-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १६ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
दानपात्र उघडणार...
-----------------------------
सोळाव्या लोकसभेचा निकाल आज लागेल त्यावेळी निवडणूक आयोगापासून ते राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते सुटकेचा निश्‍वास टाकतील. गेले दोन महिने देशातील राजकारण या निवडणुकांमुळे पूर्णपणे ढवळून निघाले होते. आता सर्वांचे लक्ष हे कोणाचे सरकार स्थापन होणार आणि पंतप्रधानांच्या खुर्चीवर कोण स्थानापन्न होणार याकडे लागले आहे. आता इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमुळे सायंकाळ पर्यंत देशातील निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल व सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरु होतील. यावेळी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियापासून ते सर्व प्रसिध्दी माध्यमांना आपल्या खिशात घालून एखाद्या निवडणुकीचा प्रचार कसा करायचा याचा एक नवा पायंडा पाडून दिला आहे. नरेंद्रभाईंसाठी देशातील प्रमुख भांडवलदारांनी आपल्या थैल्या ओतल्या आहेत. यावेळी भाजपाने अंदाजे पाच हजार कोटी रुपये सर्व यंत्रणेवर खर्च केले असावेत असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यातुलनेने सत्तेत असतानाही कॉँग्रेस पक्षाने कमी खर्च केला आहे. यामागचे महत्वाचे एक कारण म्हणजे कॉँग्रेस पक्ष सलग दोन वर्षे सत्ते राहिल्याने त्यांच्यात एक शिथीलता आली आहे. सत्तेत आहोत आणि आपण सहजरित्या निवडून येऊ शकतो अशी एक अंतस्थ गुर्मी देखील आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या प्रभावी प्रचार यंत्रणेपुढे कॉँग्रेसने सफशेल नांगी टाकली आहे. आपल्या हातातून यावेळी सत्ता गेल्यात जमा आहे अशी सुरुवातीपासूनच एक मनस्थिती कॉँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे यावेळी कॉँग्रेसचा पराभव हा नक्की आहे. यावेळच्या निवडणुकीत कॉँग्रेसची हतबलता, नैराश्य व लढण्याची संपलेली उर्मी यापूर्वी कधीच दिसली नव्हती. आता प्रश्‍न आहे तो प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआला स्पष्ट बहुमत मिळेल किंवा नाही? जर रालोआला स्पष्ट बहुमत मिळाले तर नरेंद्र मोदी यांचा शपथविधी कधी होणार हाच प्रश्‍न शिल्लक राहातो. सध्याचा एक्झीट पोलची आकडेवारी पाहता रालोआला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. मात्र एक्झीट पोल म्हणजे काही निकाल नव्हे. या पूर्वीच्या दोन्ही निकालात एक्झीट पोलच्या नेमके उलटे निकाल लागले आहेत. त्यामुळे नेमके काय निकाल लागतात याकडे सर्वांचीच उत्सुकता आहे. त्यामुळे जर रालोआला  बहुमत मिळाले नाही तर बहुमत सिध्द करण्यासाठी ते अन्य पक्षांना जवळ करण्यात ते यशस्वी ठरतील का, हा पुढचा प्रश्‍न आहे. अन्य पक्षांनी जर भाजपाला नाही व केवळ नरेंद्र मोदींच्या नावाला विरोध दर्शविला तर अशा स्थितीत नरेंद्र मोदींच्या ऐवजी एल.के.अडवाणी, राजनाथसिंग, सुषमा स्वराज यांची नावे पंतप्रधानपदासाठी पुढे येऊ शकतात. जर समजा भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला बहुमत मिळविण्यासाठी ओढाताण करुनही ते जर शक्य झाले नाही तर त्यांची सत्ता येण्यात अडचण ठरते. यापूर्वीही अटलबिहारी वाजपेयी यांना आपले बहुमत सिध्द करण्यासाटी एक मत कमी पडले होते आणि ते सरकार गडगडले होते. इतिहासाची ही पुनरावृत्ती होणार का? असे प्रश्‍न सध्या उद्भवतात. जर रालोआला आपले बहुमत सिध्द करता आले नाही वा त्यांना सरकार स्थापनेसाठीची आवश्यक संख्या जमविता आली नाही तर तिसर्‍या कोणाचे नाव पंतप्रधानपदासाठी येऊ शकते. या नावांमध्ये शरद पवार, जयललिता, ममता, पटनाईक हे आघाडीचे खिलाडी ठरु शकतात. यापैकी कोणथआ उमेदवार कॉँग्रेस व तिसर्‍या आघाडीचा पाठिंबा घेऊ शकतो त्यावर त्याची निवड ठरु शकते. अशा स्थितीत शरद पवारांसारख्या नेत्याचे पारडे जड राहू शकते. मात्र पवारांकडे त्यांच्या पक्षाची ताकद कमी आहे हाच काय तो त्यांचा कमकुवतपणा. त्याच्या जोडीला पवारांची विश्‍वासर्हता दिल्ली दरबारी कोणीच मोजत नाही हे एक आणखी एक दुदैव. मात्र शरदराव कॉँग्रेस व तिसर्‍या आघाडीचा पाठिंबा मिळवू शकतात. तसेच आज ज्या भांडवलदारांनी मोदींवर पैसे लावले आहेत त्यांना शरद पवार हे केव्हांही पसंत पडू शकतील. तसेच एक मराठी पंतप्रधान होतोय असे स्पष्ट दिसताच शिवसेना व मनसे हे दोन्ही पक्ष आपला पाठिंबा पवारांना देतील. अर्थात या जर तर च्या गप्पा झाल्या. आपल्याकडील मतदार हा सुज्ञ आहे आणि तो दरवेळी योग्य मतदारच निवडतो. आपल्याकडे केंद्रात कधी सरकार स्थापन झाले नाही अशी स्थिती झालेली नाही. गेल्या वीस वर्षात मतदारांनी एकाच पक्षाच्या हाती सत्ता देण्याचे बंद केले आहे. कारण एकाच पक्षाच्या हाती सत्ता अनिर्बंधपणे देणे भल्याचे नाही असे मतदारांना वाटते. मात्र आपल्याकडील राजकारण्यांनी हा कौल मान्य करुन खिचडी सरकार स्थापन केली आणि ही सरकार आपला कालावधी पूर्ण करीत आहेत. यावेळी देखील कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने मतदार आपला कौल देणार नाहीत असेच दिसते. देशातील ८० कोटी मतदारराजाने मतदानाचे हे दान नेमके कोणच्या बाजूने आहे हे आज उघड होईल. मतदाराचे हे दानपात्र नेमके कोणाच्या बाजूने आहे हे आज जनतेपुढे येईल. हे दानपात्र उघडल्यावर जगातील ८० कोटी मतदार असलेल्या या सर्वात मोठ्या लोकशाहीचा सोहळा संपुष्टात येईल. या दानपात्रात काय दडले आहे, त्याची भविष्ये अनेक वर्तविली गेली, अनेक सर्व्हे झाले. आता मात्र प्रत्यक्षात निकालाची वेळ समीप आली आहे....
-----------------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel