-->
साहित्य पंढरीतील वाद

साहित्य पंढरीतील वाद

संपादकीय पान सोमवार दि. १८ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
साहित्य पंढरीतील वाद
पिंपरी येथे सध्या सुरु असलेल्या ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अगोदर व संमेलनाच्या पहिल्या दिवशी झालेली भाषणे पाहता हे संमेलन वादावादीनेच गाजणार असेच दिसते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्या उशीरा मिळालेले भाषण पाहता यातून वादाची बिजे नव्याने पेरली गेली आहेत. मात्र हा महाराष्ट्र त्यांच्या भाषणाकडे किती गांभीर्याने बघतो त्यावर त्याविषयीच्या प्रतिक्रिया उमटतील असेच दिसते. साहित्याचे अभ्यासक व बहुतांशी संमेलनाला उपस्थित राहाणारे शरद पवार यांनी मात्र साहित्यिकांना राजकारण्यांसारखे वागू नकात हा दिलेला सल्ला मोलाचा वाटतो. राजकारणी मंडळी हक्काने मते मागतात किंवा त्यांचे राजकारण हे मताभेवतीच फिरत असते. निदान साहित्यिकांनी तरी मतांचा जोगवा अध्यक्षांच्या निवडीत मागू नये अशी त्यांनी केलेली सूचना योग्यच म्हटली पाहिजे. मात्र पुढील अध्यक्षांची सूचना संमेलन संपतांना अध्यक्षांनी करावी ही त्यांची सूचना कितीही योग्य असली तरी साहित्यिकांना पटणारी नाही. असो. निदान अध्यक्षपदी येणारी व्यक्ती एकमुखाने यावी व त्यासाठी निवडणूक टाळावी अशी सूचना शिरोधार्य मानून पुढील वर्षीपासून साहित्यिकांनी तसा प्रयत्न करावा. असो. यावर्षीच्या संमेलनावर असहिष्णुततेची छाया होती. खरे तर गेले वर्षभर साहित्य वर्तुळात त्यावरुन घमासान सुरु आहे. त्याविषयी मूग गिळून साहित्यिक बसणार का, असा प्रश्न होता. परंतु याविषयी आलेल्या प्रत्येक वक्त्‌यांनी असहिष्णुतेबाबत आपली स्पष्ट मते मांडली. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक चांगलेच या विषयावर वादांग झाले आणि त्याचीच अपेक्षा होती. एखाद्या प्रश्नांवर भिन्न मते असू शकतात, परंतु त्यावर चर्चा-वाद झाले पाहिजेत. ज्याप्रकारे सध्या बंदुकीने उत्तर दिले जात आहे तसे होता कामा नये. गुलजार यांनी तर यासंबंधी बोलताना लेखकाची जीभ कापली तरीही तो बोलतच राहाणार अशी ठाम भूमिका मांडली. त्यासंबंधी पुरोगाम्यांच्या ज्या गेल्या काही वर्षात हत्या झाल्या त्या करणार्‍यांमागे गोडसेंचे वंशज असल्याची टीका करुन आपली भूमीका स्पष्टपणे मांडली. त्यांच्या या टोकदार भूमिकेचे स्वागतच होईल. अर्थातच संघपरिवारातील मंडळींना ही टीका काही सहन होणारी नाही. त्यामुळे सनातनसारख्या संस्थांतील त्यांचे सल्लागार त्यांना मॉर्निंग वॉकला जाण्याचा सल्ला पुन्हा मग्रुरीने देऊ शकतात. परंतु हा पुरोगामी महाराष्ट्र या मुद्यावर सबनिसांच्या मागे निश्चितच राहिल, यात काही शंका नाही. हा म हाराष्ट्र डॉ. श्रीपाल सबनिस यांना समजसन्मुख, संवेदनशील व परिवर्तनवादी विचारवंत म्हणून ओळखतो. विविध चळवळींचा अभ्यास त्यांनी बारकाईने केला आहे. त्यामुळे वैचारिक लेखन करणारे कृतिशील विचारवंत अशी त्यांची प्रतिमा आहे. किमान २० वैचारिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. गरीब, शोषित, वंचित विद्यार्थ्यांचा कैवार घेणारा संवेदनाशील शिक्षक अशीही त्यांची प्रतिमा आहे. लेखनाचा प्रचंड आवाका त्यांचा आहे. बुरसटलेल्या विचारांवर त्यांनी नेहमच प्रहार केला आहे. समाजविकासाला मारक ठरणार्‍या गोष्टींविरुध्द दंड थोपटणयाची हिंमत त्यांच्यात आहे. त्यांचे लेखन हे वादातीत न ठरता वादळी ठरले यातून त्यांच्या वैचारिक बैठकीचा अंदाज येतो. सामजिक बांधिलकीचा वसा त्यांनी नेहमीच जपला आहे. त्यांचे विचार हे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांशी जुळणारे आहेत. खरे तर तो त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे. नवआंबेडकरवाद ही संकल्पना सबनिसांनी देशात सर्वात प्रथम मांडली. जीना, गांधी, गोळवलकर यांच्याशी डॉ. सबनिस आपली आंबेडकरवादी भूमिका तपासतात. इहवादी, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, विंचारांची मांडणी करताना मराठी संतपरंपरेचा विचार सबनिस टाळत नाहीत. हे सर्व पाहाता डॉ. सबनिस हे एक संवेदनाक्षम लेखक आहेत. आपल्या आयुष्यात आलेल्या काही दुखत प्रसंगांचे त्यांनी केलेले वर्णन पाहता त्यांच्या व्यक्तीमत्वाचा एक हळूवार कोपरा आपल्या दृश्यमान होतो. जसे ते प्रतिगाम्यांवर हल्ला करतात तसे ते पुरोगाम्यांवरही हल्ला करतात. पुरोगाम्यांचे काही मठ स्थापन झाल्याची टीका त्यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी हिंदू राष्ट्रवाद आणि सेक्युलर राष्ट्रवाद याची चिरफाड करताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या भूमिकेचा भंपकपणा उघड केला आहे. अशा प्रकारे स्वतंत्र्यपणे लिहीणार्‍या डॉ. सबनिस यांनी पंतप्रधानांचा उल्लेख एकेरी केला आणि शेवटी त्यांना माफी मागावी लागली. अनेकदा मोठी माणसेही बोलण्याच्या ओघात चूक करतात आणि त्यात त्यांची प्रतिमा खराब होते, असे काहीसे सबनिसांचे झाले. परंतु आता झाले गेले विसरुन जाण्याबरोबरच त्यांच्या विचाराचे अध्ययन करुन मराठी सारस्वतांनी त्यातून बोध घेतला पाहिजे. काहीही असे यंदाचे संमेलन हे वादानेच गाजणार हे नक्की.
--------------------------------------------------------------------

0 Response to "साहित्य पंढरीतील वाद"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel