-->
संपादकीय पान मंगळवार दि. २० मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
तरुणांनी निवडून दिले ज्येष्ठ नागरिक खासदार
--------------------------------------------
यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे आता टप्प्यात योग्य ते विश्‍लेषण सुरुच राहिल मात्र यावेळी नवमतदार असलेल्या सुमारे २० कोटी तरुणांनी आपली मते भाजपाच्या म्हणजे नरेंद्र मोदींच्या एकूणच मार्केटिंगच्या मोहाला बळी पडून त्यांच्या पारड्यात मते टाकली ही वस्तुस्थिती कुणी नाकारु शकणार नाही. यावेळी तरुणांचा उत्साह मतदानातून ओसंडून वाहत असला तरीही त्यांनी निवडून दिलेल्या खासदारांचे सरासरी वय हे ५५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आता उघड झाले आहे. एकूण ८१ कोटी ४५ लाख मतदारांपैकी २.७ टक्के म्हणजेच २ कोटी ३१ लाख मते १८ ते १९ वयोगटातील होती. या नवमतदारांची ३९ टक्के मते भाजपला मिळाली. तुलनेत याच वयोगटाची केवळ १९ टक्के मते कॉंग्रेसच्या वाट्याला आली. तरुणांनी यावेळी ज्येष्ठांना मतदान केले व त्यांना काम करण्याची संधी दिली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी हे सर्वांत वयोवृद्ध खासदार ठरले असून त्यांचे वय ८६ वर्षे एवढे आहे. सोळाव्या लोकसभेतील ४३ टक्के खासदारांचे वय हे ५५ च्या पुढे असल्याचे एका अभ्यासातून आढळले आहे. विशेष म्हणजे या वेळेस महिला खासदारांच्या संख्येतही फारशी वाढ झालेली नाही. नव्या लोकसभेत केवळ ६१ महिला खासदार असतील. हे प्रमाण केवळ ११.३ टक्के एवढे असून मागील निवडणुकीत ते १०.६ टक्के एवढे होते. सर्वच राजकीय पक्ष महिला सक्षमीकरणाचा उदोउदो करत असले तरी वास्तव मात्र वेगळे आहे. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला देशभरातून तब्बल एक कोटी मते मिळाली आहेत. हे प्रमाण दिल्लीत मिळालेल्या मतांपेक्षा पाच टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळून आले. पंजाबमध्ये आपला चार जागा मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. आपचा लोकसभा निवडणुकीतील कामगिरी मात्र फ्लॅप ठरली. नव्या लोकसभेत केवळ २० मुस्लिम खासदार असतील. सर्वाधिक जागा असणार्‍या उत्तर प्रदेशातून या वेळेस एकही मुस्लिम खासदार निवडून आलेला नाही. तसेच सत्ताधारी बनलेल्या भाजपमध्येही मुस्लिम खासदार नाही. सर्वाधिक म्हणजे सात मुस्लिम खासदार हे पश्‍चिम बंगालमधून निवडून आले असून, त्याखालोखाल बिहारमधून चौघे जण निवडून आल्याचे चित्र उघड झाले आहे. भाजपला मिळालेल्या निर्विवाद बहुमताचे श्रेय देशातील नवमतदारांना जाते. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार्‍या तब्बल २ कोटी ३१ लाख तरुणांनी मतदानाचा हक्क बजावला. या युवा मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावल्यामुळेच भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्याचे दिसते आहे. तरुणांची निर्णायक मते लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी तरुणाईला आकर्षित करण्यासाठी प्रचार यंत्रणा राबविली होती. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल नेटवर्कींग साइटसचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. यात भाजपची यंत्रणा प्रभावी ठरली. भाजपने प्रत्येक २ लाख नागरिकांच्या मागे ६० स्वयंसेवकांची नेमणूक केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. कॉंग्रेसने तरुणांसाठी युवा जोश कॅम्पेेन सुरू केले होते. त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. उत्तर प्रदेशात भाजपला १८ ते १९ वयोगटातील तब्बल ३८ लाख १ हजार मतदारांनी मतदान केले. दिल्लीत सातही जागांवर भाजपने विजय मिळविला. त्यात तेथे २.७ टक्के युवा मतदारांनी भाजपच्या मतदान केले. त्याचा भाजपला फायदा झाला. एक बाब स्पष्ट आहे की तरुण पिढीने संघाच्या प्रभावाखाली येऊन किंवा संघाच्या विचारांशी बांधिलकी दाखवित मतदान केले आहे असे नव्हे तर मोदींच्या विकासाला मत देण्याच्या प्रचाराला भूरळून मत दिले आहे. अर्थात यावेळी मतदारांनी एकाच पक्षाला सत्ता देऊन देशात स्थैर आणण्याची खूणगाठ बांधली होती.
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel