-->
वैचारिक हत्या

वैचारिक हत्या

गुरुवार दि. 07 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
वैचारिक हत्या
नामवंत कन्नड पत्रकार आणि बंगळुरू येथून प्रकाशित होणार्‍या लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश (वय 55 वर्षे) यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असून देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या चारही हत्या या वैचारिक हत्या असून त्यांचा विचार संपविण्यासाठी केलेला तो भ्याड हल्ला होता. अर्थाच अशा प्रकारे हत्या करुन कोणताच विचार संपत नसतो, हे हल्लेखोरांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात गणपतींचे विसर्जन करीत असताना देशातून डावा विचाराचे विसर्जन करण्यासाठी केलेली ही हत्या आहे. परंतु विसर्जन केल्यावरही गणपती दरवर्षी येतोच त्याप्रमाणे हत्या करुन डावा विचार संपणार नाही. विचारांचा मुकाबला हा विचारानेच करावयाचा असतो, त्यात जर हत्येचे अस्त्र उगारले तर ती चिडचीड व वैचारिक अगतिकता व्यक्त होते. गौरी लंकेश यांचे राजराजेश्‍वरी भागात घर असून तिथेच त्यांच्यावर रात्री 8 वाजताच्या सुमारास हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या वर्मी लागल्याने त्या जागीच कोसळल्या व त्यांच्या मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रा. कलबुर्गी यांच्यावरही अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. देशात उजव्या विचारांच्या राजकारणाच्या विरोधात बोलणार्‍या आणि लिहिणार्‍या विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. अर्थातच हे हल्लेखोर उजव्या विचारांचे समर्थन करणारे आहेत, यात काहीच शंका नाही. कारण गौरी लंकेश या उजवी विचारसरणी व हिंदुत्ववादी राजकारणाच्या कडव्या समीक्षक म्हणुन ओळखल्या जातात. कन्नडमध्ये प्रकाशित होणार्‍या आपल्य साप्ताहिकातून त्या उजव्या विचारसारणीवर कडाडून हल्ला करीत होत्या. या साप्ताहिकाची स्थापना गौरी लंकेश यांचे वडील पी. लंकेश यांनी 1960 मध्ये लंकेश पत्रिके या नावाने केली होती. ते कन्नडमधील नामवंत कवी आणि लेखक होते. लंकेश पत्रिकेची ओळख सुरुवातीपासूनच व्यवस्थाविरोधी, जातव्यवस्थाविरोधी आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे पुरस्कार करणारे, अशी होती. 2000मध्ये वडीलांच्या निधनानंतर गौरी लंकेश आणि त्यांचा भाऊ इंद्रजित लंकेश यांच्यात वाद झाल्यामुळे या पत्रिकेचे दोन भाग झाले. त्यापैकी एकाच्या गौरी लंकेश या संपादिका होत्या. संपादिका बनल्यानंतर गौरी लंकेश प्रस्थापित व्यवस्थेविरोधात, धर्माच्या सकुंचित राजकारणाची कठोर समीक्षा करणारे लेख लिहित असत. विशेष म्हणजे या पत्रिकेद्वारे शासन किंवा इतर कोणाकडूनही जाहिरात घेतली जात नाही. एकुण 50 जण या पत्रिकेत काम करतात. दर आठवड्याला प्रकाशित होणार्‍या या साप्ताहिकामध्ये गौरी लंकेश संपादकीय लेख लिहित असत. त्यांचा शेवटचा लेख, कशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवून समाजात धार्मिक तणाव निर्माण केला जातो, याविषयी होता. माध्यम स्वांतत्र्यांवर येणार्‍या निर्बंधाविरोधातही त्या सातत्याने आपला आवाज उठवत असत. केंद्रातील मोदी सरकारच्या त्या कडव्या विरोधक म्हणून ओळखल्या जात होत्या. गौरी लंकेश या विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्त वाहिन्यावर प्राइम टाइममध्ये होणार्‍या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांच्या सहभाग असायचा. त्या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर देशातील डाव्या विचारसरणीचे साहित्यिक, पत्रकार आणि विचारवंत याच्यांवर हल्ले वाढले आहेत. त्यातच आता बंगळुरू येथील ज्येष्ठ संपादक गौरी लंकेश यांची मारेकर्‍यांनी घरात घुसून गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. सोशल मिडयावर या घटनेचा जोरदार निषेध होत आहे. लंकेश यांनी भाजपच्या काही नेत्यांविरुद्ध लिखाण केल्याबद्दल खासदार प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये लंकेश यांना दोषी ठरविण्यात आले होते. लंकेश यांचे बंधू इंद्राजित यांनी लंकेश यांच्याविरुद्धचे बदनामीचे खटले सीबीआयकडे चालवण्यास देण्याची मागणी मध्यंतरी केली होती. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी ज्येष्ठ सहकारी आणि बंगळुरूचे शान असलेल्या गौरी लंकेश यांना गमावल्याचे दु:ख असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकात कॉग्रेसचे सरकार आहे व कायदा व्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असल्यामुळे गौरी यांच्या मारेकर्‍यांना लवकरच गजाअड करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. प्रा. कलबुर्गी यांच्या देखील मारेकर्‍यांना अटक करण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे लंकेश यांचे देखील मारेकरी देखील खुले आम फिरतील अशी व्यक्त होणारी भीती काही खोटी नाही. आजवर ज्यांचे वैचारिक खून झाले त्या डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे मारेकरी देखील मोकाट आहेत. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी देखील आता जामीनावर सुटले आहेत. तर कॉ. पानसरे यांचे हत्यारे देखील मोकाट आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारच्या हत्या होणे व त्यांचे मारेकरीही मोकाट सुटणे ही शरमेची बाब आहे. सरकारने यासंबंधी खरे तर वेगाने पावले उचलणे आवश्यक होते. मात्र तसे काही झालेले नाही. त्यामुळे राज्य सरकारच्याबाबतीत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते. अशा प्रकारच्या वैचारिक हत्या करणे ही गेल्या काही वर्षात बदललेली मानसिकता आहे. विचारांचा विरोध हा विचारानेच झाला आहे, हे सूत्र यातून इतिहासजमा होत आहे, हे धोकादायक ठरावे.
------------------------------------------------------------------

0 Response to "वैचारिक हत्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel