-->
संपादकीय पान सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
लढाई अंतिम टप्प्यात
----------------------------------------
विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज सायंकाळी प्रचाराच्या तोफ़ा थंडावतील. त्यानंतर बुधवारी मतदान झाल्यावर खर्‍या अर्थाने निवडणूक पार पडेल. सध्या तरी निवडणुकीची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे असे म्हणता येईल. काल रविवार असल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार फेर्‍या, रॅली काढण्यात तसेच घरोघरी जाऊन प्रचार करण्यात सर्वच राजकीय पक्ष दंग होते. गेल्या पंधरा दिवसात राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे. रायगड जिल्ह्याचा विचार करता शेतकरी कामगार पक्षाने येथे गेल्या सहा दशकात आपली जी पाळेमुळे रुजविली आहेत ती या निवडणुकीत आणखी घट्ट होतील. जनतेच्या हाकेला ओ देणारा पक्ष व जनसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला गेलेला शेकाप गेल्या चार-पाच पिढ्या रायगड जिल्ह्यातील जनतेवर राज्य करीत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तरुण कार्यकर्त्यांची फौज शेकापमध्ये तयार झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर सध्या एकच पळापळ सुरू आहे. बारा कोटी जनतेचे भवितव्य ठरविणार्‍या निवडणुका या राज्याच्या भवितव्याच्या व विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणार आहेत. राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून संभ्रम अधिक वाढला आहे. शेकापने डाव्या पक्षांच्या समितीबरोबर जाऊन आपली बांधिलकी डाव्या पक्षांबरोबर असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या प्रचार सभा घेम्याच धुमधडाका लावला आहे. भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करावयाची आहे. मात्र त्यांचे स्वप्न काही साकार होणार नाही. कारण मोदींची लोकसभेला चालली तशी जादू यावेळी काही चालणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मोदींविषयी लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. अच्छे दिन ची आश्‍वासने दिली असली तरी सरकारची त्यादिशेने कोणतीच पावले पडत नाहीत आता तर अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना खूष करण्यासाठी जीवनावश्यक औषधे मोदी सरकारने महाग केली आहेत. अशा स्थितीत मोदींनी कितीही प्रचार सभा घेतल्या तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. शिवसेनेने आपला प्रचार महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडला आहे. म्हणूनच आता आतापर्यंत मित्रपक्ष असलेल्या भाजपवर ती तुटून पडली आहे आणि त्या पक्षाच्या प्रचाराची तुलना अफझलखानाच्या स्वारीशी केली जाते आहे. आणि असे असताना शिवसेना केंद्रात अजूनही सत्तेत सहभागी आहे!  म्हणजे या अफजलखानाच्या स्वारीत आपले देखील सरदार सामिल झालेले आहेत हे शिवसेना विसरलेली नाही. जवळजवळ प्रत्येक पक्ष सध्या नरेंद्र मोदी यांच्या प्रचारावर टीका करीत आहे आणि ती टीका रास्तच आहे. गुजरात मॉडेलचे कौतुक करणारे राज ठाकरे यांना आता मोदींच्या प्रचाराच्या विरोधात आहेत. एकीकडे सीमेवर गोळीबारी सुरु असताना पंतप्रधान मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी निवडणूक प्रचारात गर्क आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या अस्मितेवर आपले पक्ष चालविले आहेत, मात्र आता हा मुद्दा नेमका कोणाचा, असा पेच निर्माण झाला आहे. बरे, मुंबईची अस्मिता, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे काय, या प्रश्नाला आज समाधानकारक उत्तर मिळेनासे झाले आहे. सध्याच्या अस्मितेच्या राजकारणात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजवटीला गेल्या १५ वर्षांचा हिशेब विचारण्याऐवजी आता नको त्या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित होतो आहे. इकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या पक्षांना तर आपण परवापर्यंत एकत्र सरकार चालवत होतो, याचेही भान राहिलेले नाही. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून काही नेत्यांना तुरुंगात पाठविण्याची भाषा केली जाते आहे; पण हा भ्रष्टाचार दिसत असताना सरकारमध्ये राहून आपण नेमके काय केले, या प्रश्नाला काही उत्तर नाही. राज्यातील सहकारी संस्था आणि बँकांना उद्ध्वस्त करणा-या प्रवृत्तीपासून वाचवा, असे एक विधान शरद पवार यांनी केले आहे. वास्तविक या संस्थांचा ठेका राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने वर्षानुवर्षे घेतला असून त्यात त्यांना मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या संस्था हातात ठेवून महाराष्ट्रात राजकारण कसे विशिष्ट व्यकितीींभोवती फिरत राहिले, हे आता जनतेला नवे राहिलेले नाही. निवडून येणे, एवढाच निकष समोर ठेवून या पक्षांच्या अनेक नेत्यांना पक्षात घेऊन भाजपने आपणही या कुरघोडीत कोठे कमी नाही, हे दाखवून दिले आहे. एक पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राची जी वेगळी ओळख आहे, ती मात्र या निवडणुकीत फारशी कोठे दिसत नाही. महाराष्ट्रातील मतदार हा भावनिक मुद्द्यावरच मतदान करणार, असे जणू या राजकीय नेत्यांनी गृहीत धरले आहे. याचा अर्थच असा की, पुन्हा एकदा मतदारांची जबाबदारी वाढली आहे. मुंबई वेगळी होईल का, विदर्भ वेगळा होईल का, हा निवडणुकीचा मुद्दाच नसून राजकीय पक्षांनी आपल्या कारकीर्दीत आणि कार्यक्षेत्रात कसे काम केले, हा तो मुद्दा आहे. तो सर्वांनाच गैरसोयीचा असल्याने सर्वच राजकीय नेते पळवाटा शोधून भावनिक मुद्दे मोठे करण्याचे प्रयत्न करत आहेत. आता मतदारांनीच हा डाव उधळून लावला पाहिजे. राज्याच्या विकासाचा मुद्दा या निवडणुकीत मांडला गेला पाहिजे होता, महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे हा मुदा ठोसपणे मांडला गेला पाहिजे होता, महाराष्ट्र देशात एक नंबरचे राज्य आहे व भविष्यात एक नंबर टिकविण्यासाठीचा मुद्दा कुठेच चर्चेला नव्हता. या निवडणुकीचा निकाल काही लागो परंतु जनतेचे प्रश्‍न यात चर्चिले गेले नाहीत ही खंत राहातेच.

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel