-->
भीतीच्या सावटाखाली...

भीतीच्या सावटाखाली...

भीतीच्या सावटाखाली...


यंदाच्या होळी व रंगपंचमीवर कोरोनामुळे भीतीचे सावट पडले होतेे. कोरोनामुळे सारे जग भयभीत झालेले असताना आपल्याकडे मर्यादीत रुग्ण असले तरीही आपण त्याची खबरदारी योग्यरित्या घेणे योग्यच आहे. त्यामुळे रंगपंचमीवर त्याचे पडसाद उमटणे स्वाभावीकच होतेे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार, कोरोनाचे विषाणू 25 ते 30 डिग्री तापमानात जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे सध्या उष्णता वाढत असताना कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी झाला आहे. मात्र लोकांनी याचा मोठा धसका घेतला आहे. त्यामुळे सर्वात फटका बसला आहे तो पोल्ट्री उद्योगाला. भीतीपोटी लोकांनी कोंबडी खाणे बंद केले आहे. खरे तर चिकन खाण्यात कोणताही धोका नाही असे डॉक्टरांनी सांगितले असले तरीही लोक कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे या उद्योगाचे गेल्या काही दिवसात 500 कोटीहून जास्त नुकसान झाले आहे. कोंबड्याचे दर झपाट्याने घसरले आहेत. तरी कोणी खरेदीदार नाही अशी स्थिती आहे. पालघर येथे पोल्ट्री व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो. तेथे खरेदीदार नसल्यामुळे नऊ लाख अंडी, दीड लाख पिल्लांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील धोका लक्षात घेता अनेक आय.टी. कंपन्यांनी भारतातही आपल्या कर्मचार्‍यांना घरुन काम करण्याची मूभा दिली आहे. आवश्यकता असेल तरच लोक समूहात जाऊ लागले आहेत. अन्यथा लोक घरीच राहाणे पसंत करीत आहेत. परंतु चीन, कोरिया, इराण, इटली, फ्रान्स या देशात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने तेथे कोरोना झपाट्याने पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. जवळजवळ सर्वच आन्तरराष्ट्रीय विमानतळ ओस पडले आहेत. अगदीच अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा असे अनेक देशांनी आपल्या नागरिकांना बजावले आहे. अमेरिकेत न्यूयार्कमध्ये आणीबाणी जारी करण्यात आली आहे. जगातील नेहमी गजबजलेली शहरे सध्या ओस पडलेली दिसतात. अशा स्थितीत जगातील व्यापार, उदीम पूर्णपणे ठप्प होण्याच्या स्थितीत आले आहेत. चीन हा जगाच्या अनेक वस्तूंचा निर्यातदार देश आहे. पंरतु तेथील 18 प्रांन्तामध्ये आणीबाणी लागू करुन कारखाने बंद केल्याने जागतिक निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती तसेच सुटे भाग महागले आहेत. या रोगावरील औषध तयार होण्यास मे महिना उजाडेल असे सांगितले जाते. त्यामुळे रुग्णांना सर्वांपासून वेगळे ठेवणे व सध्या उपलब्ध असलेली औषधे देणे हेच उपाय करावे लागत आहेत. जगाच्या लोकसंख्येची तुलना करता बाधीत रुग्णांची संख्या अगदीच नगण्य असली तरीही 95 देशात हा रोग झपाट्याने फैलावला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सध्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 3600 रुग्ण या रोगाने मरण पावले आहेत. समधानची बाब म्हणजे गेल्या काही दिवसात लागण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे व याने मृत्यू पावलेल्यांची संख्याही घटली आहे. मात्र तरीही हा रोग आटोक्यात आला असे नव्हे. आपल्याकडे देशातही रुग्णांची संख्या 40 च्या घरात पोहोचली आहे. यात काही विदेशी पर्यटक तर विदेशवारी करुन आलेल्या भारतीयांचा समावेश आहे. आपल्याकडे 18 जानेवारीपासून काही निवडक प्रवाशांचे विमानतळावर थर्मल स्कॅनिंग सुरु करण्यात आले. मात्र हे सर्वच प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग सुरु केले असते तर हा प्रसार वाढला नसता. परंतु सध्या सरकारच्या कोणत्याही दोषावर बोट ठेवणे गुन्हा ठरत आहे, त्यामुळे याविषयी आपल्याकडे चर्चाही होत नाही. केरळात तर 2400 संशयीत रुग्ण होते, मात्र तेथील सरकारने त्यांना रुग्णालयात हलविण्यापेक्षा त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेऊन याचा प्रसार आटोक्यात ठेवण्यात यश मिळविले. इटलीने आपल्या लोकंसख्येच्या 25 टक्के लोकांना म्हणजे जवळपास दीड कोटी लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. रोम, मिलान ही पर्यटकांची आकर्षण असलेली शहरे सध्या ओस पडली आहेत. या साथीच्या रोगामुळे सर्वत्रच अर्थव्यवस्थेला खीळ बसली असताना आपल्या देशाच्या विकास दरातही घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र यात एक समाधानची बाब म्हणजे, काळे सोने म्हणून परिचीत असलेले खनिज तेल मात्र घसरु लागले आहे. खनिज तेलाच्या किंमती लवकरच मागणी अभावी 40 डॉलर प्रति बँरल एवढ्या निचांकावर येण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास भारताला सर्वात मोठा फायदा होऊल. कारण आपल्याला एकूण मागणीच्या 83 टक्के खनिज तेल हे यात करावे लागते. असे असले तरी नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांना स्वस्त दराने पेट्रोल डिझेल उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. केवळ खनिज तेलच नव्हे तर जागतिक पातळीवर शेअर बाजाराचे निर्देशांकही कोसळू लागले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या दोन महिन्यात सुमारे सहा हजारांनी कोसळला आहे. त्यातच आपल्याकडे यस बँकेला भ्रष्टाचाररुपी कोरोनाने ग्रासल्याने त्याचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा आपल्याकडे एवढा धोका नाही जेवढा चीनमध्ये आहे, परंतु आपल्याकडे व्हॉटस् अ‍ॅपवरुन ज्या अफवा पसरविल्या जात आहेत त्यामुळे भीतीत भर पडली आहे. या स्थितीत सुधारणा होण्यास काही काळ लागेल. पुन्हा लोक लवकरच चिकनवर ताव मारण्यास सुरुवात करतील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. मात्र त्यासाठी सरकारने वस्तुस्थिती जनतेपुढे मांडून चुकीच्या समजुती दूर केल्या पाहिजेत. 
-------------------------------------------------------

0 Response to "भीतीच्या सावटाखाली..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel