धर्म व धार्मिकतेचे काही जागतिक नित्कर्ष
दि. 09 एप्रिलच्या मोहोरसाठी चिंतन
धर्म व धार्मिकतेचे काही जागतिक नित्कर्ष
गेल्या काही वर्षात आपल्याकडे धर्म मग तो कोणताही असो त्याविषयी जास्त चर्चा होताना दिसते. त्यातल्या त्यात हिंदू व मुस्लिम हे दोन धर्म जास्त चर्चेत आहेत. गेल्या आठ वर्षात भाजपा हिंदुत्वाच्या मुद्यावर सत्तेत आल्यावर धर्म विषयक, त्याच्या कट्टरतेबाबत किंवा कोणता धर्म श्रेष्ठ याविषयी जास्त चर्चा होऊ लागली आहे. प्रत्येक धर्मात जसे कट्टरतावादी असतात तसेच परिवर्तनवादी, सुधारणावादी देखील असतात. आपल्याला हिंदुतच फक्त सुधारणावादी असतात किंवा हिंदु धर्म सर्वसमावेशक आहे सर्वांना सामावून घेतो असे वाटत असते. त्याउलट मुस्लिम धर्मिय हे आपला धर्म पाळण्यात फार कट्टर असतात व त्यांच्या धर्माच्या विरोधात काही बोलणे सहन करीत नाहीत, त्यांच्याकडे निर्धमीपणा बाळगणारे सापडणारच नाहीत, अशी आपल्याकडे एक फार गोड समजूत झाली आहे. परंतु जागतिक पातळीवर विविध धर्माची ज्यावेळी पहाणी झाली त्यावेळी काही लक्षणीय नित्कर्ष पहायला मिळतात. याकडे एक कटाक्ष टाकल्यास आपली विविध धर्मियांबाबतची पूर्वग्रहदुषित मते बदलू शकतात. प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने अनेक देशात विविध प्रश्नांवर सर्वेक्षण केले होते. सर्व धर्मातील स्थिती सांगणाऱ्या सर्वेक्षणापैकी अमेरिकेतील जवळपास २३ ते २४ टक्के मुस्लिमांनी मुस्लिम धर्म सोडला असे या सर्वेक्षणात आढळले आहे. यापैकी २५ टक्के जणांनी सांगितले की, आम्हाला इस्लाम धर्मातील तत्त्वे व्यवहारात योग्य वाटली नाहीत, आमचा देवावर विश्वास नाही, तर १९ टक्के मुस्लिमांनी सांगितले की, दहशतवाद आणि धार्मिक उन्मादपणा आम्हाला मंजूर नाही. २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात २४ टक्के मुस्लिमांनी इस्लामचा त्याग केला. यापैकी ५५ टक्के हे कोणत्याही धर्मामध्ये गेले नाहीत. २२ टक्के ख्रिश्चन बनले. तर उरलेले बुद्ध ,हिंदू, इत्यादी धर्मात गेले. दुसरी गंमतीची बाब अशी की, जवळपास २३ टक्के इतर धर्मीयांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. यापैकी जवळपास २५ टक्के ख्रिश्चन धर्मीय आहेत. म्हणजे इथे धर्मांतरे झाली असली तरी नास्तिक होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. युरोपात तर कोणताच धर्म न मानणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. युरोपच्या एकूण लोकंख्येच्या सुमारे दहा टक्के लोक कोणत्याच धर्माला मानत नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे ही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दुसरे एक सर्वेक्षण विन-गॅलप ने २०१२ मध्ये केले होते. त्यांच्या सर्वेक्षणानुसार, सौदी अरेबियातील ५ टक्के मुस्लिमांनी स्वतःला नास्तिक म्हणून घोषित केले. १९ टक्के लोकांनी स्वतःला निधर्मी म्हणून जाहीर केले. जवळपास २२ टक्के लोकांनी इस्लामवर शंका व्यक्त केली. हा रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाने २०१४ मध्ये नास्तिकता म्हणजे दहशतवाद असा कायदा केला. इराण मध्ये इस्लामच्या अनेक रितीरिवाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नुकतेच तेथे हिजाब विरोधी आंदोलन झाले. गमान नावाची ऑनलाईन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने इराणमध्ये सर्वेक्षण केले. जवळपास ६३टक्के लोकांनी मृत्यूनंतर जीवन असते व हे जग कोणी निर्मात्याने निर्माण केले आहे यावर विश्वास ठेवत नाहीत. येथील ७० टक्के लोकांनी सांगितले की आम्ही जन्नत व जहन्नुमवर विश्वास ठेवत नाही. बहात्तर टक्के लोक हे इस्लाम मधील रितीरिवाज पाळत नाहीत. इस्लाम मध्ये असलेल्या जीन्न नावाच्या चांगल्या 'भुताच्या' संकल्पनेवर ७१ टक्के लोक विश्वास ठेवत नाहीत. २० टक्के मुस्लिमांनी स्वतःला नास्तिक घोषित केले. तर जवळपास ६० ते ७० टक्के लोक हे कयामत का दिन या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाहीत. मध्यपूर्वेतील देशांमधील अरब बॅरोमीटर नावाच्या संस्थेने जवळपास ११ देशांमध्ये एक सर्वेक्षण केले होते. या सर्व देशांची मिळून लोकसंख्या सुमारे ३६ करोड मुस्लिमांची आहे. यापैकी आठ टक्के लोकांनी असे सांगितले होते की, ते निधर्मी आहेत. जेव्हा असाच पाहणी अहवाल २०१८ मध्ये घेण्यात आला तेव्हा जवळपास १३ टक्के मुस्लिमांनी निधर्मीवाद स्वीकारला आहे असे सांगितले. नास्तिकता स्वीकारल्याने समाज हा कमजोर होत नाही तर त्या समाजाची प्रगती होते. कारण प्रत्येक प्रश्न हा चिकित्सा करून हाताळला जातो आणि त्याच्या मागे कोणते तरी दैवी कारण आहे, याला नकार दिला जातो. परंतु जगात इस्लाममध्ये सुधारणेचे प्रमाण कमी असले तरीही तेथे काही प्रमाणात का होईना लोक धर्माच्या पगड्यापासून अलिप्त होत असल्याचे चित्र आहे. प्यू रिसर्च सेंटच्या ३९ देशांच्या सर्वेक्षणानुसार, तुर्की, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या पाच देशांमध्ये विज्ञान आणि इस्लाम यांच्या विषयी प्रश्न विचारण्यात आले होते. यातील जवळपास ३९ टक्के लोकांनी असे सांगितले होते की, विज्ञान आणि इस्लाम यांच्यामध्ये विरोधाभास आहे आणि ते संपूर्ण वेगवेगळे आहेत. यात पाकिस्तानचे जवळपास २७ टक्के मुस्लिम येतात. डार्विनने सिद्ध केलेला उत्क्रांतीवाद हा कुराण आणि इस्लाम यांच्याशी सहमत होऊ शकत नाही. २०१४ मध्ये १४ मुस्लीम देशांमधील एकत्र येऊन तयार केलेल्या सायन्स फाउंडेशन ने एका करारावर सह्या केल्या होत्या व त्यानुसार, त्या देशांमधील शाळांमध्ये उत्क्रांती वाद शिकवण्यास मुभा दिली गेली. या १४ देशांमध्ये पाकिस्तान, इराण, तुर्कस्तान, इंडोनेशिया, सामील आहेत. याशिवाय उत्क्रांतीवादाच्या विज्ञानावर विश्वास ठेवणारे ५० टक्के मुस्लिम आहेत. म्हणजेच मानवाची निर्मिती ही उत्क्रांतीतून झाली असून देवाचा त्याच्याशी काही संबंध नाही असे ते मानतात. भारतात २०१९ आणि २० मध्ये असे सर्वेक्षण झाले होते. यापैकी ७९ टक्के हे इस्लाम कबूल करतात, २ टक्के लोक हे नास्तिक आहेत, तर १८ टक्के लोकांना खात्री नाही. यापैकी सहा टक्के लोक असे मानतात की अल्ला अस्तित्वात नाही. इस्लाम विषयी ज्या समजुती समाजात सर्वदूर नकारात्मक पसरलेल्या आहेत त्याला दहशतवादी कारवाया जबाबदार आहेत. पण त्यामुळे वास्तव लपत नाही. इतर सर्व धर्मातील लोक जसा चिकित्सक विचार करतात तसाच मुस्लीम देखील करतात. जगभरातील अनेक प्रसिद्ध मुस्लीम व्यक्ती या निधर्मी किंवा नास्तिक बनल्या आहेत. या सर्व निरिक्षणांवरुन मुस्लिम समाजात जे धिम्यागतीने बदल होते आहेत ते प्रतिबिंबित होतात. ही एक सकारात्मक बाजू म्हणावी लागेल.
0 Response to "धर्म व धार्मिकतेचे काही जागतिक नित्कर्ष"
टिप्पणी पोस्ट करा