-->
संपादकीय पान मंगळवार दि. २० मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
जय-पराजयानंतर...
----------------------------------------
भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेच्या काठी जाऊन तेथे गंगा आरती केल्याने भविष्यातील राजकीय वातावरण हिंदुत्वाच्या दिशेने झुकणारे असेल असे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुचविले आहे. परंतु त्यांना अशा प्रकारे बहुसमुदाय असलेल्या या देशाचे नेतृत्व करताना सर्व समाज घटकांना बरोबर घेऊनच जावे लागणार आहे. भएाजपाला स्पष्ट बहुत मिळाले आहे ही बाब मान्य मात्र देशातील ८२ कोटी मतदारांपैकी भाजपाच्या पाठीशी सुमारे १७ कोटी सोळा लाख मतदार म्हणजे एकूण मतदानाच्या ३१ टक्के मतदार उभे राहिले. तर कॉंग्रेसला देशातील १० कोटी ७० लाख मतदारांचा पाठिंबा मिळाला. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला एकूण ३५ टक्के मतदारांचा पाठिंबा लाभला असला तरी उर्वरित ६० टक्क्‌यांहून अधिक मतदान केलेल्या मतदारांनी भाजप वा एनडीएला नाकारले हे तथ्यही विसरून चालणार नाही.  लोकसभेत कॉंग्रेसचे ४४ सदस्य निवडले गेलेे.  कॉँग्रेससाठी एवढ्या कमी संख्येने सदस्य असणे हा एक त्यांना मोठा धक्का होता. या निकालाने उत्तर प्रदेशात मायावतींच्या बसपाचा धुव्वा उडाला. मागच्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला २० जागा मिळाल्या होत्या, तर ४७ जागांवर हा पक्ष दुसर्‍या क्रमांकावर होता. मात्र या निवडणुकीत हा पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही आणि केवळ ३४ जागांवर दुसरा क्रमांक गाठू शकला. ८० जागा असलेल्या उत्तरप्रदेशात १९८४ साली स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच अशी दारुण कामगिरी पक्षाची झाली. मायावती-मुलायम मिळून उत्तर प्रदेशात भाजपला रोखतील, ही अपेक्षा फोल ठरली. दलित-बहुजन समाजात जनाधार असलेल्या बसपाचा हा पराभव या पक्षाच्या अस्तित्वावर व विद्यमान धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. बसपाने या निवडणुकीत २१ ब्राह्मण आणि १९ मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले होते. गेल्या वेळी ब्राह्मण, दलित, मुस्लिम अशी मोट बांधून मायावतींनी राज्यात एक नवीन समिकरण तयार केले होते. हाथी नही गणेश हैं आणि सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय ही घोषणा या पक्षाचा आधारस्तंभ असलेल्या आंबेडकरी मतदारांच्या जिव्हारी लागली होती. त्यात मायावतींचा कारभार एखाद्या लहरी राणीप्रमाणे होता. पक्षाचा कार्यकर्ता असो की सामान्य जनता, यांच्याशी त्यांचा थेट संपर्कच उरला नाही. त्यांचा संदेश, आदेश तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाच नाही. पारंपरिक असोत की सोशल मीडिया, या दोन्ही आघाड्यांवर मायावतींचे काहीच व्यवस्थापन नव्हते. उत्तर भारतात भाजप कमजोर झाल्याने या पक्षाचा पारंपरिक मतदार असलेला ब्राह्मण समाज हा बसपाकडे वळला होता. मात्र या निवडणुकीत आपल्या हक्काचा पक्ष चांगल्या स्थितीत दिसताच ब्राह्मण व सवर्ण समाजाने बसपाकडे पाठ दाखवून भाजपला मतदान केले. या पराभवामुळे मायावतींना पुन्हा एकदा बहुजन हितायचा नारा देत आपल्या वागण्यातील एककल्लीपणा थांबवावा लागेल, हे स्पष्ट आहे. निवडणुकीच्या आघाड्या करताना जातीपाती लक्षात ठेवूनच मोदींनी खेळी केल्या. बिहारमध्ये रामविलास पासवान, उत्तर प्रदेशात अपना दल, महाराष्ट्रात रामदास आठवले, आंध्रात कम्मा समाजाचा पाठिंबा लाभलेला चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम पक्ष यांच्याशी करण्यात आलेली आघाडी असो की आंध्रात २७ टक्के लोकसंख्या असलेल्या कापू समाजाचे लोकप्रिय अभिनेते के. पवन कल्याण यांना भाजप-तेलगू देसमचा प्रचार करण्यासाठी मोदींनी घातलेली गळ असो अथवा महाराष्ट्रात मराठा समाजाच्या उमेदवारांना देण्यात आलेले प्राधान्य आणि ब्राह्मण नितीन गडकरींऐवजी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे राज्याच्या निवडणुकीची देण्यात आलेली सूत्रे, यावरून या निकालात जातपात महत्त्वाची ठरली. एवढेच नव्हे तर आजवर केवळ ब्राह्मण वा व्यापार्‍यांंचा पक्ष मानल्या गेलेल्या भाजपने पहिल्यांदाच तेली समाजात जन्मलेल्या व ओबीसी असलेल्या मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले.  बसपा, सपा, जनता दल (युनायटेड), राजद यांच्या पारंपरिक ओबीसी मतपेढीला सुरुंग लावणे भाजपला शक्य झाले. दक्षिणेत कर्नाटकात येदियुरप्पा हे भाजपत परतल्याने विधानसभा निवडणुकीप्रमाणे लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पडझड वाचली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या राज्यात भाजपच्या दोन जागा कमीच झाल्या. आंध्रात तेलगू देसम पक्षाशी आघाडी केल्याने ४२ पैकी तीन जागा भाजपला जिंकता आल्या. तामिळनाडूत केवळ जयललिता लाट होती, त्यामुळे ३९ पैकी ३७ जागांवर अद्रमुक पक्ष विजयी झाला. केरळात अपेक्षेप्रमाणे २० पैकी १२ जागा कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या. मनमोहनसिंग सरकारमध्ये मंत्री असलेले सर्वच नेते या राज्यात विजयी झाले. दक्षिणेतील हे चित्र पाहता देशभर मोदींची लाट होती, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेशात मात्र सर्वाधिक पाठिंबा मोदींना लाभला. पंजाबात सुमार कामगिरी तर पश्चिम बंगाल, आसाम व  ईशान्य भारतात भाजपचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे पश्चिम-उत्तर भारतात कथित मोदी लाट जाणवली तरी पूर्व-दक्षिण भारतात मात्र ही लाट प्रभावी ठरली नाही हे सिद्ध होते. कॉँग्रेसविरोधी देशात आलेली पहिली लाट ही आणीबाणीनंतरची होती आणि ती देशव्यापी होती. त्यातही जसंघाच्या रुपाने संघ होता. संघाच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्यावरुन वाद झाले आणि जनता पार्टी फुटली. बाबरी मशिद पाडल्यानंतर भाजपाच्या आघाडी सरकारचा प्रयोग झाला. परंतु लोकांनी २००४ साली पुन्हा कॉँग्रेसच्या बाजूने कौल दिला. आता मात्र दहा वर्षांनी भाजपाला स्वबळावर सत्ता बहाल केली आहे. आता याचा उपयोग जनतेसाठी नेमका करण्यात भाजपा कितपत यशस्वी होते ते पहायचे.
----------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel