-->
चटका लावणारा मृत्यू

चटका लावणारा मृत्यू

गुरुवार दि. 14 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
चटका लावणारा मृत्यू
राजकीय, सामाजिक क्षेत्रात सातत्याने वावरणारे तर कधी वादग्रस्त ठरलेले भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करणे ही बाब चटका लावणारी आहे. तयंच्या या आत्महत्येचे कारण समजले नसले तरी काही जणांच्या सांंगण्यानुसार, त्यांच्यापुढे अनेक आर्थिक विवंचना होत्या व त्यातून बाहेर पडण्यासाठी हे कृत्य केले असावे. परंतु भय्यू महाराजांसारखे जन्मत: सधन असलेल्यांना आर्थिक विवंचना कसली असावी असाही प्रश्‍न पडतो. त्यंनी सामाजिक सेवेसाठी काही लोकांकडून पैसे घेतले होते व ते वेळेत त्यांना परत देऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर मोठा मानसिक तणाव होता. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले असे म्हटले जाते. परंतु हे सर्व अंदाज झाले. मात्र भय्यू महाराजांची आत्महत्या का झाली व त्याची कारणे शोधण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यामागे मोठ्या प्रमाणावर भक्तगण आहेत. तसेच त्यांनी उभारलेल्या विविध संस्था आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्राचा पसारा मोठा होता. प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपासून ते पारधी समाजातील मुलांसाठी सुरु केलेली शाळा, सामुदायिक विवाहांची चळवळ अशी अनेक कामे नजरेत भरणारी आहेत. अन्य बाबा-महाराजांप्रमाणे ते नव्हते, हे मात्र नक्की. एक तर ते मध्यप्रदेशातील घरंदाज घराण्यातील होते. आर्थिकदृष्ट्या घरचे सधन होते. सध्या अनेक बाबा-महाराज पैसा कमविण्यासाठी अशी रुपे घेतात. त्यापैकी ते नव्हते. ते काही संदर्भात वादग्रस्त ठरले हे विसरता येणार नाही. परंतु त्यांनी पैसा कमविण्यासाठी महाराजगिरी केल्याचे कधी एैकिवात नव्हते. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीच हिंदुत्वाचा पुरस्कार केला नाही तर सर्वधर्मसमभावाच्या बाजूने ते होते. असा प्रकारचे महाराज हे वेगळेच होते. त्यामुळे सध्या जे बाबा-महारांजे पीक आहे आहे त्यापैकी ते नव्हते. समाजात शांतता नांदावी व त्यासाठी सर्वधर्मसभाव असणे गरजेचे आहे हे ओळखून त्यांनी ठिकठिकाणी सर्वधर्मसमभावाचे मेळावे देखील घेतले होते. त्यांचे राजकीय क्षेत्रात चांगलेच वजन होते. अनेक राजकीय पक्षांचे नेते त्यांचे चांगले मित्र होते व त्यांना ते वेळोवेळी राजकीय सल्ला देत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना भय्यू महाराजांचे मोठेे प्रस्थ होते असे बोलले जाई. परंतु त्यानंतरही अनेक राजकारण्यांचे व मंत्र्यांचे ते सल्लागार कम गुरु होते. अण्णा हजारे यांच्या उपोषणाची समाप्ती, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी केलेल्या सद्भावना उपोषणाची सांगता असा अनेक कार्यकार्यक्रमांची सांगता त्यांच्या हस्ते झाली होती. तयंनी अनेक रचनात्मक व समाजसेवेची कामे केली. त्यामुळे ते सर्वांचे लक्षात राहातील.
वरुणराजा रुसला का?
यंदा पावसाचे अगदी वेळेवर आगमन झाले खरे परंतु आता गेले चार दिवस त्याने दडी मारल्याने वरुण राजा रुसला की काय अशी शंका येऊ लागली आहे. 9, 10 व 11 जून रोजी तुफान पाऊस पडेल हा हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला आहे. खरे तर त्या दिवशी वातावरण पावसाळीच असल्यासारखे होते. परंतु प्रत्यक्षात मात्र पावसाने दडीच मारली. शेतकर्‍यांनी पहिल्या पावसाच्या भरवशावर पेरणी आता पूर्ण केली आहे. पुढील पंधरा दिवसात चांगला पाऊस अपेक्षित आहे. तो न झाल्यास शेतकर्‍यांवर मोठी नामुष्की येईल. बहुदा अशी पाळी येणार नाही अशी अपेक्षा करुया. गेले दोन वर्षे पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे दुष्कालाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. शहरातही पिण्याच्या पाण्याची पारशी बोंब नाही. हवामानखात्याच्या अंदाजानुसार यंदाही चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा सात जूनला वेळेवर पाऊस सुरु झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पहिल्याच पावसात पावसाचा चांगला जोर होता. मात्र आता त्याचा वेग काहीसा मंदावल्यासारखे दिसत आहे. परंतु हा वेग येत्या काही दिवसात वाढेल असा अंदाज आहे. येत्या आठवड्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. तसे झाले तर यंदाची पेरणी वेळेत होऊन तिचा फायदा होईल. रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हटले जाते. आता भाताचे पिक कमी झाले असले तरीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचेच उत्पादन घेतले जाते. शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातही भाताचेच पावसाळी पिक हे महत्वाचे आहे. गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे देशात विक्रमी कृषी उत्पन्न आले आहे. यंदा देखील त्याची पुनरावृत्ती व्हावयास हरकत नाही असे सध्या तरी वातावरण आहे. यंदा पहिल्या पावसाने लगेचच संपूर्ण राज्य व्यापले आहे. दुष्काळी मराठवाडा व विदर्भात चांगला पाऊस झाल्याने समाधान व्य्क्त झाले आहे. कोकणासह मुंबईत दरवर्षी विक्रमी पाऊस पडतो. यंदा देखील गेल्या वर्षीचा विक्रम मोडला जाईल असा अंदाज आहे. कोकणात आपल्याकडे एवढा पाऊस पडूनही ते पामी अडवले जात नाही. बहुतांशी पाणी समुद्राला वाहून जाते. त्यादृष्टीने विचार करता कोकणातील पाणी जिरविल्यास त्याचा दीर्घ कालीन उपयोग होईल. सध्या तरी रुसलेल्या वरुणराजासाठी प्रर्थना करु या.
-----------------------------------------------------------------   

0 Response to "चटका लावणारा मृत्यू"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel