-->
संपादकीय पान शनिवार दि. १७ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
नमो नमा:
---------------------------
कॉँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला यावेळी मतदारांनी जोरदार हिसका देण्याची खूणगाठ पक्की बांधलीच होती. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या या मनाचा बरोबर ठाव घेऊन गेले एक वर्षे देशात कॉँग्रेस विरोधी प्रचाराची मोहीम राबविली होती त्याला अखेर यश आले आहे. भाजपाला स्वबळावर सरकार स्थापन करता येईल असे संख्याबळ देशातील जनतेने दिले आहे. गेेल्या ३० वर्षात कोणत्याही एका पक्षाच्या हातात अर्निबंध सत्ता न देण्याची परंपराही आता मोडीत निघाली आहे. एवढे भव्य दिव्य यश मिळेल असे कुणा भाजपाच्या नेत्यालाही मनापासून वाटले नसेल. मात्र यावेळी जनतेचा निश्‍चय पक्का होता. भ्रष्टाचारी व निर्णय घेण्यात कुचकामी ठरलेल्या कॉँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला घरी बसवायचेच आणि नव्याने येणारे सरकार बलवान असेल, जेणेकरुन नव्याने स्थापन होणारे स्थिर सरकार हे काही तर देशासाठी ठोस विकास कामे करुन दाखवू शकेल, असेच सरकार निवडायचे हा तो निश्‍चय. भाजपाला गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात जे यश लाभले आहे ते अभूतपूर्व असेच आहे. आणीबाणी नंतर झालेल्या १९७७ सालच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे जनता पार्टीच्या सरकारने कॉँग्रेसला संपुष्टात आणले होते त्याची आठवण व्हावी असाच हा निकाल आहे. कॉँग्रेसचे अनेक देशव्यापी दिग्गज नेते यावेळी भूईसपाट झाले आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी हे देखील पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये पिछाडीवर होते. यावेळी मोदी लाटेत राहूल गांधी हे देखील पडतील की काय असे चित्र दिसत होते. परंतु राहूल गांधी मात्र बचावले आहेत. कॉँग्रेसची सध्याची सदस्य संख्या ही इतिहासातील निचाक आहे. एक प्रकारे कॉँग्रेसचा पराभव हा नुसता नसून कॉँग्रेसला पुरता भुईसपाट करणारा आहे. यावेळी त्यांची सदस्यसंख्या लक्षात घेता राहूल गांधींना विरोधी पक्षनेते पदही मिळण्याची शक्यता नाही. कॉँग्रेसचा पराभव हा त्यांनी आपल्या हातून केलेला एक प्रकारचा आत्मदहनाचा प्रकार ठरावा असाच आहे. कारण सत्तेत असताना सत्तेचा वापर आम जनतेसाठी न केल्याने व भ्रष्टाचाराची एकएक प्रकरणे उघड होत गेल्याने जनता कॉँग्रेसच्या कारभाराला पूर्णपणे विटली होती. भ्रष्टाचार, महागाई, बेकारी याच्या झालेल्या अतिरेकामुळे भाजपाचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आजच्या पराभवाला आणि भाजपाच्या विजयाला पूर्णत: कॉँग्रेसच जबाबदार आहे. त्यांची सत्तेत असतानाची बेपरवाई कारणीभूत आहे. २०११ साली अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरु झाले त्यातच कॉँग्रेसच्या पराभवाची बीजे रोवली गेली होती. या आंदोलनानंतर डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार एवढे दुबळे होत गेले की, त्यांच्यात निर्णय क्षमताच शिल्लक राहिली नव्हती. डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार हे सर्वात दुबळे सरकार ठरले. अनेक विकासाच्या प्रकल्पांना खिळ लागली होती. हे जर बदलायचे असेल तर तुम्ही मला साठ महिन्यांचा कालावधी द्या, मी देशात बदलून घडवून दाखवितो, हे नरेंद्र मोदींचे आवाहन जनतेला पटले. नरेंद्र मोदींनी केलेले हल्ले परतवून लावण्याची क्षमता कॉँग्रेसमध्ये राहिलीच नव्हती. त्यामुले मोदी दिवसेंदिवस प्रभावी होत गेले. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये दंगली घडवून आणल्या व मुस्लिमांचे शिरकाण केले, अशा या मोदींना निवडून देऊ नकात हाच एकमेव नारा कॉँग्रेसकडे होता. यातून त्यांचे मोदी विरोधी प्रचाराचे सुकाणू भरकटले होते. याचे महत्वाचे कारण म्हणजे बाबरी मशिद पाडल्यानंतर जन्माला आलेली पिढी ही आता २० वर्षाहून मोठी झाली आहे. त्या पिढीने दंगली पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे या तरुण पिढीला त्या दंगलीची भयानकता आता काहीच माहीत नाही. त्यामुळे मोदींच्या पुढे दिसत असलेला विकासाचा चेहरा त्यांना आकर्षक वाटणे स्वाभाविकच होते. सध्याच्या कॉँग्रेस विरोधामुळे मोदींचा जातीयवादी मुखवटा बेमालूमपणे लपला हे वास्तव आता आपल्याला स्वीकारावे लागेल. मोदींना व भाजपाला यावेळी फक्त हिंदूंनीच मते दिली असे नाही तर मुस्लिमांनीही दिली, अन्य धर्मियांनीही दिली. गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी ख्रिश्‍चन धर्मियांनीही भाजापाला मते दिली होती. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, मोदींचा जातीयवादी मुखवटा लपला आणि त्यांच्या विकासाच्या मॉडेलची लोकांना भूरळ पडली. कॉँग्रेसने ज्या गोष्टींपासून आपल्याला वंचित ठेवले, ज्यांची त्यांना आता आस वाटते, त्या विकासाला जर मोदी चालना देणार आहेत तर ते आपल्याला का नको? असा विचार या देशातील जनतेने केला आणि मोदींचा देशव्यापी विजय झाला. त्यामुळे हा विजय खरे तर भाजपाचाही नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही नाही, हा खर्‍या अर्थाने फक्त मोदींचाच विजय आहे. कारण देशात सहा हजार सभा घेऊन त्यांनी एक हाती झंझावात निर्माण केला, कॉँग्रेसच्या विरोधात जे जनमत होते त्याचे मतात रुपांतर केले. यावेळची निवडणूक ही खर्‍या अर्थाने देशाच्या इतिहासातील एका नव्या वळणावरील ठरली आहे. यावेळचे होणारे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले आहेत. यापूर्वीचे सर्व पंतप्रधान हे स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्मलेले होते. अगदी डॉ. मनमोहनसिंग व इंद्रकुमार गुजराल यांचे जन्म तर पाकिस्तानातले होते. आता मात्र ६५ वर्षांनंतर स्वातंत्र्यपूर्व असलेली ही ओझी आपण बाजूला सारली आहेत. बाबरी मशिद पाडल्यानंतर झालेले अटलबिहारी वाजपेयी हे भाजपाचे व संघाच्या मुशीत तयार झालेले पंतप्रधान होते. मात्र त्यांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक होते, त्यांच्यात कडवा हिंदुत्ववाद नव्हता. आता मात्र मोदी हे तसे नाहीत. ते संघाच्या तालमीत तयार झालेले आहेत आणि कडवे हिंदुत्ववादीही आहेत. पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी त्या देशाशी युध्द करुनच त्यांना धडा शिकवला पाहिजे या विचाराचे मोदी आहेत. त्यामुळेच आपल्या देशाची आजवरची जी सर्वधर्मसमभावाची जपणूक आपण केली तसेच शेजार्‍याशी मैत्री करीत असताना आपण मोठ्या भावाची मैत्रीपूर्ण भूमिका बजावली त्यात आता बदल होणार का हा मूलभूत सवाल आहे. मोदींच्या विजयामागे महत्वाचा घटक आहे तो तरुण पिढीचा. आज मोदींचे वय६५च्या पुढे आहे. मात्र तरुणांना त्यांचे आकर्षण वाटते. तर ४५च्या आत असलेल्या राहूल गांधीचे त्यांना अप्रूप नाही. याच तरुण पिढीने मोठ्या प्रमाणात मोदींना मतदान केले आहे. त्यातील आपल्याकडील शहरात राहाणारा मध्यमवर्गीय यावेळी मतदानात सक्रिय होता. देशातील ३५ कोटी संख्येने असणार्‍या या मध्यमवर्गीयाने आपले मतदान हे भाजपाच्या पदरात टाकले आहे. या मध्यमवर्गीयांचा जन्म हा मनमोहनसिंग यांच्या आर्थिक उदारीकरणातून झाला हे खरे असले तरी त्याची नाळ ही भाजपाशी आहे. त्याचबरोबर भाजपा व मोदी यांनी  सोशल मिडियाच्या माध्यमातून जी प्रचार यंत्रणा उभारली त्याचे यश या निवडणुकीत अधोरेखीत झाले आहे. सोशल मिडियाच्या जवळ असलेला तरुण आज मोदींच्या गळ्यातील ताईत झाला आहे ही बाब सत्ताधार्‍यांना मोठी धक्का देणारी ठरली. एकूणच पाहता देशात आता नमो युग सुरु झाले आहे. देशातील जनतेचा कौल योग्य की अयोग्य हे काळ ठरविल.
--------------------------------------          

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel