-->
राजकारणाची दिशा बदलणारे निकाल

राजकारणाची दिशा बदलणारे निकाल

दि. 21 मेच्या मोहोरसाठी चिंतन
राजकारणाची दिशा बदलणारे निकाल कर्नाटकातील कॉँग्रेसचा एवढा प्रचंड विजय अनपेक्षीत होता, विजय होणार असे निवडणूकपूर्व निकाल सांगत होतेच परंतु हा विजय एवढा मोठा असेल व भाजपाचा पराभव एवढा दारुण असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. जनतेचा रोष एखाद्या राजकीय पक्षावर असला की त्या पक्षाची कशी दाणादाण उडू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधानांसह अनेक मंत्री या निवडणुकीच्या यशासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न फेल गेले. पंतप्रधानांनी तर मतदारांना मतदान करताना जय बजरंग बली अशी घोषणा देण्याचे आवाहन केले होते. परंतु यावेळी बजरंगबलीने त्यांच्याच डोक्यात गदा हाणली आहे. भाजपाचा हिंदु मतांचे केंद्रीकरण करण्याचा डावही यावेळी कर्नाटकच्या जनतेने हाणून पाडला. १९८९ नंतर एखाद्या पक्षाला एवढ्या मोठ्या संख्यने जागा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी पंतप्रधान मोदी विरुध्द राहूल गांधी अशी लढाई जशी लढली जात होती तसेच स्थानिक प्रश्नांना व त्याच्या जोडीला महागाई, बेकारी यासारख्या देशव्यापी प्रश्नांनाही या निवडणुकीला स्थान मिळाले होते. यात मोदी नापास झाले व ते ज्याची पप्पू बोलून अवहेलना करीत होते ते राहूल गाधीं केवळ पास झाले नाहीत तर त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे. राहूल गांधी यांना कमी लेखून त्यांची सतत अवहेलना करुन त्यांचीच बदनामी भाजपाकडून का केली जात होती त्याचे उत्तर आता मिळाले आहे. भाजपाला खरा धोका हा गांधी घराण्याकडूनच वाटतो. कारण तेच आपल्याविरोधात ठामपणे उभे राहून आपली सत्ता संपवू शकतात हा मोदींचा होरा खरा ठरला आहे. निवडणुकीचे निकाल पाहता राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही सफल झाली असे आता ठामपणे म्हणता येईल. कारण भारत जोडो यात्रा पार पडल्यावर तसेच त्यांची आकसाने खासदारकी रद्द केल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. यात भाजपाचा पार धुव्वा उडाला आहे. कर्नाटकात भाजपच्या केवळ जागाच नाही तर मतेही घटली आहेत. खोटे बोला पण रेटून बोला हे भाजपच सर्वात मोठे टॅलेंट आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर, पराभव झाकण्यासाठी आता भाजपची नेतेमंडळी आमच्या मतांची टक्केवारी घटलेली नाही, हे खोटे पसरवत आहेत. परंतु त्यात काही तथ्य नाही. कर्नाटकमध्ये मतदानाचे प्रामुख्याने सहा मोठे विभाग आहेत. यातील पहिला विभाग मुंबई कर्नाटक म्हणून ओळखला जातो. या विभागात २०१८ च्या निवडणुकीपेक्षा भाजपच्या मतांची टक्केवारी २.८ टक्के इतकी घटली आहे. दुसऱ्या हैदराबाद कर्नाटक या विभागात २०१८ च्या निवडणुकीपेक्षा इथे भाजपच्या मतांची टक्केवारी ३.५ टक्के इतकी घटली आहे. तिसऱ्या महत्वाच्या कोस्टल कर्नाटका या विभागात तर २०१८ च्या निवडणुकीपेक्षा इथे भाजपचा मतांची टक्केवारी ३.१ टक्के इतकी घटली आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे, हा भाजपचा मजबूत गड मानला जातो. चौथ्या सेंट्रल कर्नाटका विभागात २०१८ च्या निवडणुकीपेक्षा इथं भाजपचा मतांची टक्केवारी ४.९ टक्के इतकी घटली आहे. पाचव्या बंगलूरु विभागात मात्र भाजपच्या मतांची टक्केवारी वाढलेली दिसते आहे आणि २०१८ च्या निवडणुकीपेक्षा तिथे काही जागाही भाजपच्या वाढल्या आहेत. तसेच येथून जिंकून येणाऱ्या जागांचे मताधिक्य काही वाढलेले नाही. जयनगर इथला उमेदवार तर केवळ १६ मतांनी विजयी झाला आहे. सहाव्या ओल्ड म्हैसूर रीजन विभागात काही वर्षापासून जेडीएसचे प्राबल्य राहिले आहे. येथे तब्बल ६४ जागा आहेत व हा कर्नाटकातला सर्वात मोठा विभाग म्हणून ओळखला जातो. पण या वेळेला जे.डी.एस.च्या मतात घट झाली आणि ती काँग्रेसकडे वळली आहेत. २०१८ च्या निवडणुकीपेक्षा इथे काँग्रेसला जवळपास सात टक्के मते अधिक मिळली आहेत. पण जेडीएसची काही मते यावेळी भाजपकडेही वळल्याचे दिसते आहे, त्यामुळे इथे भाजपला २ टक्के मते २०१८पेक्षा जास्तीची मिळली आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपला इथे सहा जागा मिळाल्या होत्या आणि ह्या वेळेला भाजपला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागते आहे. त्यामुळे यश मिळाल्यावर मतांच्या टक्केवारीला महत्त्व न देणारा भाजप, पराभव झाल्यावर मात्र मतांच्या टक्केवारीचे कारण देऊन स्वतःची कातडी बचावत आहे. भाजप २०१८ च्या निवडणुकीच्या मतांची टक्केवारी सांगत फिरतोय पण २०१९ ला १७ आमदार विकत घेऊन सरकार स्थापन केले होते. नंतर त्यातल्या १५ जागा त्यांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी वाढली होती. ती सुद्धा ह्या निवडणुकीत कमी झालीय. एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, गेल्या बंडखोरी करुन भाजपाची हातमिळवणी करणाऱ्या १७ बंडखोर आमदारांपैकी केवळ दोनच विजयी झाले आहेत. त्यावरुन महाराष्ट्रातील बंडखोरांनी बोध घेण्याची गरज आहे. गेल्या वेळी लिंगायत समाजाची एकगठ्ठा मते भाजपाला पडली होती. मात्र ती सर्व मते यावेळी कॉँग्रेसला पडली आहेत. कॉँग्रेसच्या ४६ लिंगायत उमेदवारांपैकी ३७ जण विजयी ठरले आहेत. तसेच मागासवर्गियांच्या ५१ जागांपैकी ३९ जागा भाजपा हरला आहे. भाजपासाठी कर्नाटक हे राज्य दक्षिणेचे विजयाचे प्रवेशव्दार होते. आता त्यांना दक्षिणेत आगेकूच करणे कठीण जाणार आहे. येत्या वर्षात छत्तीसगढ, राजस्थान व मध्यप्रदेशात निवडणूक येऊ घातली आहे. कर्नाटकाच्या पराभवाची छाया या निवडणुकीवर निश्चतच पडणार आहे. त्यापाठोपाठ लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जेमतेच एका वर्षावर आल्या आहेत. कॉँग्रेससाठी ही निवडणूक जशी महत्वाची ठरणार आहे. २०१४च्या पराभवानंतर त्यांच्या हाती लागलेला हा सर्वात मोठा विजय आहे. त्याहून आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, गांधी घराण्यातील सर्व जण या प्रचारात उतरलेले असले तरीही त्यांच्याकडे नेतृत्व नव्हते. कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखालील ही पहिलीच निवडणूक होती व त्यांचे ते गृहराज्य होते. त्यात त्यांना लक्षणीय यस लाभल्याने त्यांचे आता पक्षातील वजन निश्चितच वाढले आहे. हळूहळू यातून त्यांच्याकडे पक्षाची सर्व सुत्रे येतील, यात काहीच शंका नाही. कर्नाटकची निवडणूक भारतीय राजकारणातील दिशा बदलणारी ठरते का ते येत्या वर्षात समजेल.

0 Response to "राजकारणाची दिशा बदलणारे निकाल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel