-->
संपादकीय पान सोमवार दि. १९ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
पोलादी प्रशासक
------------------------------
देशात नरेंद्र मोदींच्या यशाचा वारु सर्वांना धडका देत असताना, उद्योग क्षेत्राला हादरा देणार्‍या दोन घटना घडल्या. टाटा समूहाची आघाडीची कंपनी असलेल्या टाटा स्टीलचे माजी अध्यक्ष रुसी मोदी व हॉटेल लीला समूहाचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन नायर यांचे झालेले निधन. मोदीलाटेचा उन्माद प्रसिद्धी माध्यमांमध्ये अजून सुरु असल्याने, या दोघा प्रशासकांच्या निधनाचे वृत्त काहीसे झाकोळले गेले. किंवा नवीन पिढीतील पत्रकारांना हे दोघे निधन पावलेले उद्योजकीय प्रशासक किती महान होते, त्याची त्यांना कल्पना आली नसावी. असो. उद्योग क्षेत्रातील धुरणी म्हणून जगात मान्यता पावलेल्या या दोघा उद्योजकांचा पोलादी प्रशासक असाच करावा लागेल. या दोघांनीही वयाची नव्वदी पार केली होती. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंतचा काळ अनुभवला, त्या दोन्ही काळातले फरक पाहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरची संमिश्र अर्थव्यवस्थाही त्यांनी पाहिली व ९० नंतरचा आर्थिक सुधारणांचा काळही जवळून पाहिला. रुसी मोदी आणि कॅप्टन नायर यांच्यात उद्योजकतेविषयी समान दुवा असला, तरी दोघांची घरची आर्थिक स्थिती मात्र भिन्न होती. कॅप्टन नायर हे केरळात गरीब कुटुंबात जन्मले, तर रुसी मोदी हे पारशी असल्याने जन्मताच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले. केरळातील एका जमीनदाराने दिलेल्या स्कॉलरशिपवर कॅप्टन नायर यांनी शिक्षण केले, तर रुसी मोदी यांची घरची स्थिती उत्तम असल्याने त्यांनी शाळेपासून ते उच्चशिक्षणापर्यंत विदेशात शिक्षण घेतले. खरे तर, त्याकाळी मोदी हे विदेशातच राहून तिथे गडगंज पगार मिळवून राहू शकले असतेही. मात्र त्यांनी तसे न करता भारतात, आपल्या मायदेशी येणे पसंत केले. मोदी घराण्याचे व टाटा घराण्याचे अतिशय चांगले संबंध होते. यातूनच जे.आर.डी.नी त्यांना आपल्याकडे टाटा स्टीलमध्ये नोकरी करण्याचे आमंत्रण दिले. मात्र, एवढे विदेशात शिक्षण घेऊन आलेल्या या तरुणाला टाटा स्टीलमध्ये ऑफिस असिस्टंट नोकरी दिली. मोदींनीदेखील त्याचा आनंदाने स्वीकार केला. जे.आर.डी.ना त्यांच्या शिक्षणाचा काही अपमान करावयाचा नव्हता, परंतु आपल्याकडे पुढे तयार होणारे कंपनीचे नेतृत्त्व हे तळागाळातून आलेले असले पाहिजे. यातून त्या नेतृत्त्वाला कंपनीची खडानखडा माहिती होते, यावर जे.आर.डी.चा ठाम विश्‍वास होता. यातून त्यांनी रुसी मोदी यांच्या जोडीने सुमंत मुळगावकर, नानी पालखीवाला, अजित केरकर, जे. इराणी ही माणसे घडविली. त्यांच्या प्रत्येकाच्या ताब्यात आपल्या कंपन्या सुपूर्द केल्या. त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. यातून त्यांनी कंपन्या देश पातळीवर नेल्या. रुसी मोदींच्या बाबतीतही असेच झाले. ऑफिस असिस्टंट म्हणून लागलेला हा तरुण पुढे चालून टाटा स्टीलचा अध्यक्ष झाला आणि जे.आर.डी.च्या गळ्यातला ताईत झाला. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरुंनी पोलादाचे उत्पादन हे सार्वजनिक क्षेत्रात झाले पाहिजे, असे ठरवून तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या मदतीने स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडिया ही कंपनी स्थापन केली. त्यांचा आवाका टाटा स्टीलपेक्षा खूपच मोठा होता. मात्र, टाटांनी टाटा स्टील ही कंपनी व्यावसायिकदृष्ट्या चालविली आणि त्याकामी त्यांना रुसी मोदी यांची मोठी मदत झाली. आज टाटा स्टील ही कंपनी पोलाद उद्योगातील जगात सातव्या क्रमांकाची कंपनी म्हणून ओळखली जाते. आजच्या टाटा स्टीलच्या यशात रुसी मोदींचा मोठा वाटा आहे. कारण त्यावेळी त्यांनी या कंपनीचा पाया पक्का उभारला होता. त्यामुळेच रुसी मोदी हे पोलादी पुरुष म्हणून ओळखले गेले. ते जेवढ्या सहजतेने व्यवस्थापनात मिसळत, तेवढ्याच सहजतेने कामगारांचे प्रश्‍न समजवून घेऊन त्यांच्यातही सहजतेने वावरत असत. टाटा स्टीलच्या प्रकल्पात कमीत कमी कामगार तंटे व्हावेत, याकडे त्यांनी लक्ष दिले. अशा या धुरंदर माणसाचे मात्र जे.आर.डी.च्या निवृत्तीनंतर टाटा समूहाची सूत्रे आलेल्या रतन टाटांशी फारसे काही सूर जुळले नाहीत. अर्थात, तो दोन पिढ्यांतला संघर्ष होता. कारण रतन टाटा यांना आपल्या कंपन्यांना गती देण्यासाठी तरुण नेतृत्व आणण्याची गरज वाटू लागली होती. रुसी मोदींचे वय ६५च्या वर झाल्याचे निमित्त करुन त्यांना निवृत्त करण्यात आले. सुरुवातीस त्यांचा यातून जो कडवटपणा रतन टाटा यांच्याशी निर्माण झाला होता, तो रतन टाटांच्या निवृत्तीला कमी झाला होता. मोदींनी मुक्तकंठाने रतन टाटा यांच्या गुणांचे कौतुक अलीकडेच केले होते. टाटा स्टीलमधून निवृत्त झाल्यावर त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचा उपयोग करुन घ्यावा, या हेतूने तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. मात्र, एअर इंडियाच्या सरकारी लाल फितीच्या कारभारात त्यांचे मन रमेना, त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिला. कॅप्टन नायर यांच्या आयुष्याचा ग्राफ मात्र काहीसा वेगळा होता. गरीब घरात जन्मल्यामुळे त्यांना सतत संघर्ष करावा लागला. सुरुवातीला स्वातंत्र्यचळवळीत व नंतर भारतीय लष्करात ते दाखल झाले. १९५० साली त्यांचे लग्न झाल्यावर त्यांचे उद्योजक असलेल्या सासर्‍यांच्या उद्योगात लक्ष द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचा हँडलूमचा व्यवसाय होता. त्यातून त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार केला. १९८७ साली मुंबईत पंचतारांकित हॉटेल लीला सुरु केले. आता त्यांच्या हॉटेल उद्योगाची जगात साखळी उभारण्यात आली आहे. नायर यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्यावेळी लोकांना निवृत्तीचे वेध लागलेले असतात, त्यावेळी वयाच्या ६५व्या वर्षी नवीन उद्योगात पाऊल टाकले आणि यश मिळविले. कॅप्टन नायर व रुसी मोदी यांच्या रुपाने आपण उद्योग क्षेत्रातले उत्तम प्रशासक गमावले आहेत. कॉर्पोरेट जगतात त्यांच्या कार्याची नोंद सुवर्णाक्षराने नोंदविली जाईल.
----------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel