने काही धडा घेतला नाही आणि ही कंपनी टाटांच्या गळ्यात घालणे पसंत केले. एअरइंडियाने आता जागतिक दर्जाची उत्कृष्ट विमानसेवा कंपनी करण्यासाठी भविष्यातील पाच वर्षाचा आराखडा तयार केला आहे. यानुसार ते एकूण ८०० नवीन विमाने खरेदी करणार आहेत. टाटा समूहाची ही महत्वाकांक्षी योजना पाहता त्यात ते निश्चितच यशस्वी होतील यात काही शंका नाही. मात्र असे असले तरीही देशातील प्रवाशांची वाढती संख्या पाहता आपल्याकडे लहान व मध्यम आकारातील अजून दोन ते तीन कंपन्या सहजरित्या चालू शकतात. आकासा एअरने हे धाडस केले आहे. अजून कोणते भारतीय उद्योगपती या उद्योगात उतरण्याच धाडस करु शकतील का, असा सवाल आहे.

0 Response to "गो फर्स्टने दिलेला धडा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel