-->
पुन्हा एकदा कोरोना

पुन्हा एकदा कोरोना

दि. 23 एप्रिलच्या मोहोरसाठी चिंतन
पुन्हा एकदा कोरोना देशातील उन्हाळा दररोज नवनवा उच्चांकाचा विक्रम करीत असताना तसेच देशात व राज्यातही राजकारण तापले असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. काहीशी भीती परंतु सावध राहाण्यासारखी अशी ही स्थिती आहे. पुन्हा कोरोना नको कारण त्यानंतर लॉकडाऊन येण्याची भीती असे चक्र येऊ नये असे अनेकांना वाटते आणि ते स्वाभाविकच आहे. आता पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता नसली तरीही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून सावध राहाणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षातल्या कोरोनाच्या घटना आठवल्या तरीही अंगावर शहारे उभे राहातात. त्यामुले काही झाले तरी कोरोना पुन्हा नको असेच सर्वांचे म्हणणे आहे. अर्थात दोन वर्षापूर्वी ज्या गतीने कोरोना जगात वाढला तशी स्थिती आता पुन्हा येण्याची शक्यता तरी दिसत नाही. आता आपल्याकडे बहुतांशी जनतेला लशीचा दुसरा डोस दिला गेला आहे. मात्र तिसरा डोस घेण्यात अनेकांनी टाळाटाळ केली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. येत्या काही दिवसात दररोज किमान ५० हजार रुग्ण कोरोनाग्रस्त असतील असा एक अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. नवनवीन होणाऱ्या संशोधनातून कोरोनाबाबत सातत्याने धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. देशभरातील कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाही कोरोना विळखा घालत असल्याचे आता समोर येते आहे. कारण त्यांच्यातील प्रतिकारशक्ती संपुष्टात येउ लागली आहे. तसेच अद्याप ज्यांनी डोस घेतला नाही त्यांना धोका जास्त वाढला आहे. कोरोना लस घेऊनही अनेकांना संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. डॉक्टरांनी ज्यांनी बूस्टर डोस मिळाला आहे त्यांना व्हायरसची लागण झाली नसल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य विभागाने केलेल्या एका पाहाणीत एकूण ७२ रुग्णांचा अहवाल तयार करून तो सी.एम.ओ.कडे पाठवला व त्यात हे स्पष्ट झाले की, ५४ पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये प्रत्येकाला कोविशील्ड किंवा कोवॅक्सीनचे दोन डोस मिळाला होते परंतु तरी देखील त्यांना संसर्ग झाला होता. या ५४ पैकी फक्त दोघांना ओमायक्रॉनच्या लाटेमध्ये लागण झाली होती. या बाधितांना दोन डोस देऊन ९ महिनेच झाले आहेत, तरीही ते कोरोनाच्या विळख्यात आले. डॉक्टरांचा असा दावा आहे की, जे बूस्टर डोस घेतात त्यांना कमी धोका आहे. आतापर्यंत, बूस्टरनंतर संसर्ग झाल्याचे एकही प्रकरण उघडकीस आलेले नाही. डॉ. आर.पी. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी कोरोनाने दोन डोस घेतलेल्यांना देखील विळखा घातला आहे. शासकीय पातळीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईसह देशाच्या विविध भागात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तज्ज्ञाचा आलेला एक अहवाल फारच धक्कादायक आहे. यानुसार, मे महिन्याच्या मध्यात कोरोना भारतात आपल्या शिखरावर असेल. याशिवाय दररोज ५० हजारांहून अधिक केसेस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे भाकीत इतर कोणी केले नसून आय.आय.टी. कानपूरचे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी केले आहे. ज्यांनी गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाच्या वाढीसंबंधी व उतारासंबंधी अचूक आकडेवारी दिली आहे. प्रोफेसर मणिंद्र गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोनाचे भाकीत करतात. प्रोफेसर मणिंद्र यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या आधारे अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी मे महिन्यात भारतात कोरोनाचा कहर होण्याची भीती व्यक्त केली आहे. अंदाजानुसार या काळात दररोज ५० ते ६० हजार केसेस येऊ शकतात. देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये एवढी मोठी वाढ होण्याचे कारण काय असेल? प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांच्या मते, लोकांमधील नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होणे हे यामागील कारण आहे. वास्तविक, जेव्हा संसर्ग होतो तेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पण आता लोकांच्या शरीरातील ही क्षमता पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याच वेळी, नवीन कोरोना प्रकार देखील पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे. ही दोन कारणे कोरोनाच्या वाढत्या वाढीमागील प्रमुख कारणे आहेत. कोरोना ज्यावेळी जोरात होता त्यावेळी लोकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खास प्रयत्न केले होते. आता कोरोना गेल्यावर लोकांचेही प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे पूर्णपमे दुर्लक्ष झाले आहे. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची बाब चिंताजनक आहे, तर दुसरीकडे दिलासा देणारी बाबही आहे. प्रोफेसर अग्रवाल यांच्या मते, याबाबत फार काळजी करण्याची गरज नाही. कोरोनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, परंतु लोकांसाठी ते फारसे घातक ठरणार नाही. याशिवाय मृत्यूची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही कमी राहील, ही सर्वात समाधानकारक बाब आहे. कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात आला असला तरीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोनाचे स्वरुप आता अन्य रोगांप्रमाणे झाले असून त्यामुळे फारशी भीती बाळगण्याचे कारण नाही.

0 Response to "पुन्हा एकदा कोरोना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel