-->
प्रकाशाचा सण

प्रकाशाचा सण

बुधवार दि. 07 नोव्हेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
प्रकाशाचा सण
दिवाळी म्हणजे आशा, आकांक्षा वृध्दींगत करणारा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. आपल्या मनात असलेले दुख:, निराशा क्षणभर विसरुन आपण हा सण साजरा करतो. यामागे भावना असते ती आगामी चांगल्या भविष्यवेधी कालखंडाची, उष:कालाची. असा हा सण साजरा करीत असताना आपल्या मनात नेहमी आनंदच असतो. शेतकरी खुषीत असतो कारण या काळातच पीक चांगलेच बहरुन आलेले असते. यंदा मात्र सर्वच ठिकाणी चांगले पीक आलेले नाही. राज्यातील अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे. कामगार आपल्या वर्षाची पुंजी एकत्र करुन नवीन वस्तू खरेदी करतो, भविष्याची तरतुद करण्यासाठी सोन्याची खरेदी करतो. अशा प्रकारे दिवाळीत आपण आनंदाचे क्षण जगत असताना वर्षात आलेल्या कडू आठवणी विसरता येत नाहीत. केंद्राततील नवीन सरकारला आता साडे चार वर्षे झाली आहेत तर राज्यातल्या सरकारला चार वर्षे लोटली आहेत. परंतु जनतेला फारसा काही बदल झालेला दिसत नाही. महागाईचा आलेख तर सतत चढताच आहे. पेट्रोल डिझेल आता शंभरीच्या दारात पोहोचले आहे. सहा महिन्यांपूर्वीच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाचे पानिपत झाले. देशातील असहिष्णुततेच्या वातावरणाचा निषेध करीत सुमारे 200 कलाकार, साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले आहेत. परंतु सरकार यातून फारसा बोध घेतील असे दिसत नाही. महाराष्ट्र राज्य आपण पुरोगामी म्हणवतो मात्र राजधानीच्या शहरापासून केवळ शंभर किमी अंतरावर कुपोषणाने लहान मुले मृत्यूमुखी पडत आहेत. अनेकांचे उघड्यावर पडलेले जीवन आणि उघड्यावर पडलेले संसार जिथे फोडणीला तेल नाही, चूल पेटवायला रॉकेल नाही, तिथे दिव्यात घालायला तेल येणार तरी कुठून! संसाराची विस्कटलेली घडी बसवायला किती दिवस जातील कुणास ठाऊक! त्यांच्याकडेदेखील छोटी मुले असतीलच. आपल्याला हा आनंद उपभोगता येत नाही म्हणून काही अश्रू ढाळतील. काही कामाला लागतील. कशी बरं करतील साजरी या वर्षाची दिवाळी? आज अजूनही सत्तर वषार्र्च्या स्वातंत्र्यानंतरही आपल्याकडे सर्व वाड्यांवस्त्यांवर वीज पोहोचलेली नाही. आज आपल्या देशात विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्या पश्‍चात कुटुंबाचे काय हाल होतील याचा जराही विचार न करता धडाधड मृत्यूला कवटाळणार्‍या त्या शेतकर्यांच्या घरात या दिवाळीत किती पणत्या पेटतील? आणि पेटल्या तरी त्यांना लगेचच लक्ष्मी प्रसन्न होईल? कशी होईल त्यांच्या घरची दिवाळी? दिवाळीच्या स्वागतासाठी आकाशाच्या दिशेने दिवा सोडताना आपण तो नेमका कोणासाठी लावत आहोत? याची जाणीव आपल्याला राहिली आहे का? जिथे आधीच प्रकाशाचे साम्राज्य आहे, तिथे आणखी झगमगाट करण्यात काय अर्थ आहे? मग अंधार नेमका आहे कुठे? नसेल तर दिवा लावायचाच कशासाठी? किंबहुना अंधार कोठे आहे याचा विचार करण्याइतकीही वेळ आपल्याकडे राहिलेला नाही किंवा जाणीवपूर्वक त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. ही वस्तुस्थिती आहे. सरकारला मग ते सरकार केंद्रातले असो किंवा राज्यातले त्यांना अशा उपेक्षितांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. दुदैवाची बाब म्हणजे भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्येची संख्या वाढली आहे. दिवाळीच्या या प्रकाशात अंधाराची चर्चा कशाला? असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. मुंबईसारख्या महानगरात तर सतत आकाशदिव्यांचा झगमगाट असतो, पण दिवाळीच्या दिवसांत सर्वत्र आकाशदिव्यांच्या रांगा उजळल्या असतानाच लालबत्तीच्या भेसूर प्रकाशाआड ओथंबलेल्या अश्रूंचा ओलावा कधी कोणाला जाणवतो? त्या जव्हार मोखाड्याच्या पाड्यांवर कुपोषणाचे संकट कायम असते. तिथल्या निष्पाप जीवांना प्रकाशाचा खरा अर्थ सांगण्याची हीच वेळ आहे. असे आपल्याला कधीच कसे वाटत नाही? राजाला रोजच दिवाळी असते आणि दीनदुबळ्यांसाठी रोजच शिमगा असतो त्यांच्या वाट्याला वर्षातून किमान एक दिवस प्रकाशाचा किरण पसरावा यासाठी आपल्या संवेदना कधीच कशा हेलावत नाही? एका टोकाला चंगळवादाचा कळस गाठला जात असतो. दुसरीकडे याकडे अचंबित आणि हतबलपणे पाहणारे गरीब, अश्राप जीव दिसत असतात. शेजारच्या अंधाराचे भान आपल्याला नसते. या दीपावलीत लक्ष दिव्यांच्या ज्योतीचे तेज उधळीत दीपावलीचे आगमन व्हावे आणि सृष्टीलाच चैतन्याचे स्वप्न पडावे, अवघ्या भूतलावर आनंदाच्या रंगाचीच बरसात व्हावी, त्याप्रमाणे मनामनाचे कोपरे या आनंदसरींनी न्हाऊन निघावे. दैनंदिन व्यापांचा क्षणभर विसर पडून मांगल्याच्या पदकमलांनी अंत:करण निर्मल व्हावे. कोणा दु:खितांच्या काळजावर या आनंदाची फुंकर मारावी. दुभंगलेली मने सांधण्यासाठी दिवाळीच्या महाउत्सवाचे सुंदर निमित्त व्हाव. दिवाळी वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सुख-दु:खाच्या पाठशिवणीचा आणि थंडी, वारा, ऊन, पाऊस, प्रतिकूलता या सगळ्याचा सामना केल्यानंतरच येते कारण दिवाळी प्रत्येकाचा मनातील आशादीप चिरकाल प्रकाशमान करण्यासाठी येते. अशा प्रकारे एकीकडे अंधार असताना या जगात काही प्रकाशमान बाबीही घडत असतात. त्याच बाबी उराशी बाळगून आपण हा प्रकाशाचा उत्सव साजरा करु या.
---------------------------------------

0 Response to "प्रकाशाचा सण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel