-->
 व्लादिमीर पुतीन संशयाच्या फेर्‍यात
 [ प्रसाद केरकर, मुंबई ] Published on 17 Dec-2011 PRATIMA
रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांना निवडणुकीत निसटता विजय मिळाला असला तरी त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होऊ लागल्याने ते संशयाच्या फेर्‍यात अडकले आहेत. गेल्या दशकाहून जास्त काळ रशियाच्या राजकारणावर वरचश्मा असलेल्या पुतीन यांच्या विरोधात सध्या रशियातील प्रमुख शहरांतून मोर्चे निघत आहेत. अर्थातच त्यापुढे शरणागती पत्करून पुतीन काही राजीनामा देणार नाहीत हे स्पष्टच आहे. कारण रशियात पुतीन यांच्या सर्मथनार्थही मोर्चे निघत आहेत.लेनिनग्राड येथे 7 ऑक्टोबर 1952 रोजी जन्मलेले पुतीन 2000 ते 2008 या काळात रशियाचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते पंतप्रधानपदी आरूढ झाले. 1975 मध्ये पुतीन यांनी कायद्यातील पदवी लेनिनग्राड स्टेट विद्यापीठातून घेतली. त्यांचा आंतरराष्ट्रीय कायदा हा विशेष विषय होता. त्यापूर्वी 1970 मध्ये ते त्या वेळच्या सोव्हिएत युनियनची गुप्तहेर संघटना के.जी.बी.मध्ये दाखल झाले होते. काही काळाने त्यांना के.जी.बी.च्या विदेशातील ‘एलिट विभागा’चे प्रमुख करण्यात आले. 1980च्या काळात त्यांना त्या वेळच्या पूर्व र्जमनीत विशेष मोहिमेवर पाठवण्यात आले. तेथे तीन वर्षे काम केल्यावर ते पुन्हा मायदेशी परतले. त्यानंतर त्यांची ‘सोविएत सायन्स अँड टेक्नॉलॉजी’च्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. 1990 मध्ये ते सेंट पिट्सबर्ग या शहराचे मुख्य प्रशासक म्हणून नियुक्त झाले. त्यापाठोपाठ 92 ते 94 या काळात ते या शहराचे उपमहापौर होते. त्यानंतर ते केंद्रीय राजकारणात आले आणि 1996 मध्ये अध्यक्षांच्या कार्यालयातील प्रशासकीय विभागातील उपमुख्य अधिकारी झाले. केवळ दोन वर्षांनंतर त्यांची नियुक्ती ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेस’च्या प्रमुखपदी करण्यात आली. त्यानंतर केवळ एका वर्षानेच त्यांच्याकडे ‘रशियन सिक्युरिटी कौन्सिल’च्या सचिवपदाची सूत्रे आली. पुतीन यांचे राजकीय वजन देशात चांगलेच वाढत चालले होते. त्यामुळे बोरिस येलत्सिन यांचे वारसदार म्हणून त्यांची रशियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्या वेळी कुणाला फारसे आश्चर्य वाटले नाही. 2000 मध्ये त्यांना 53 टक्के मते पडली आणि त्यांचे या पदावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या अध्यक्षपदाची कारकीर्द रशियासाठी अतिशय स्थैर्याची गेली. त्याचबरोबर शीतयुद्धातून एक दशकापूर्वीच बाहेर आलेल्या रशियाला राजकीय, आर्थिकदृष्ट्या सावरण्याचे मोठे काम त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात केले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता सतत वाढतच गेली. त्यातूनच 2003 मध्ये झालेल्या रशियन ड्युमाच्या निवडणुकीत पुतीन यांचे सर्मथन करीत असलेल्या युनायटेड रशिया पक्षाला 38 टक्के मते मिळून त्यांनी संसदेतील 223 जागा पटाकावल्या होत्या. पुढच्या वर्षी पुतीन यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 71 टक्के मते पडली होती. मात्र यानंतर लगेच दोन वर्षात झालेल्या दुसर्‍या चेचेन्या युद्धाची हाताळणी त्यांनी ‘वाईट पद्धती’ने केल्याबद्दल त्यांच्यावर मानवी हक्क आयोगापासून अनेकांनी टीका केली आणि पुतीन यांची लोकप्रियता घटण्यास सुरुवात झाली. रशियात भ्रष्टाचारात दिवसेंदिवस वाढच होत गेली. कॉर्पोरेट क्षेत्रात तर मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला. 2008 मध्ये रशियाच्या घटनेनुसार, दोन वेळा अध्यक्षपदाचा कालावधी पूर्ण केल्यावर पुतीन यांना पायउतार व्हावे लागले आणि त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. पुतीन पंतप्रधानपदी नियुक्त झाल्यावर जागतिक मंदीचा रशियाला सामना करावा लागला. सरकारने उद्योगांसाठी पॅकेज जाहीर केले आणि याचा काही प्रमाणात फायदा झाला. मंदीचा फेरा मंदावल्यावर पुन्हा एकदा रशियाने विकासाची वाट धरली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी रशियात असे काही घटनात्मक बदल घडवून आणले की, त्यांनी जर पुढील निवडणुका सुरळीत जिंकल्या तर ते 2024 पर्यंत सत्तेवर राहू शकतील. मात्र सध्या तरी निवडणुकीतील गैरकारभारामुळे पुतीन संशयाच्या फेर्‍यात अडकले आहेत. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel