-->
रयतेचा राजा

रयतेचा राजा

बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
रयतेचा राजा
रयतेचा राजा म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, त्यांनी आपल्या रयतेला सुखा समाधानाने नांदू दिले, महिलांना इज्जतीने राहाण्याचे अभय दिले, महाराजांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार होते हा इतिहास महाराजांचे मोठेपण दाखवितो. परंतु आज आपण महाराजांचा इतिहास दाखविताना तो हिंदू राजा असल्याचे दाखवितो, हे चुकीचे आहे. त्याकाळी धर्मनिष्ठा नव्हे तर राजनिष्ठेला महत्व दिले गेले. शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केले तो काळ सरंजामशाहीचा होता. राजेशाही आजच्या काळात कालबाह्य झाली असली तरीही शिवाजी महाराजांचे कौतुक आजही सुमारे 400 वर्षानंतर होते. याचे महत्वाचे कारण म्हणजे शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. जनतेला ते आपलेसे वाटे. महाराजांना हे राज्य काही वारसा हक्काने मिळाले नव्हते तर त्यांनी ते लढवून मिळविले होते. त्यासाठी त्यांच्या सोबतीने अनेकांनी बलिदान दिले होते. यात केवळ एकाच धर्माचे नव्हते तर सर्व धर्माचे जातीचे लोक होते. बहुसंख्य जनतेला राजांचे राज्य हे आपले वाटत होते म्हणूनच त्याचे महत्व. रयतेच्या या राज्याच्या स्थापनेत सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. त्याकाळी राजा कुणी असला कोणत्यादी धर्माचा होता त्याचे जनतेला काहीच देणेघेण नसे, कारण त्यांच्या जीवनात कोणताच फरक पडत नसे. राजे बदलले तरी कुलकर्णी, पाटील, देशमुख, जाहागीरदार, वतनदार तेच असत. व हे सारे जनतेची लूट करीत असत. त्यांच्या लुटीतील काही भाग ते राज्यांना नेऊन देऊन आपले स्थान बळकट करीत असत. त्यामुळे राजा कोणही असला तरीही ही सर्व यंत्रणा तीच असे. राजाला जनतेशी काहीच देणे घेणे नसायचे तसेच वतनदारही जनतेशी कसे वागतात याचे राजाला काही देणे घेणे नसायचे. परंतु शिवाजी महाराजांनी या सर्व यंत्रणेतच बदल केले. वतनदार हे मालक नसून नोकर आहेत हे सुत्र महाराजांनी मांडले. राजाचा सर्वात प्रथम जनतेचा थेट संपर्क आला. राजांशी थेट जनता भेटू शकत होती. एकाद्या वतनदाराने चुकीचे कृत्य केले तर त्याला शिक्षा होऊ लागली, महाराजांच्या या कृत्यामुळे जनतेत विश्‍वास संपादन झाला व हा राजा आपलाच आहे हे पटू लागले. शिवाजी महाराज व अन्य राज्यांमध्ये हाच मोठा फरक होता. काही ठिकाणी उध्दस्थ झाली गावे महाराजांनी वसवली, शेतकर्‍यांना कसायला बी दिले, नांगर दिले. नवीन लागवडीखाली आणलेल्या जमिनीखालील शेतसारा पहिली पाच वर्षे कमी ठेवला. जमिनीचा सारा निश्‍चित केला. त्यापेक्षा जास्त वसुल करण्यास मनाई होती. दुष्काळात शेतसारा माफ केला जाई. वतनदारी, जमीनदारी मोडीत काढली. त्यामुळे रयत सुखी झाली. त्याकाळी महिलांच्या इज्जतीला काहीच किंमत नव्हती. मात्र महाराजांनी महिलांच्या इज्जतीला प्राधान्य दिले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, एका पाटलाने तरुण पोरीला पळवून तिची इज्जत लुटली. महाराजांनी त्याला कठोर शासन केले. यामुळे असा प्रकारे कृत्य करणार्‍यांमध्ये जरब बसलीच तसेच जनतेमध्ये विश्‍वास निर्माण झाला. सकुजी गायकवाड या एका सेनापतीने बेळवाडीच्या किल्लयाला वेढा दिला होता. तेथील किल्लेदार स्त्री होती. 27 दिवस तिने किल्ला लढविला. मात्र नंतर हा किल्ला जिंकल्यावर सकुजीने त्या स्त्रीवर बलात्कार केला. महाराजांनी सकुजीला कडक शिक्षा ठोठावली. त्याचे डोळे काढून आजन्म कारावास दिला. सेनापती कितीही शूर असो त्याने केलेल्या गंभीर गुन्ह्यालाही माफी नसे. तशीच कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेचा केलेला सन्मान सर्वश्रुत आहेच. अशा प्रकारे राज्यांच्या काळात महिलांना मान सन्मान मिळाला. लढायात किंवा लूट करताना कोणत्याही धर्माच्या स्त्रीची अब्रु लुटता कामा नये, अशी शिवाजी महाराजांची सक्त ताकीद असे. जो याचे उल्लंघन करी त्याला कठोर शिक्षेस सामोरे जावे लागेल. सैन्याला बेभानपणे वागण्यास मुभा नव्हती. उभ्या पिकातून सैन्य नेण्यास मज्जाव होता. सैन्याच्या जेवणापासूनचा सर्व खर्च रोख रकमेतून करण्याचा नियम होता. त्यापूर्वी ज्या गावात सैन्य उतरे तेथील पाटील, देशमुख यांच्याकडे ही जबाबदारी होती. महाराजांच्या या अशा अनेक पुरोगामी निर्णयामुळे रयत, स्त्रीया त्यांच्यावर खूष होत्या. त्यांना हा राजा आपला वाटे. पूर्वी राजे लूटीतला वाटा सैन्याला देत असत. मात्र शिवाजी महाराजांनी हे थांबवून सैन्याला रितसर पगार सुरु केला व लूटलेला खजिना दरबारी जमा करण्याची पद्दत सुरु केली. त्यामुळे महाराजांचे सैन्य हे जनतेला लूटमार करणारे सैन्य वाटत नसे. महाराजांचा आणखी एक क्रांतीकारी निर्णय म्हणजे कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्री ला गुलाम म्हणून खरेदी करता येणार नाही. त्याकाळी ही प्रथा सर्रास होती, मात्र त्याला चाप लागला गेला. शिवाजी महाराज हे हिंदू होते हे बरोबर परंतु त्यांनी इतर कोणत्याच धर्माच्या विरोधात काम केले नाही. त्यांच्याकडे अनेक मुस्लिम सरदार मोठ्या निष्ठेने काम करीत होते. तसेच त्याकाळात अनेक मुस्लिम राजांकडेही हिंदू सरदार होते. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिमखान हा मुस्लिम होता. आरमार विभागाचा प्रमुख दौलतखान हा देखील मुसलमान होता. महाराजांचा विश्‍वासू अंगरक्षक मदारी म्हेतर याने आग्राह्ून सुटका करताना महत्वाची भूमिका बजावली होती. महारााजंच्या पदरी असे अनेक मुसलमान होते. काजी हैदर हा त्यातील एक होता. सालोटीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या अधिकार्‍याने शिवाजी महाराजांशी जवळीक साधण्यासाठी एक हिंदू ब्राह्मण वकिल महाराजांच्या दरबारी पाठविला होता. तर महाराजांनी हैदरला आपला वकिल म्हणून औरंगजेबाकडे पाठविले होते. सिध्दी हिलास हा असाच एक लढवय्या मुस्लिम होता. पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेढा दिल्यावर हिलासने महाराजांच्या बाजूने लढाईत आपला प्राण दिला होता. शिवाजी महाराजांकडे सरदार तसेच सैन्य हे केवळ हिंदू होते अशी आपली चुकीची समजूत आहे. अनेक मुस्लिम होते. त्याकाळी प्रश्‍न धर्माचा नव्हता तर राज्याचा होता, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याकाळी धर्मनिष्ठा महत्वाची नव्हती तर राजनिष्ठा व स्वामिनिष्ठा महत्वाची होती. मुस्लिम राज्याच्या पदरी देखील अनेक हिंदू सरदार होते. शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या आदिलशाहीच्या पदरी सरदार होते. शहाजी राजांचे सासरे लखुजी जाधव निझामशाहीचे मनसबदार होते. जावळीचे मोरे, फलटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेमसावंत, शृगारीचे सूर्यकांत शृंगारपुरे हे आदिलशाहीचे मनसबदार होते. अकबराच्या पदरी असणार्‍या हिंदू सरदारांचे प्रमाण 22 टक्के होते. औरंगजेबाच्या पदरी असलेल्या एकूण मनसबदारांमध्ये हिंदू 30 टक्क्यांच्या वर होते. अनेकदा हिंदू विरुध्द हिंदू किंवा मुसलमानांविरुध्द मुसलमान लढले आहेत. त्यावेळी धर्माधिष्ठीत लढाई नव्हती तर ती राज निष्ठेवर आधारित होती. शिवाजी महारााजांना अनेकवेळा हिंदू सरदार व राज्याशी लढाया कराव्या लागल्या, हा इतिहास आज पद्दतशीरपणे विसरला जातो. महाराजांचा हा इतिहास जनतेपुढे आज येण्याची गरज आहे. त्याकाळी हिंदू विरुध्द मुस्लिम अशी लढाई असल्याचे खोटे चित्र रंगवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. शिवाजी महाराजांनी जो आदर्श त्याकाळी मांडला त्याची आज आधुनिक काळातही गरज आहे. शिवाजी महाराजांचे हे विचार आत्मसाद करण्याची आज गरज आहे.
-------------------------------------------------------------- 

0 Response to "रयतेचा राजा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel