-->
जय जय महाराष्ट्र माझा...

जय जय महाराष्ट्र माझा...

दि. 30 एप्रिलच्या मोहोरसाठी चिंतन
जय जय महाराष्ट्र माझा... उद्या एक मे. जागतिक कामगार दिवस व महाराष्ट्र दिन. महाराष्ट्रातील जनतेने आपले भाषिक राज्य होण्यासाठी जो लढा दिला त्याची फलश्र्रुती या दिवशी झाली त्यामुळे राज्याचा तो स्थापन दिवस. तर आजच्या दिवसाचे आणखी एक महत्व म्हणजे जागतिक कामगार दिन. कामगारांना पूर्वी कामाचे तास ठरवून घेण्यासाठी व आपले हक्क मिळवून घेण्यासाठी रक्त सांडावे लागले होते त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. सध्या बहुतांशी संघटीत कामगारांना आकर्षक वेतन व इतर सवलती मिळतात, जर त्यांनी त्याकाळी संघर्ष केला नसता तर कदाचित आजही अनेक सवलतींना कामगार वंचित राहिले असते. आता कंत्राटी पध्दतीचा स्वीकार करुन कामगारांनी आपले पूर्वी कमविलेले सर्व हक्क केवळ पैसे कमविण्याच्या इर्षेपोटी गमावले आहेत. असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे प्रश्नही तेवढेच अजूनही गंभीर आहेत. गेल्या दोन दशकात आपल्या देशात कामगार चळवळ संपुष्टात आल्यात जमा झाली आहे किंवा कामगारांचे जे संघर्ष होतात ते आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठीच स्थानिक पातळीवर होतात. स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही सत्तरीच्या दशकांपर्यंत कामगारांमध्ये जी राजकीय जाणीव, उर्मी होती ती आता संपली आहे, असे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. स्वातंत्र लढा असो की, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात कामगारांचा मोठा राजकीय सहभाग होता, किंवहून या दोन्ही लढात कामगार व कष्टकरी समुदाय आघाडीवर होता. आता मात्र कामगार चळवळीचे ते दिवस संपले आहेत. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला व राज्याची स्थापना झाली. या स्थापनेमागे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची पार्श्वभूमी होती, मुंबईसह मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी झालेला संघर्ष होता. अखेर ही मागणी दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला मान्य करावी लागली होती. मात्र यासाठी 108 हुतात्मे झाले होते. त्यामुळे मराठी भाषिक राज्याची स्थापना होताना या राज्यात रक्तपात झाला होता, हा इतिहास विसरता येणार नाही. गेल्या सहा दशकाहून जास्त काळात राज्याने अनेक विकासाचे टप्पे पाहिले. एक प्रगत औद्योगिक राज्य म्हणून देशात नावारुपाला आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी औद्योगिक विकासाची पायाभरणी या राज्यात केली त्याचबरोबर राज्यात सहकाराचे बिज रोवले. राज्याची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्य विकासाच्या बाबतीत मागे होते. एक तर देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम तेरा वर्षे झाली होती. त्यामुळे राज्यात विकासाचा श्रीगणेशाच करावा लागणार होता. महाराष्ट्राची सर्वात जमेची बाजू म्हणजे मुंबईसारखे एक मोठे आर्थिक केंद्र असलेले शहर या राज्याची राजधानी होती. त्यावेळी कापड गिरण्या या मुंबईच्या शान होत्या. या गिरण्यातून सोन्याचा धूर निघे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. औद्योगिकीकरणाचा हा पहिला पाया होता. राज्यात रस्त्यासारख्या पायाभूत सुविधा उभारणे ही सर्वात प्रथम गरज होती. त्यानुसार कामे सुरु झाली. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागांच्या विकासासाठी स्थापन झाल्या. रस्ते झाल्यावर दळणवळण सुरु झाले. रस्त्यावरुन एस.टी. धावू लागली आणि राज्याचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली. मुंबई-पुण्यात पहिल्या औद्योगिक टप्प्याचे काम सुरु झाले. सुरुवातीच्या काळात गिरणी कामगारच प्रामुख्याने होता. त्यानंतर याच गिरण्यातून नफा कमवून मालकांनी अन्य उद्योगात प्रवेश केला. उदारीकरण 90 पर्यंत सुरु होईपर्यंत देशातील सरासरी चित्र सारखेच होते. तोपर्यंत मध्यमवर्गाचा जन्म झालेला नव्हता, कडक इस्त्रीचे कपडे घालून जाणारा सेवा क्षेत्रातील कामगार जन्माला यायचा होता. 80च्या दशकात गिरणी कामगारांचा डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली संप झाला आणि गिरणी कामगारांना उतरती कळा लागली त्याचबरोबर टप्प्याने गिरणी धंदाही संपुष्टात आला. गिरणी कामगारांचा हा संघर्ष संपलाच नाही, आजही विविध मार्गाने सुरुच आहे. आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यावर देशातीच सर्वच चित्र पालटायला सुरुवात झाली. इंग्रजी शिकलेल्यांची एक नवी पिढीत जन्माला यायला लागली व उद्योग, व्यवसायाचे स्वरुपही आर्थिक उदारीकरणात बदलू लागले. सेवा क्षेत्रातल्या नवीन नोकऱ्यांची संधी तरुणांना उपलब्ध झाली. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या या तरुणांना या नोकऱ्याच खूपच भावल्या. तसे पाहता सुटाबुटातला तो कामगारच होता, परंतु त्याला कामगार म्हणून घेण्यास लाज वाटू लागली. मध्यमवर्गीयांची एक नवीन पिढी जन्माला आली. त्यांच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला. त्यातूनच प्रत्येकाच्या घरापुढे गाड्या दिसण्याची स्पर्धा लागली. सुरुवातीला मारुती नंतर टप्प्याटप्प्याने गाड्यांचाही दर्जा वाढत जाऊन आता मर्सिडिससारख्या गाड्या अगदी सहजरित्या दिसू लागल्या. पूर्वी मर्सिडिज म्हणजे श्रीमंत वर्गाल्या लोकांची मक्तेदारी असलेली गाडी होती. परंतु जसा जसा महाराष्ट्र प्रगत होत गेला तसे हे चित्र पालटू लागले. औरंगाबादसारख्या औद्योगिकदृष्टा प्रगत शहरात एकाच दिवशी पन्नास मर्सिडिज बुक केल्या गेल्या, हे बदलत्या महाराष्ट्राचे चित्र म्हटले पाहिजे. एकीकडे राज्यात औद्योगिकीकरण होत असताना दुसरीकडे यशवंतरावांनी सहकार क्षेत्र फुलविण्यास सुरुवात केली. सहकार क्षेत्राने राज्यात मोलाची कामगिरी केली. साखर कारखाने हे विकासाचे केंद्र झाले. त्यातून शिक्षणसंस्था, महाविद्यालये, रुग्णालये उभी राहिली. परंतु 90 नंतर राज्यातील चित्र पालटू लागले व सहकारी क्षेत्राला स्वाहाकाराची किड लागू लागली. तोपर्यंत स्वातंत्र्य चळवळीतून उभे राहिलेले नेतृत्वही वृध्दापकाळाकडे झुकत चालले होते. सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराची किड लागली व हे क्षेत्र पूर्णपणे बरबटले गेले. त्यातून सत्तासंघर्ष, व्यक्तीस्तोम हे सर्व ओघाने आले. एकेकाळी ज्या सहकारी साखर कारखानदारीने ग्रामीण विकासाचे सुवर्णयुग पाहिले त्यांना उतरती कळा लागली व हे क्षेत्र दिवाळखोरीच्या उंबरठयावर येऊन ठेपले. जे सहकारी क्षेत्र कॉँग्रेसच्या नेत्यानी फुलविले तेच क्षेत्र त्यांनी पोखरायला सुरुवात केली. यातून बदनामी झाली ती राज्याची. राज्यात औद्योगिकीकरण झापाट्याने झाल्याने एक प्रगत राज्य म्हणून जसे देशात पुढे आले तसेच येथे कामाची संस्कृती त्यातून रुजली. राज्याला 750 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट व चे.एन.पी.टी. ही दोन महत्वाची बंदरे येथे असल्यामुळे व्यापाराचे हे महत्वाचे केंद्र ठरले. असे असले तरीही अजूनही अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीचे विविध प्रश्न, पाण्याचे समान वाटप, दुष्काळ, त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे आज महत्वाचे ठरले आहेत. भविष्यात या प्रश्नांची उलक आपल्याला करावी लागणार आहे. कोरोनानंतर राज्यातील विविध प्रश्नांचे स्वरुप वाढणार आहे. तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम होणार नाही. जय जय महाराष्ट्र माझा अशा घोषणा देणे सोपे आहे, परंतु महाराष्ट्रीय जनतेचे प्रश्न सोडविले जाणे महत्वाचे आहे.

0 Response to "जय जय महाराष्ट्र माझा..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel