-->
रविवार दि. १८ मे २०१४ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------
मोदींच्या करिश्म्यामागे...
--------------------------
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अनेक नवीन धडे गिरविलेे आहेत. यातील सर्वात महत्वाचा धडा म्हणजे गेल्या तीस वर्षात देशात येणार्‍या खिचडी सरकारची समाप्ती. आता नव्याने स्थापन होणारे भाजपाचे सरकार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असले तरी त्यांची क्षमता ही स्वबळावर सरकार स्थापन करण्याची आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने ते भाजपाचेच सरकार असेल. स्वबळावर येणारे हे भाजपाचे हे कॉँग्रेस व्यतिरिक्त पहिलेच सरकार आहे. भाजपाच्या म्हणजेच नरेंद्र मोदींच्या यशामागे माध्यमांनी फार महत्वाची भूमिका बजावली आहे. नरेंद्र मोदींनी ज्यावेळी दिल्लीचे तख्त जिंकण्याची व्यूहरचना आखली त्यावेळी त्यांच्या अजेंडावर प्रसार माध्यमांना आपल्या बाजूला वळविण्याची स्ट्रॅडिजी प्राधान्यतेने होती. प्रसार माध्यमात संघाला मानणारे लोक जास्त असल्याने त्यांना त्याचा फायदाही झाला. त्याचबरोबर त्यांनी सोशल मिडिया हे नवीन माध्यम सर्वात प्रथम प्रभावीपणे वापरले. त्याच्या माध्यमातून तरुणांना आपल्याकडे जोडण्याचे महत्वपूर्ण काम केले. सोशल मिडियाची ही ताकद मोदींसारख्या साठीच्या वर पोहोचलेल्या नेत्याने ओळखणे यातच त्यांच्या चाणाक्ष नेतृत्वाची कसोटी लागली. देशातली लोकशाहीच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मतदार राजाने आता एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत बहाल केले आहे. अशी घटना तब्बल ३० वर्षांनी घडली आहे. गेल्या तीन दशकात देशातील खिचडीच्या राजकारणाने सत्ताधार्‍यांना हैराण करुन सोडले होते. यात अनेकदा त्यांना सत्तेसाठी तडजोडीचे राजकारण टोकाला जाऊन करावे लागत होते. आता मात्र नरेंद्र मोदींच्या व भाजपाच्या हाती एक दिलाने सत्ता दिल्याने आता त्यांना काही तरी चांगले करुन दाखविण्याची संधी चालून आली आहे. भाजपाचा खरा चेहरा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे. मात्र संघ आपण राजकारणापासून अलिप्त असल्याचा आव आणतो. परंतु राजकारण हे भाजपाच्या माध्यमातून करीत आला आहे. सुरुवातीला जनसंघाच्या माध्यमातून व आता भाजपाच्या मार्गातून संघ आपला कार्यक्रम राबवित आला आहे. सुरुवातीला थेट हिंदुत्वाचा प्रचार करीत भाजपाने आपला विकास केला. आता मात्र हिंदुत्वाचा मुखवटा धारण केला असताना त्यांनी विकासाचे आपला चेहरा प्रोजेक्ट केला. कॉँग्रेसच्या नकर्तेपणामुळे व कुचकामीपणामुळे भाजपाची वाढ होण्यास मदत झाली ही बाब ही तेवढीच खरी आहे. मोदी हे देखील संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. सुरुवातीला संघ प्रचारक म्हणून काम करीत राजकारणात शिरुन मोठ्या हिंमतीने आता ते पंतप्रधानपदाच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेसचा मुख्य आधार हा ब्राह्मण, दलित, मुस्लिम व ओबीसी हे मतदार होते. मात्र काळाच्या ओघात ब्राह्मण हे संघाच्या मार्गाने भाजपाकडे वळले. तसेच संघाने आपला ब्राह्मण तोंडावळा बदलण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगचे अस्त्र उपसले आणि ओबीसींना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. नरेंद्र मोदी हे याच ओबीसीतून आलेले होते. कॉँग्रसने मुस्लिमांचे अपराध पोटात घालून त्यांना गोजारण्याचा प्रयत्न सुरु केल्यावर त्याच्या विरोधात पध्दतशीरपणे प्रचार संघाने सुरु केला आणि आपली ताकद यातून वाढविण्यास सुरुवात केली.
नरेंद्र मोदींनी २०११ नंतर त्यांनी नियोजनबद्धरीत्या व्यूहरचना करून वाटचाल सुरू केली होती. जेव्हा त्यांनी सद्भावना यात्रा सुरू केली तेव्हाच वाटले होते, आगामी विधानसभा  निवडणुका लक्षात घेऊन आपली प्रतिमा बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. परंतु तेव्हापासूनच त्यांचा डोळा पंतप्रधानपदावर होता. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ते निश्चितपणे काही निर्णयाप्रत येऊन पोहोचले होते. परंतु २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर त्यांना वाटले, आपणच केंद्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्यादरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानात महमंदअली जिनांच्या कबरीजवळ  त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले होते. त्यामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आले. त्यानंतर तर केंद्रीय नेतृत्व करण्यासाठी मोदींसाठी मैदान साफ झाले. मोदींमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसून येत होता. परंतु तो एका सुनिश्चितपणे रचलेल्या व्यूहरचनेच्या परिणाम होता.  निवडणुकीत मिळालेली मतांची टक्केवारी पाहिल्यास ते स्पष्ट जाणवते.  गुजरातमध्ये ५९ टक्के, मध्य प्रदेशात ५४ टक्के, महाराष्ट्र, राजस्थानात त्यांना एकतर्फीच पाठिंबा मिळाला आहे. हिंदी पट्टा तर महत्त्वाचा आहेच, परंतु जादुई आकडा गाठण्यासाठी तो पुरेसा नाही. यासाठी त्यांनी गोवा, दमण-दीव, अंदमान अशा छोट्या-छोट्या  जागांवर भाजपला दुर्लक्षित केले जात होते, अशा जागांवर लक्ष केंद्रित केले.  त्यानंतर त्यांनी प्रचारमोहिमेबरोबरच नवे मार्ग निवडले. याशिवाय एक नवा फोर्स आणला. त्यात बाहेरून आणलेले तंत्रज्ञ होते. विशेष म्हणजे संघ परिवार असो, तंत्रज्ञ असोत किंवा सामान्य कार्यकर्ता, यांच्यात स्पर्धा किंवा मतभेद कधीच निर्माण झाले नाहीत. सर्वांनी एकजूट  होऊन काम केले. या सर्वांनी मोदींना कमॉडिटी बनवले. हैदराबादेत त्यांच्या सभा ऐकण्यास गेलेल्या नागरिकांना ५ रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागले होते. हा सर्व एत प्रकारचा फार्सच होता. परंतु त्यात ते यशस्वी झाले. या सभेसाठी कोणत्याही घटक पक्षाची मोदींनी मदत घेतली नाही. त्यानंतर थ्रीडी होलोग्राम, चाय पार्टीसारख्या आयोजनाला १८- २३ वयोगटातील तरुणांना असे नवे उपक्रम खूप आवडले. रोज नव्या गोष्टीच्या शोधात असणार्‍या तरुण पिढीला वाटले, हा माणूस  इनोव्हेशन करू शकतो.  नव्या गोष्टी आणू शकतो. त्यांची ठिकठिकाणची भाषणे आणि दौर्‍या दरम्यान त्यांनी जनतेत जवळीक वाढवली. त्यानंतर ते माध्यमांकडे गेले.  सुरुवातीला त्यांनी  परिचित असलेल्या आणि त्यांना व्यवस्थितरीत्या हाताळू शकतील अशा पत्रकारांचीच निवड केली. मग हळूहळू त्यांची कक्षा रुंदावत गेली आणि देशपातळीवर आपण कसे चमकू शकतो याची व्यूहरचना केली.  मग १०० मेगासिटी बनवण्याची घोषणा असो किंवा बुलेट ट्रेन चालवण्याची योजना असो. प्रचारादरम्यान ते सातत्याने नव्या कल्पना जनतेसमोर मांडत गेले. कॉंग्रेसने मनरेगासारख्या योजनेद्वारे घरबसल्या काम आणि दाम अशी योजना काढली. तेव्हा  मोदींनी सांगितले, तुमचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही मदत करू. आता मात्र केंद्रात भाजपाचे म्हणजे मोदींचे सरकार आल्याने केंद्रातील अर्थकारणाची दिशा बदलणार आहे. यापुढे राजकारण हे डावे नाही तर उजवे असेल. यापूर्वी कॉँग्रेसने काही अपवादात्मक निर्णय वगळता काही डावे अर्थकारण केले नाही. आता मात्र आपल्या देशाची दिशा ही पूर्णपणे उजवी असेल. स्वातंत्र्यानंतरचा झालेला हा सर्वात मोठा बदल असेल.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel