-->
प्रतीक्षा उद्योजक बाबासाहेबांची..

प्रतीक्षा उद्योजक बाबासाहेबांची..

 प्रतीक्षा उद्योजक बाबासाहेबांची..
Published on 18 Dec-2011 CANVAS
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकाच वेळी दलित चळवळीशी निगडित दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. यातील पहिली घटना होती, इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाला देण्यासाठी आठवले गटाने केलेल्या उग्र आंदोलनाची आणि दुसरी घटना होती, दलित उद्योजकांनी वांद्रे येथे आयोजित केलेली तीन दिवसांची व्यापारी जत्रेची. म्हटल्या तर या वेगळ्या घटना. पण त्यातून दलित समाजातील अस्मिता अपेक्षा आणि आकांक्षांचे दोन भिन्न आविष्कार बघायला मिळाले..डॉ. बाबासाहेबांनी दलित समाजाला ‘शिका, संघटित व्हा आणि सत्ताधारी बना’ असा संदेश दिला होता. दलितांनी शिकले पाहिजे, शिक्षण हीच आपली संपत्ती आहे आणि शिक्षणाच्या बळावर मोठे होत असताना ‘सत्ताधारी जमात’ झाल्याने तुम्ही सर्व समाजाला वर काढू शकता, असा अर्थ डॉ. बाबासाहेबांच्या संदेशात दडला होता. इंदू मिलची जमीन ताब्यात घेऊन तिथे बाबासाहेबांचे स्मारक व्हावे किंवा दादरचे आणि मुंबई सेन्ट्रलचे नाव बदलावे ही मागणी अवास्तव आहे असे कोणी म्हणणार नाही, पण या सर्व भावनात्मक बाबी झाल्या. यातून दलित समाजाचा उद्धार होण्यासाठी नेमकी कोणती मदत होणार आहे? बाबासाहेबांचे स्मारक जरूर व्हायला पाहिजे, परंतु त्यासाठी इंदू मिलमध्ये घुसून जाळपोळ करून ज्याप्रकारे हिंसक प्रवृत्तीचे दर्शन घडले आहे, ही बाब सर्वच आंबेडकरी जनतेला मान्य होईल?मुळात, हे सगळे बाबासाहेबांच्या विचारांशी सुसंगत नाही हेच खरे. 
एकीकडे स्मारकासाठी आंदोलन पेटले असताना वांद्रे येथे भरलेल्या दलित चेंबर ऑफ कॉर्मस (डिक्की)च्या व्यापारी जत्रेत याच समाजातील नवउद्योजक आजच्या दलित समाजाला उद्यमशील नेतृत्वाची सर्वाधिक गरज असल्याचे सांगत, प्रगती आणि समृद्धीचा वेगळा विचार मांडत होते. एक तर दलित उद्योजकांनी आपल्या विचारांशी बांधिलकी ठेवत जी संघटना उभारली त्या संघटनेच्या वतीने दलित उद्योजकांची जी व्यापारी जत्रा आयोजित केली ही घटना सकारात्मक ठरावी. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दलित पिढीला सर्वच थरावर मोठा संघर्ष करावा लागला. जातीच्या भिंती पाडून समाजात आपले एक स्थान निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. बाबासाहेबांनी दलितांच्या हाती दिलेली शिक्षणाची ज्योत घरोघरी पेटली आणि यातून सरकारी असो वा खासगी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर दलितांनी नोकर्‍या मिळवून आपला ठसा उमटविला. स्वातंत्र्यानंतरच्या या दलित पिढीत स्वयंरोजगार वा उद्योग स्थापन करण्याचे प्रमाण फारच अल्प होते. किंबहुना या पिढीत दलित उद्योजक नव्हतेच. त्यावेळी परिस्थिती लक्षात घेता उद्योजक निर्माण होण्याची शक्यताही नव्हती. मात्र आता पुढच्या पिढीत चांगले शिकलेले व तंत्रज्ञ म्हणून पुढे आलेल्या दलित समाजातील तरुणांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याची स्वप्ने उराशी बाळगली आहे. यात अनेकांना यशही मिळाले. यातूनच आता तर दलित उद्योजकांची एक नवी पिढी पुढे आली आहे. उद्योगाचा कोणताही घराण्याचा वारसा नसताना, भांडवलाची वानवा असताना ज्याप्रमाणे अनेक मराठी तरुणांनी उद्योजकतेत आपली पताका फडकाविली त्याच धर्तीवर दलित तरुणांनीही उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. दलित चेंबरचे अध्यक्ष मिलिंद कांबळे हे याच पिढीचे नेतृत्त्व करतात. 
उद्योग, व्यापार म्हटला की गुजराती, मारवाडी समाज डोळ्यांपुढे येतो. या समाजात बालपणापासूनच उद्योजकतेचे धडे दिले जातात. उद्योजकतेचे बाळकडू मराठी समाजात फारच कमी प्रमाणात मिळते. दलित समाजाची स्थिती याहून काही वेगळी नव्हती. परंतु यातून संघर्ष करीत अनेक दलित तरुणांनी उद्योगात आपले एक स्थान उद्योगात निर्माण करण्यात यश मिळविले आहे. निंबाना ऑडियोचे संजय क्षीरसागर, दास ऑफ शोअरचे अशोक खाडे, कमानी ट्यूू्ब्सच्या संचालिका कल्पना सरोज, गुजरात पिकल्सचे रतीभाई मकवाना, इंडो सकुराचे संचालक अतुल पासवान ही यातील काही आघाडीची नावे. यातील प्रत्येक उद्योजकाची उलाढाल श्ंभर कोटींपासून ते 1500 कोटीपर्यंत आहे. यातील अनेकांनी आपल्या व्यवसायाची पताका केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही फडकाविली आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे देशपातळीवर उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ आहे त्याधर्तीवर दलित चेंबरचे स्थान निर्माण झाले पाहिजे, हा या उद्योजकांचा ध्यास आहे. आपल्याकडे मराठी असो वा दलित उद्योजक त्यांच्याकडे एक नेतृत्त्व नाही; परंतु दलित चेंबरने हे नेतृत्त्व भविष्यात दिल्यास पुढील पिढीला उद्योजकतेकडे वळण्यासाठी मोठी मदत होईल, हेही तितकेच खरे. दलित समाजाने गेल्या तीन दशकात आजवर अनेक नेते पाहिले; परंतु त्यांना आता पुढे नेण्यासाठी उद्यमशील नेत्याचीच गरज आहे, हे ही भावनात्मक आंदोलनांची आवर्तने अनुभवल्यानंतर पुन्हापुन्हा अधोरेखित होत आले आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेबांच्या निधनानंतर आता पाच दशके लोटल्यानंतर दलितांनी उद्योग क्षेत्रात दलित चेंबरच्या रुपाने ठोस पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. दलित उद्योजकांच्या या आविष्कारातून उद्याचे उद्यमशील नेते घडावेत, हे या मागील गृहीतक आहे. आज दलित समाजाला पर्यायाने देशालाही याची मोठी गरज आहे. आता उद्योगक्षेत्रातही ‘बाबासाहेब’ जन्मण्याची आता वेळ आली आहे, हे चित्र दलित उद्योजकांनी मुंबईत आयोजिलेल्या व्यापारी जत्रेमुळे सामोरे आले आहे. जे अनेक अर्थाने आश्वासक ठरणारे आहे. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "प्रतीक्षा उद्योजक बाबासाहेबांची.."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel