-->
संपादकीय पान बुधवार दि. २१ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
कॉँग्रेस स्टाईल राजीनाम्याचे नाटक
-----------------------------------------
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदांचे राजीनामे कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सादर केले. मात्र कार्यकारिणीने या दोघांचेही राजीनामे फेटाळले आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास दर्शवणारा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. सोनिया व राहूल यांचे राजीनामे हे टिपिकल कॉंग्रेस स्टाईलने देण्यात आले. खरे तर तो एक उपचार होता. हे राजीनामे स्वीकारण्याची कॉँग्रेस कार्यकारिणीत हिंमत नाही. फक्त पराभव झाला हे वास्तव स्विकारणे व त्याच्या बदल्यात राजीनाउमा देण्याचे नाटक करणे हा एक उपचार ठरला आहे. दारूण पराभव झाल्याने हरलेल्या राहुल ब्रिगेडला कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पश्चात्ताप करण्याखेरीज अन्य कोणतेही काम उरले नव्हते. पराभवाची मिमांसा करतांना त्याची जबाबदारी आपल्याकडे घेण्याची स्पर्धा लागल्याप्रमाणे आणि आत्मचिंतनाची शर्यत लागल्याप्रमाणे सर्वच पदाधिकार्‍यांनी नेतृत्वावरील अपयशाचा डाग धुऊन काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत नेमके काय झाले, त्याविषयीची माहिती पक्षाकडून देण्यात आली नसली, तरी पक्षाचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावतीने प्रस्तावना करताना या पराभवाची जबाबदारी सर्वांवर असल्याचे सांगत त्याला आपण स्वतः देखील जबाबदार असल्याचे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. पराभवाबाबत केवळ एखाद्या व्यक्तीला कसा दोष देता येईल. ही सामूहिक जबाबदारी आहे. अर्थात ही नेहमीचीच कॉँग्रेसची स्टाईल झाली. नेहरु-गाधी घराणे म्हणजे पक्ष नेतृत्व कधीच चुकत नाही. विजय झाल्यावर त्याचे श्रेय कॉँग्रेस नेतृत्व घेणे आणि पराभव झाल्यावर त्याची जबाबदारी संयुक्त येते, हे कॉँग्रेसचे म्हणणे काही नवीन नाही. आता पक्षाने अपयशाचे चिंतन करण्यासाठी एक समिती नेमल्याचेही जाहीर केले आहे.
अर्थात अशा प्रत्येक पराभवाच्यानंतर त्याचे विश्‍लेषण करणारी समिती स्थापन केली जाते. मात्र अशा समित्यांचे अहवालांचे पुढे काय होते हा एक संशोधनाचा विषय ठरावा. या बैठकीत पक्षसंघटनेत नवे बदल करण्याचे संकेत देण्यात आले. राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आणि काहींना असे प्रश्न विचारणे गैरलागू असल्याचे सांगण्यात आले. पक्षात राहुल यांना आरोपांपासून वाचवण्यासाठी कवायत सुरू झाली आहे. ५४३ सदस्यांच्या सभागृहात पक्षाला केवळ ४४ जागा मिळणे आणि २०६ हा १५ व्या लोकसभेतील आकडा ४४ वर येऊन स्थिरावणे ही इतिहासातील पहिल्यांदाच घडलेली पराभवाची सर्वांत न्यूनतम पातळी आहेे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा असलेल्या या पक्षाला एवढी मानहानी होण्याइतपत पराभवाचा सामना करावयास लागणे म्हणजे एक मोटा धक्काच आहे. कॉंग्रेस पक्षाने लोकांसाठी जे करायला हवे होते ते काम सत्तेत असताना केले नाही. अन्नसुरक्षा, शिक्षणाची हमी यासारख्या चांगल्या योजना कॉँग्रेस पक्षाने जरुर आखल्या. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी केली नाही. त्याचा फटका तर बसलाच तसेच गेल्या तीन वर्षात सरकार मृतावस्थेत असल्यासारखेच होते.  कोणतेही ठोस निर्णय घेताना डॉ. मनमोहनसिंग सरकार कचरत होते. त्याच्या जोडीला करोडो रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली. त्याचा फटका बसणे स्वाभाविकच होते. नरेंद्र मोदींनी कॉँग्रेसच्या कमकुवत बाजू बरोबर ओळखून त्यादृष्टीने आपली व्यूहरचना केली. ती व्यूहरचना भेदण्याची कुवत राहूल गांधींकडे नव्हती. भाजपाने आपले जे मार्केटिंग केले त्यात राहूल गांधी सफशेल फोल ठरले आणि भाजपा खरे तर मोदी उजवे ठरले. मात्र कॉँग्रेस या पराभवाचे खरोखरीच विश्‍लेषण करील का, हा सवाल आहे. सोनिया, राहूल यांचे राजीनामे फेटाळले म्हणजे पराभवाचे विश्‍लेषण झाले असे नव्हे. यातून कॉँग्रेस पक्ष बोध घेईल का, हाच खरा सवाल आहे.
---------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel