-->
मायाबाजारातील सट्टेबाज

मायाबाजारातील सट्टेबाज

दि. 21 ऑगस्टच्या मोहोरसाठी चिंतन
मायाबाजारातील सट्टेबाज शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने गेली चार दशके शेअर बाजारावर अधिपत्य गाजवणारा मोठा सट्टेबाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील शेअर बाजार हा एक मोठा मायाबाजार आहे. अर्थव्यवस्थेच्या व कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीनुसार तेथे कंपन्यांच्या समभागांच्या शेअर्सची वध-घट होत असते. मात्र या खेळात यशस्वी होणे सोपे नसते. त्यासाठी शेअर बाजाराची नस ओळखणे फार महत्वाचे ठरते. शेअर बाजारात जसे शास्त्रोक्त पध्दतीने गुंतवणूक करणारे असतात तसेच केवळ सट्टा खेळणारेही असतात. बिगबुल राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूकदार व सट्टेबाज याचे अनोखे मिश्रण होते. ते कधी समभागांची प्रथम विक्री तसेच नंतर खरेदी करुन नफा कमवित तर काही मोजक्या कंपन्यांचे समभाग दीर्घकाळासाठी खरेदी करुन नफा कमवित. १९८० साली त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सुरुवातीला केवळ पाच हजारांची गुंतवणूक केली होती. आता त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचा पोर्टफोलियो तबब्ल ४० हजार कोटी रुपयांचा होता. अर्थात त्यांनी वेळोवेळी गुंतवणूक करीत पोर्टफोलियो एवढा वाढवित नेला आहे. पाच हजारांचीच गुंतवणूक एवढी वाढलेली नाही हे देखील वास्तव नाकारता येणार नाही. कधी गुंतवणूक तर कधी सट्टा करीत त्यांनी आपला पोर्टफोलियो एवढ्या स्तरावर नेला. त्याचबरोबर शिक्षणाने ते चार्टर्ट अकाऊंटन्ट असल्याने त्यांना शेअर बाजारातील आकड्यांचा खेळ करताना खूप मदत झाली हे वास्तव असले तरी कोणते शेअर खरेदी करायचे किंवा कोणते शेअर शॉर्ट करायचे यासाठी जी बुध्दीमत्ता लागते तेच त्यांचे खरे भांडवल होते. एका दृष्टीने पाहता त्यांनी चार दशके बाजारात जे पैसे कमविले ते आपल्या बुध्दीच्या जोरावरच, म्हणजे बैध्दीक संपत्तीच्या जीवावर. रकेश झुनझुनवाला यांचे बाजारासंबंधी काही फंडे होते व त्यावर ते फर्म असायचे. महत्वाचे म्हणजे ते स्वत: सट्टेबाजी करीत असले तरी अन्य कुणालाही यात पडू नका असे सांगायचे. कारण सट्टेबाजीत धोका जास्त आहे हे त्यांनी ओळखले होते. त्यापेक्षा चांगल्या कंपन्या निवडून त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करा असे ते गुंतवणूकदारांना आवर्जुन सल्ला द्यायाचे. त्यांनी देखील अशा मार्गाने रग्गड पैसा कमविला होता. त्यांच्या त्यावेळच्या मुलाखती पाहिल्या त ते स्पष्ट दिसते. बिगबुल हर्षद मेहताच्या काळात मात्र राकेशभाई हे मंदीवाले दलाल म्हणून ओळखले गेले होते. त्यानंतर ते नेहमी तेजीचे समर्थन करत होते तसेच तेजीबाबत आशावादी होते. अर्थात गरजेनुसार त्यांनी बाजारात आपले पैसे लावले. प्रा मधु दंडवते अर्थमंत्री असताना त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी केलेली गुंतवणूक ही फार फायदेसीर ठरली होती. हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यांचा असलेला तीन कोटीचा पोर्टफोलियो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तब्बल २० कोटी रुपयांवर गेला होता. हे पैसे कसे वाढले, त्यासाठी आपण कसे बौध्दिक चातुर्य दाखविले याचा किस्सा ते नेहमी आपल्या भाषणात सांगत असत. हर्षद मेहताने जसा गैरव्यवहार केला तसे ते कुठेही अडकले नाहीत, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. सट्टेबाजी करताना त्यांनी अनेकदा गैरव्यवहार केलेही असतील परंतु ते कधीही कायद्याच्या कचाट्यात सापडले नाहीत. एकादी कंपनी, जी भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करणार असेल ती बरोबर ते हुडकून काढीत व त्याचे समभाग खरेदी करण्यास प्रारंभ करीत. काही काळाने खरेदीच्या रेट्यामुळे हे समभाग वाढताच झुनझुनवाला त्याची बातमी वृत्तपत्रात कशी येईल याची दक्षता घेत. त्यानंतर ते समभाग विकून मोकळे होत. त्यामुळे चढत्या दराने गुंतवणूकदारांच्या गळ्यात शेअर पडत असत. अर्थात असा प्रकारची फसवणूक ही शेअर बाजारात अनेक दलाल करीत असतात, मात्र राकेश झुनझुनवाला या नावामागे एक वलय होते त्यामुळे त्यांनी केलेली गुंतवणूक कंपनी ही गुंतवणूकदारांसाठी डार्लिंग असे. यात अनेक जण पैसे कमवित असत किंवा गमवितही असत. झुनझुनवाला नेहमी आपल्या मुलाखतीत सांगत असत, शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या दहा लाख लोकांना विचारल्यास ते आपण पैसे कमविल्याचे सांगतील, मात्र प्रत्यक्षात केवळ काही हजार लोकांनी पैसे कमविले असतील. ही वस्तुस्थितीच आहे. शेअर बाजारात पैसा कमविणे व तोही बुद्दीचातुर्याने, ही बाब सोपी नाही. यात मात्र झुनझुनवाला यशस्वी झाले. असे झुनझुनवाला सतत निर्माण होत नाहीत. त्यांना काही भारतातले वॉरेन बफेट म्हटले जाई, त्याचा त्यांना राग येत असे. ते म्हणायचे मी कोणाचाही क्लोन नाही. आणि ते खरेच होते. झुनझुनवाला यांनी आपल्या भोवती गुंतवणूकदारांचे एक वलय निर्माण केले होते. ते गुंतवणुकीसाठी ज्या कंपन्या निवडायचे त्यात खरे कौशल्य होते. त्यांनी एकदा टायटन कंपनीचे समभाग शंभर रुपयावर असताना खरेदी केले होते आणि टायटनचा समभाग तब्बल हजार रुपयांच्या वर गेला होता. ते ज्या प्रकारे कंपन्या निवडीत त्यातील त्यांचे कौशल्य यातून सिध्द होते. गेली काही वर्षे मोदी सत्तेत आल्यापासून ते तेजीबाबत फारच आशावादी होते. त्यांचे हे भविष्य खरेही ठरले. कारण कोरोनानंतर तुफान तेजी येणार ही त्यांची भविष्यवाणी सत्यात उतरली होती. देशाने ९१ साली देशात उदारीकरणाचे युग सुरु झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा पाया वाढत गेला, त्यापूर्वी शेअर बाजार हा काही मर्यादीत लोकांचा खेळ होता. आजही आपल्याकडे जेमतेम पाच कोटी गुंतवणूकदार आहेत. ही संख्या वाढतच जाणार आहे आहे. मात्र शेअर बाजाराच्या वाढीबरोबर झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलियोचीही वाढ करुन घेतली. त्यानंतर गेल्या वीस वर्षात मध्यमवर्गीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात बाजारात उतरु लागला आणि झुनझुनवालांचे ते भक्त झाले. झुनझुनवाला ही काही आसामी वेगळीच होती. पंतप्रधान मोदींनी ते भेटावयास गेले त्यावेळी ते चुरघळलेला शर्ट घालून गेल्याबद्दल त्यांच्यावर सोशल मिडियात टीका झाली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले होते, दहा रुपये खर्च करुन इस्त्री केल्याने झुनझुनवाला काही बदलणार नव्हता. करोडो रुपये कमवूनही झुनझुनवाला हे झुनझुनवालाच राहिले...

0 Response to "मायाबाजारातील सट्टेबाज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel