-->
संपादकीय पान शनिवार दि. २० डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
इस्रोचे एतिहासिक यश
भारतीय संशोधन संस्था इस्रोने सुमारे चार टन वजन अवकाश नेऊ शकणार्‍या जीएसएलव्ही मार्क-३ या प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी घेत आपले बौद्धिक कौशल्य जगापुढे ठेवले. अंतराळ संशोधनात आपण जागतिक पातळीवर विकसीत देशांच्या मांडीला मांडी लावून बसू शकतो हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.  इस्रोच्या देदीप्यमान कारकीर्दीतला एक ऐतिहासिक टप्पा ठरावा. इस्रोने या आधीच पीएसएलव्ही व जीएसएलव्ही प्रक्षेपकांच्या साहाय्याने अवकाशात कमी वजनाचे उपग्रह पाठवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते व त्याचा व्यावसायिक स्तरावर उपयोगही सुरू केला होता; पण चार टन वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्याचे तंत्रज्ञान इस्रोकडे नव्हते. हे तंत्रज्ञान इस्रोने आता आत्मसात केले आहे. गुरुवारी इस्रोने केलेल्या चाचणीत स्वदेशी बनावटीचा जीएसएलव्ही मार्क-३ हा प्रक्षेपक व त्याच्या सोबत तीन टनांहून अधिक वजनाची एक कुपी पृथ्वीपासून १२८ किमी अंतरावर अवकाशात सोडली. ही कुपी अवकाशात प्रक्षेपकापासून वेगळी झाली व नंतर ती पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणाचा सामना करत बंगालच्या उपसागरात विसावली. अवकाशातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना वातावरणाशी घर्षण होऊन प्रचंड तापमान निर्माण होते. हे तापमान एक हजाराहून अधिक अंश सेल्सियसपर्यंत असू शकते. इस्रोने तयार केलेली अवकाशवीरांची कुपी सुमारे १६०० अंश सेल्सियस इतक्या तापमानाचा सामना करू शकते व ती पृथ्वीवर सुखरूप परतू शकते. या यशामुळे इस्रो अंतराळवीर अवकाशात संशोधनासाठी पाठवू शकतो. जागतिक संशोधनाचा विचार करता ही बाब काही नवीन नाही. मात्र हे सर्व तंत्रज्ञान भारताने स्वबळावर विकसीत केले आहे हे महत्वाचे आहे. भविष्यात आता भारतीय अंतराळवीर अंतराळात नियमीत जाऊ लागल्यास त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच वाटणार नाही. भारताच्या अवकाश संशोधनाचा गेल्या काही वर्षांतील प्रवास चित्तथरारक आहे. त्यामध्ये संघर्ष जसा आहे तसा महत्त्वाकांक्षीपणाही आहे. उदारीकरण धोरणाचा जसा भारतीय अर्थव्यवस्थेने फायदा उचलला तसा तो अवकाश संशोधनात काम करणार्‍या शास्त्रज्ञांनीही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या दबावाला झुकून रशियाने क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान देण्यास भारतास नकार दिला होता तेव्हा त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधकही दुखावले गेले होते. याचा परिणाम असा झाला की, भारतीय अवकाश संस्थेने (इस्रो) काळाची पावले ओळखत स्वदेशी बनावटीच्या अवकाश उपकरणांच्या निर्मितीवर भर दिला. शेवटी या प्रयत्नांना यश आले आहे. मानवी अंतराळ मोहिमा करण्याची क्षमता रशिया, अमेरिका आणि चीन यांच्याकडेच आहे. त्यांच्या तोडीस तोड, परंतु संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान इस्रोने विकसित केले आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही) साह्याने गेल्या २५ वर्षांत भारताने अनेक मोहिमा यशस्वी केल्या. लो अर्थ ऑर्बिटमध्ये वजन वाहून नेण्याची पीएसएलव्हीची क्षमता मर्यादित होती. त्यामुळे अधिक वजनाचे उपग्रह सोडण्यासाठी जिओसिक्रोनस लॉंच व्हेइकल अर्थात जीएसएलव्हीची मोहीम हाती घेण्यात आली आणि आता या मालिकेतील मार्क-३चा विकास या प्रगतीला दिशा देणारा ठरला आहे. सोव्हिएत महासंघाने १९६१मध्ये व्होस्टॉक कार्यक्रमाद्वारे मानवी अवकाश मोहिमांचा पाया घातला. त्यानंतर ५३ वर्षांनी अशा मोहिमेसाठी आवश्यक तंत्रज्ञान आपल्याला विकसित करता आले. प्रत्यक्ष मानवी मोहीम यशस्वी करण्यापर्यंतचा मोठा टप्पा आपल्याला अजून गाठायचा आहे. इस्रोने सुमारे चार टन वजन अवकाश नेऊ शकणार्‍या जीएसएलव्ही मार्क-३ या प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी घेत आपल्या बौद्धिक कौशल्याचे आणखी एक उदाहरण जगापुढे ठेवले. इस्रोच्या देदीप्यमान कारकीर्दीतला जसा हा एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, तसे या यशाने एक महत्त्वाची कोंडीही फोडली आहे. व्होस्टॉक या कार्यक्रमाद्वारे सोव्हिएत महासंघाने १२ एप्रिल १९६१ रोजी युरी गागारीनला अवकाश मोहिमेवर यशस्वीरीत्या पाठवून मानवी अवकाश कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर एक महिन्याच्या आत ५ मे १९६१ रोजी फ्रीडम-७ या मर्क्युरी मोहिमेअंतर्गत लन शेपर्ड या अंतराळवीराला अवकाशात पाठविले. स्वतःच्या अवकाश कार्यक्रमाद्वारे मानवी अवकाश मोहीम राबविणारा चीन हा जगातला तिसरा देश. १५ ऑक्टोबर २००३ रोजी यांग लिवेई या अंतराळवीराला चीनने शेन्झाऊ-५ या यानाद्वारे त्यांची पहिली मानवी अवकाश मोहीम अमलात आणली. व्हॅलेंटायना टेरेश्कोव्हा या रशियन महिलेला जून १९६३ मध्ये अवकाश वारी करण्याचा मान मिळाला. त्यानंतर १९९९ मध्ये अमेरिकेची एलिन कॉलिन्स आणि २०१२ मध्ये चीनची लिऊ यांग या महिलांनी अनुक्रमे त्या देशांच्या पहिल्या अंतराळ-वीरांगना हे बिरुद प्राप्त केले. आतापर्यंत सर्वांत लांबची मानवी अवकाश मोहीम ही चंद्रावर करण्यात आलेली आहे. अपोलो-११ या मोहिमेद्वारे २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ आल्ड्रेन हे अंतराळवीर पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवणारे मानव ठरले. त्यानंतर अपोलो १७ मोहिमेपर्यंत सहा मोहिमांच्या अंतर्गत एकूण १२ अमेरिकी अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले आहेत. नंतर १२ एप्रिल १९९१ मध्ये, म्हणजे नऊ वर्षांनंतर अमेरिकेच्या मानवी अवकाश मोहिमांना स्पेस शटलच्या युगाला सुरवात झाली, ते २०११ पर्यंत. सध्या फक्त रशियाच्या सोयुझ आणि चीनच्या शोन्झाऊ या यानाद्वारे मानवी अवकाश मोहिमा होत आहेत. अमेरिकेत यापुढील मानवी अवकाश मोहिमा खासगी संस्थांद्वारे लवकरच सुरू होतील. त्याचबरोबर व्यावसायिक स्तरावर अवकाश-पर्यटन युगाला सुरवात होईल. आता भविष्यात भारतातूनही अवकाश पर्यटन सुरु झाल्यास त्यात आश्‍चर्य वाटता कामा नये.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel