-->
संपादकीय पान शनिवार दि. १७ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
कॉँग्रेसनेच केला कॉँग्रेसचा पराभव!
------------------------------
स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वात वाईट कामगिरी यावेळी कॉँग्रेसने केली आहे. कॉँग्रेसचे यावेळी लोकसभेतील बळ ८०च्या आतमध्ये असेल. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या उत्तरप्रदेशात त्यांची खासदारांची संख्या दोनवर आली आहे. तर राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात येथील कामगिरी ही अत्यंत निराशाजनक ठरली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी हे पहिल्या दोन फेरीत पराभवाच्या छायेत होते. मात्र नंतर त्यांचा विजय नोंदविला गेला. अर्थात आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता. मात्र त्यानंतर केवळ तीन वर्षाच्या आतच इंदिरा कॉँग्रेस हा पक्ष नव्याने उभा राहिला व पुन्हा सत्तेवर आला. त्यामुळेे कॉँग्रेस पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत राहिला असला तरीही पराभवही त्यांनी चाखला आहे व अनेपेक्षित असे विजयही खेचून आणले आहेत. राजकारणात जय किंवा पराजय होणे हे राजकारणाचाच एक भाग झाला. कोणताच राजकारणी पराभवाने खचून जात नाही. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधी जबरदस्त मताधिक्याने विजयी झाले होते. त्यावेळी भाजपाच्या नशिबी केवळ दोनच जागा आल्या होत्या. मात्र त्यावरुन पुन्हा १८०वर झेप घेतली आणि सत्तेत आले. आता तर त्यांना स्वबळावर सत्ता मिळाली आहे. त्यामुळे राजकारणात आकड्यांची ही गणिते बदलत असतातच. कॉँग्रेसने असे अनेक चढउतार पाहिले. मात्र ज्यावेळी कॉँग्रेसने सत्तेत असताना माज केला त्यावेळी जनतेने त्यांना घराचा रस्ता दाखविला आहे. आणीबाणीत इंदिरा गांधींनी आपल्याकडील अधिकारांचा अतिरेक केला आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा राग आला. सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीतून जनता पार्टीचा जन्म झाला आणि इंदिरा गांधींंचा ऐतिहासिक पराभव झाला. यानंतर पुन्हा हा पक्ष सत्तेत आला असला तरी नंतर राजीव गांधींच्या वेळी ४०० जागा मिळवून सत्तेत आलेल्या कॉँग्रेस पक्षाने अनेक चुका केल्या. बोफोर्सचा   गाजलेला भ्रष्टाचार हा याच काळातला. एवढे पाशवी बहुमत मिळवूनही राजीव गांधींना सत्ता काही व्यवस्थीत सांभाळता आली नाही. यातून शेवटी कॉँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर आता झालेला हा मोटा पराभव म्हणावा लागेल. कॉँग्रेस पक्ष व गांधी घराणे यांचे नाते अतूट आहे. राहूल गांधींच्या निधनानंतर सोनिया गांधींनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारेपर्यंत फक्त या दरम्यानच्या काळात गांधी घराणे व कॉँग्रेस पक्ष यांची नाळ तुटली होती. परंतु सोनिया गांधींनी ही नाळ पुन्हा जोडली. २००४ साली भाजपाचा पराभव करुन सत्ता खेचून आणली. त्यावेळी रोजगार हमी योजना, शेतकर्‍यांची कर्ज माफीसारख्या योजना राबविल्यामुळे २००९ साली पक्षाला पुन्हा यश मिळाले. मात्र सलग दोनदा सत्ता मिळाल्यामुळे कॉँग्रेसच्या डोक्यात सत्तेची नशा भिनली आणि जनतेपासून गेल्या तीन वर्षात पक्ष वेगळा झाला. सर्वसामान्य कार्यकर्ता, पक्ष नेतृत्व यांच्यातील दरी वाढली. भ्रष्टाचाराची उघड झालेली करोडो रुपयांची प्रकरणे, या भ्रष्ट नेत्यांचा पाठीशी घालण्याची नेतृत्वाने केलेली चूक, बेकारीचे वाढलेले प्रमाण, अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ यामुळे जनतेला कॉँग्रेसचा वीट येणे स्वाभाविक होते. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे नव्याने आलेल्या २० कोटी तरुण मतदारांच्या अपेक्षा मोठ्या होत्या. त्या अपेक्षांची पूर्तता कॉँग्रेस पक्ष पूर्ण करण्यास असमर्थ ठरला. राहूल गांधींनी आपल्या नेतृत्वात कधी धडाडी दाखविली नाही. खरे तर सत्ता हातात असल्यामुळे राहूल गांधींना बरेच काही करता आले असते. मात्र त्यात ते कमी पडले आणि फक्त देशभर दौरे काढून विविध समाजाची पाहणी करण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे कॉँग्रेसचा पराभव हा त्यांच्या धोरणातूनच झाला आहे. भाजपाची वाढ ही यातूनच झाली. कॉँग्रेसने जर सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी केला असता तर तत्यांच्यावर सत्ता गमाविण्याची पाळी आली नसती. अर्थात यातून कॉँग्रेसचे नेतृत्व धडा घेणार का खरा सवाल आहे.
-------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel