
एनडीटीव्हीचा बळी
दि. 28 ऑगस्टच्या मोहोरसाठी चिंतन
एनडीटीव्हीचा बळी
माध्यम क्षेत्रातील आघाडीची व आपले स्वातंत्र्य जपलेली कंपनी एनडीटीव्ही इंडियावर अदानी समूहाने ताबा मिळविण्यासाठी जी व्यूहरचना आखली होती त्यात ते जवळपास यशस्वी झाले आहेत. आता फक्त ही कंपनी अदानी समूहाच्या घशात जाणे बाकी आहे, सध्या ही कंपनी अदानी समूहाच्या तोंडापर्यंत आली आहे. गेल्या काही वर्षात अदानी ज्या प्रकारे कंपन्या ताब्यात घेत आहेत ते पाहता एनडीटीव्ही काबीज करणे त्यांना फारसे अवघड ठरणार नाही. खरे तर अदानी यांच्या समवेत रिलायन्सनेही ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतु त्यात त्यांना फारसे काही यश आले नाही. एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणब रॉय व राधिका रॉय यांनी आपल्याला यासंबंधी कोणतीही माहिती नसल्याचे व ही कंपनी विकणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, एनडीटीव्ही च्या प्रवर्तकांच्या इच्छेविरुध्द ही कंपनी ताब्यात घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी समूह एनडीटीव्हीवर ताबा घेणार अशा बाजारात अफवा पिकल्या होत्या. मात्र रॉय यांनी याचा स्पष्ट इन्कार केला होता. मात्र त्यांच्या अपरोक्ष या सर्व घडामोडी घडल्या आहेत व एक प्रकारे बळजबरीनेच ही कंपनी ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे. गेले काही दिवस एनडीटीव्हीच्या समभागांना शेअर बाजारात जबरदस्त मागणी होती त्यामुळे हा शेअर तेजीत होता. गेल्या काही दिवसात हा समभाग तब्बल ३० टक्क्याहून जास्त वधारलाही होता. त्यामुळे शेअर बाजाराला याची अगोदर खबर लागली होती हे नक्की. अदानी समूहातील तीन कंपन्यांनी एनडीटीव्ही मधील २९ टक्के भांडवल मागच्या दरवाजाने खरेदी केले व अजून २६ टक्के भांडवल खरेदी करण्याचा खुला प्रस्ताव ठेवला. एनडीटीव्हीला गेल्या काही वर्षात कर्ज रुपाने पैसे देणाऱ्या कंपन्याच अदानी यांनी खरेदी केल्या व त्यांच्याकडील कर्जाचे रुपांतर समभागात केले, परिणामी अदानी यांच्याकडे एनडीटीव्हीचे २९ टक्के भांडवल आले. हे झाल्यावर लगेचच त्यांनी विद्यमान समभागधारकांकडून २६ टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा केली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अदानी यांच्याकडे एनडीटीव्हीची ५५ टक्के मालकी येईल. काही काळापूर्वी राय यांच्यामागे इडीचा ससेमीरा लागला होता. या घटना फार बोलक्या आहेत. सध्या रॉय यांच्याकडे ३२ टक्के समभाग आहेत. त्यांनी आपल्याकडील समभाग विकले नाहीत तरी अदानी यांनी कंपनीवर ताबा मिळविल्यावर रॉय यांच्या भांडवली वाट्याचे काही महत्व राहाणार नाही. यासंबंधी प्रणब रॉय हे कायदेशीर आव्हान देण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासंबंधी त्यांना कितपत यश येईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. यासंबंधी सेबी देखील कोणती भूमिका घेते याकडे लक्ष ठेवावे लागेल. कारण अदानी यांनी अनेक कायदेशीर पळवाटा काढून ही कंपनी ताब्यात घेतली आहे. गेल्या काही वर्षात रिलायन्स व अदानी या दोन समूहांनी एनडीटीव्ही खरेदी करण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यात अदानी यांची सरशी झाली असेच म्हणावे लागेल. २००८ साली अंबानींच्या एका बेनामी कंपनीच्या मार्फत एनडीटीव्हीला २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. परंतु अंबानी यांची ही कंपनी असल्याचे उघड झाल्यावर प्रणब रॉय सावध झाले व पुढे अंबानी यांना काही करता आले नाही. मात्र अदानी यांनी शक्य करुन दाखविले. अंबानी व अदानी या दोघांना हीच कंपनी घेण्यात का रस होता, असा प्रश्न अनेकांना पडेल. अंबानी यांच्या ताब्यात सध्या देशातील वृत्तचॅनेल्सपैकी ७० टक्के चॅनेल्स ताब्यात आहेत. म्हणजे अंबानी हे यातील अनभिषिक्त सम्राट समजले जातात. त्यांना ही कंपनी घेण्यात रस यासाठी की एनडीटीव्ही ही वृत्त चॅनेल्समधील एक प्रतिष्ठित कंपनी समजली जाते. ती जर ताब्यात आली तर निश्चितच त्यांच्या प्रतिष्ठेत भर पडणार होती व एक चांगला ब्रँड त्यांच्या हाती लागणार होता. अदानी यांनी मोदी सत्तेत आल्यापासून आपला साम्राज्यविस्तार फारच झपाट्याने केला आहे. बंदरे, विमानतळ, वीज, धातू, रस्ते, सीमेंट अशा प्रत्येक क्षेत्रात अदानी समुह प्रवेश करीत आहे. यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षात कंपन्या ताब्यात घेऊन संबंधित उद्योगात प्रवेश केला आहे. आजच्या घडीला त्यांनी २,३०,००० कोटी रुपयांची कर्जे घेऊन या कंपन्या विकत घेतल्या आहेत. त्यामुळे अदानी समूह कर्जाच्या डोंगरावरच उभा आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. अर्थात हेकर्ज काही वर्षात सरकार माफ करुन अदानी कर्जमुक्त होतीलही. अदानी समूहाला अनेक प्रयत्न करुनही माध्यम उद्योगात प्रवेश करता आला नव्हता. माध्यम उद्योगात प्रामुख्याने चॅनेल्समध्ये त्यांना प्रवेश करुन त्यांना आपली प्रतिमा सुधारावयाची आहे. कारण सध्याच्या घडीला देशातील एक क्रमांकाचे श्रीमंत होऊनही अदानींना प्रतिष्ठा नाही. ही प्रतिष्ठा कमविण्यासाठी त्यांना माध्यम उद्योग आपल्या हातात पाहिजे आहे. तसेच त्यांची उद्योजकीय स्पर्धा ही अंबानी यांच्यांशी असते. अंबानी यांनी जी माध्यम उद्योगात आपली मक्तेदारी निर्माण केली आहे त्याला आव्हान देण्याची मनिषा अदानी यांची आहे. त्यासाठी त्यांनी एनडीटीव्ही ही कंपनी ताब्यात घेऊन या उद्योगात आक्रमक पाऊल टाकले आहे. ही कंपनी ताब्या घेण्यासाठी अंबानी-अदानी यांच्यातील उद्योजकीय स्पर्धा देखील कारणीभूत ठरली आहे. मात्र या दोघांच्या स्पर्धेत एनडीटीव्ही सारखी एक स्वतंत्र पत्रकारिता करणारी कंपनी एका उद्योगसमूहाच्या दावणीला बांधली गेली, याचे वैष्यम्य वाटते. एनडीटीव्हीतील या व्यवस्थापन बदलामुळे एका चांगल्या वृत्त चॅनेल्सचा बळी गेला आहे.
0 Response to "एनडीटीव्हीचा बळी"
टिप्पणी पोस्ट करा