-->
इंदुरीकरांचा माफीनामा

इंदुरीकरांचा माफीनामा

गुरुवार दि. 20 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
इंदुरीकरांचा माफीनामा
आपल्या महाराष्ट्रात संत, किर्तनकार, प्रबोधनकारांची मोठी परंपरा आहे. खरे तर महाराष्ट्राला संतांची भूमी असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. आपल्या शब्दांवर समाजाचा बौद्घिक, सामाजिक आणि वैज्ञानिक स्तरावर समाजप्रबोधन करणारे संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत कबीर, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारात अंधश्रद्घेला कुठेही थारा नसल्याचा इतिहास आहे. आजही या संतांच्या कार्याची आपण महती सांगतो. मात्र नव्याने जन्माला आलेले काही बुवा, किर्तनकार मात्र आपल्या संतांच्या भूमीला छेद दण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवयुगातील बाबा, बुवा आणि महाराजांचे महत्वा वाढत चालले आहे हे खरेच. परंतु त्यांनी आधुनिक काळातील वैज्ञानिक जगताशी सांगड घालत समाजप्रबोधन करावे असे अपेक्षित असताना हेच किर्तनकार आपल्याला दोनशे वर्षे मागे नेत आहेत, याचा खेद वाटतो. प्रसिध्द किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी नुकतेच मुलगा व मुलीच्या जन्मावरुन केलेल्या अशास्त्रीय विधानावरुन ते वादात सापडले. मात्र त्यांचा शहाणपणे एवढाच की, त्यांनी वेळीच आपली चूक ओळखून माफीनामा सादर केला. इंदुरीकरांनी एक पत्रक जारी करून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले आहे. समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षांच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंग्रह, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध जाचक रुढी परंपरा इत्यादी विषयांवर मी भर दिला. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी. असे त्यांनी या पत्रकामध्ये नमूद केले आहे. वारकरी सांप्रदायातील असलेल्या इंदुरीकरांकडून अशा प्रकारच्या वक्तयव्याची अपेक्षा नव्हती. नेमके काय म्हणाले होते हे, किर्तनकार? तर बाबांनी आपल्या कीर्तनामध्ये मुलगा होण्यासाठी काय करावे आणि मुलगी कशी होते याचा कथित फॉर्मुला सांगितला होता. स्त्री संगम सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते. याच विधानावरून राज्यभरात त्यांच्यावर टीका सुरु झाली. तसे होणे ही स्वाभाविकच होते. कारण त्यांनी मांडलेला हा फॉम्युला काही विज्ञानाशी काही सुसंगत नाही. बरे यामुळे अंधश्रध्देलाही कपपाणी घातले जाऊ शकते. परंतु सध्या विज्ञानवादी विचार करुन निर्णय घेणारे लोक दुर्दैवाने कमी झाल्याने केवळ भावनिकपणे विचार करीत त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यात वारकरी साप्रदायाचाही समावेश होता. खरे तर या सांप्रदायातील लोकांनी आपल्या सांप्रदायातील विचारांचा अभ्यास केल्यास त्यांच्याशीच विसंगत महाराज बोलले आहेत हे ओळखावयास पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. इंदुरीकरांचे भाजपानेही समर्थन केले, सध्या सत्ता गेल्याने त्यांना काही करुन पुन्हा सत्ता मिळवायची असल्याने बेभान झालेले भाजपावाले आपण कोणत्या गोष्टीचे समर्थन करीत आहोत हे तपासण्यासही विसरले. इंदुरीकरांवर टीका करणारे आणि त्यांचे समर्थन करणारे असे दोन वर्ग तयार झाले होते. वाढता वाद पाहता त्यांनी यानंतर झालेल्या आपल्या कीर्तनामध्ये कीर्तन सोडून शेती करण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती. मात्र अखेरीस आपल्यावर हे बालंट उलटू शकते याची कल्पना आल्यावर त्यांनी इंदुरीकर महाराजांनी माफीनामा सादर करुन आपल्यातील संतप्रवृत्तीच दर्शन घडविले. माझ्या बागेतील आंबा खाल्याने मुलगा होतो असे छातीठोकपणे दावा करणारे, विज्ञानाचे पधवीधर असल्याचे सांगणारे भिडे गुरुजी यांनी देखील इंदुरीकरांना पाठिंबा दर्शविला. इंदुरीकर महाराज सध्या तरुणांमध्ये फार लोकप्रिय आहेत, कारण त्यांची अनेक मर्मविनोदातील किर्तने युट्यूबवर फार लोकप्रिय झाली आहेत. एकेकाळी पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या गेलेल्या अहमदनगरमधील इंदुरीकर महाराज रोखठोक बोलण्यात प्रसिद्घ आहेत. पण, आपण बोलताना त्यात कोणत्याही गोष्टीचा विपर्यास्त होऊ नये याचे बंधन त्यांनी स्वत: वर घालून घेणे गरजेचे होते. सामान्य माणसाला समजावण्यासाठी दैववाद नव्हे तर विज्ञानवाद हे आजही संतांच्या प्रत्येक अभंगांचा अर्थबोध लावून आजही सांगितले जाते. मात्र इंदुरीकर महाराज यांनी टाळ्याखाऊ वक्तव्य करण्याच्या नादात आपला तोल ढळू देता कामा नये होता, पण अखेर तसेच झाले. संतप्रवृत्तीच्या लोकांनी समाजात मिसळताना किंवा समाजप्रबोधन करताना आपल्या प्रत्येक विधानाचा योग्य अर्थ समजावून जनतेच्या हिताचेच सांगितले पाहिजे. त्यातून कोणताही गोंधळ उडणार नाही किंवा त्यामुळे समाजात अंधश्रध्दा फैलावणार नाही याची जबाबदारी घेतली गेली पाहिजे. महाराष्ट्राची जनता कीर्तनपरंपरा, वारकरी संपद्राय या संस्कृतीचा घटक आहेेत. आपण आपले पुरोगामीत्व, पुढारलेपण यातूनच प्रतिबिंबीत करीत यशस्वीरित्या वाटचाल केली आहे. आपल्याकडे कोणत्याही संतांनी अंधश्रद्घेचे डोस आपल्या कीर्तनातून समाजाला पाजले नाहीत. परंतु गेल्या काही वर्षात दुर्दैवाने आपल्याकडे उलटी गंगा वाहू लागली आहे. अनेक राजकारण्यांनी सत्तेच्या हव्यासापोटी त्याला खतपाणीही घातले आहे. परंतु ही स्थिती काही कायम राहाणार नाही, याबाबत आपण आशावादी राहावे. महाराष्ट्रभरात सप्ते, पारायणे, कीर्तने आज मोठ्या प्रमाणावर सामाजिक अभिसरणाचे काम करतात. दहा भाषणांपेक्षा कीर्तनाची भाषा माणसाचे अधिक प्रबोधन करते. आपल्याकडे फुले, शाहू, आंबेडकांराची विचारधारा कायम टिकविण्याची जबाबदारी आता तरुणांवर आली आहे. इंदुरीकरांच्या माफीनाम्याने आता या गोष्टीवर पडदा पाडला जावा.
-----------------------------------------------------------

0 Response to "इंदुरीकरांचा माफीनामा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel