-->
संपादकीय पान सोमवार दि. १९ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
मोदींनी कॉँग्रेसचा सफाया करुन दाखविलाच
---------------------------------
स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या गेलेल्या महाराष्ट्रात मोदी लाटेने मात्र कॉँग्रेसचे अनेक दिग्गज भूईसपाट झाले आहेत. राज्यात युतीची असलेली साडे चार वर्षांची सत्ता वगळता कॉँग्रेसलाच नेहमी या राज्याने पाठबळ दिले आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केल्यावरही कॉँग्रेसशी त्यांना युती करुन सत्ता काबीज करावी लागील होती. अगदी आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाच्या हातातून देशातील सत्ता गेली असली तरीही राज्यात मात्र तेवढा फटका बसला नव्हता. मात्र यावेळी मोदींच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्रातील जनतेने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल, मिलिंद देवरा आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ, संजय देवतळे, शिवाजीराव मोघे यांच्याबरोबरच प्रिया दत्त, गुरुदास कामत, माणिकराव गावित अशा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बिनीच्या शिलेदारांना अक्षरश: पाणीच पाजून अब की बार मोदी सरकार ही घोषणा सार्थ करून दाखवली. राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागा जिंकण्याचा विक्रम महायुतीने केला. कॉंग्रेसच्या वाट्याला केवळ आणि केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. आदर्श सोसायटीफ गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या अशोक चव्हाण यांना नांदेडच्या मतदारांनी विजयी केले असले, तरी पेड न्यूज प्रकरणात त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची चर्चा आहे. कोणत्याही लाटेत कॉंग्रेसला साथ देणार्‍या विदर्भातही यंदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पुरती धूळधाण उडाली असून, तेथील दहाच्या दहा जागांवर महायुतीलाच विजय मिळाला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्णत: पराभूत केले होते. शुक्रवारी दिल्लीत त्याची पुनरावृत्ती झालीच आणि त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सहाही जागांवर महायुतीने राज्यातील सत्ताधारी आघाडीला पराभवाचे पाणी पाजले. मुंबईलगतच्या ठाणे-कोकणपट्‌ट्यातही मोदी लाटेत सर्व जागा महायुतीच्याच पारड्यात गेल्या आहेत; तर मराठवाड्यातही कॉंग्रेस आघाडीच्या वाट्याला नांदेडची एकच जागा आली आहे. देशभरात सगळीकडून कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या पराभवाचे वृत्त येत असताना महाराष्ट्र तरी त्यांना साथ देईल, अशी अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कॉंग्रेस इतकी भुईसपाट झाली. महायुतीचे जवळपास सर्व उमेदवार एक ते दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले असून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र काही हजारांनी काठावर उत्तीर्ण झाले आहेत. खुद्द बारामतीमध्ये सुप्रिया सुळे काही हजारांनीच विजयी झाल्या. राज्यातील राजकारणाला यातून वेगळीच दिशा मिळणार आहे हे नक्की. सर्वात महत्वाचे म्हणजे शिवसेना सोडून कॉँग्रेस, राष्ट्रवादीत गेलेले दिग्गज नेते यावेळी निवडणूका हरले आहेत. त्यातील नारायण राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अर्थातच तो मंजूर होईल असे नाही. कारण या सरकारचा कालावधीच आता जेमतेम तीन महिने शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या सरकारचे दिवस आता भरतच आले आहेत. सध्या ज्या संख्येने शिवसेना-भाजपाच्या जागा निवडून आल्या आहेत ते पाहता, पुढील सरकार हे त्यांचेच असेल. ही स्थिती कॉँग्रेसची केवळ महाराष्ट्रातच नाही. तर गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यात तर शून्यही कॉँग्रेस पक्षाला फोडता आले नाही. एवढी दुबळी अवस्था कॉँग्रेसची स्थिती कधीच झाली नव्हती. मोदी लाटेने एवढी धुळधाण केलेली आहे की, यातून कॉँग्रेस पक्ष नजिकच्या काळात तरी सावरला जाणे कठीण आहे. मोदींनी आपल्या जाहीर सभांमध्ये कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची शपथ घेतली होती. अर्थात त्यांनी आपले म्हणणे खरे करुन दाखविलेच. या निवडणुकांनंतर देशाच्या राजकारणाला एक नवी कलाटणी मिळणार आहे.
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel