-->
दिल्लीतील यशस्वी प्रयोग

दिल्लीतील यशस्वी प्रयोग

संपादकीय पान मंगळवार दि. १९ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
दिल्लीतील यशस्वी प्रयोग
सम-विषम गाड्यांसंबंधीचा प्रयोग दिल्लीतील सरकारने म्हणजे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यशस्वी करुन दाखविला आहे. गेल्या पंधरा दिवसात दिल्लीत प्रायोगिक तत्वावर याची आखणी झाली. शुक्रवारी या प्रयोगाला पंधरा दिवस झाले व त्या काळात दिल्लीतील प्रदूषण तब्बल २० टक्क्यांनी कमी झाल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला असे म्हणण्यास वाव आहे. आता सम-विषम गाड्यांसंबंधी सक्ती करण्यात येणार नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी व उत्तम भवितव्यासाठी दिल्लीकरांनी हा प्रयोग सुरुच ठेवावा असे आवाहन केले आहे. अर्थात आता सक्ती उठविल्यावर लोक यासाठी पुढे येऊन सम-विषम गाड्यांचा नियम कितपत वापरतील ही शंकाच आहे. कारण लोकांना सक्ती करुनच नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागते असा आजवरचा अलिखित नियम आहे. चीनने हा प्रयोग आपल्या देशातील सर्वात गजबजलेल्या शांघाय शहरात केला. तेथे त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्यात आली होती. अर्थातच याव्दारे चीचने या शहरातील प्रदूषणाची मात्र कमी करण्यात यश मिळविले होते. त्या धर्तीवर आपल्याकडे हा प्रयोग यशस्वी होईल का अशी शंका होती. मात्र आपल्याकडेही दिल्लीत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. दिल्ली हे शहर देशाची राजधानीचे शहर आहे व त्याला मोठा इतिहास आहे. अर्थात येथे मूळ दिल्लीकर शोधणे कठीण असले तरीही दिल्लीत परिसरातील विस्थापितांनी येथे स्थालांतर करुन दिल्लीला सध्याचे रुपडे दिले आहे. वाढते औद्योगिकीकरण व देशाची राजधानी यामुळे हे शहर विस्थापीतांच्या यादीत अगक्रमाने येते. पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश नव्हे, तर उ. प्रदेश, बिहार, झारखंडपासून थेट ईशान्येकडील सर्व राज्यांकडून होणार्‍या स्थलांतरणालाही या शहराने सामावून घेतले. दिल्लीच्या संस्कृतीला अभिनिवेश नाही. नागरीकरणाने येथे अनेक समस्या गेल्या दोन दशकात निर्माण झाल्या. जशी लोकसंख्या वाढत गेली तसे दिल्लीचे आकार विस्तारत गेले व अनेक समस्या वेढा करुन येथे आल्या. दिल्लीत सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर टिकणार्‍या शिला दिक्षीत यांनी सर्वात प्रथम येथील पायाभूत सुविधांच्या समस्येला हात घातला. त्यांनी उभारलेले अनेक पूल, मेट्रो आजही या शहरात दिमाखाने उभे आहेत. तसेच त्यांनी एक दशकापूर्वी सर्व सार्वजनिक वाहने सी.एन.जी.वर चालविण्याची सक्ती करुन राजधानीतील प्रदूषण आटोक्यात आणण्याला मोठा हातभार लावला होता. त्यावेळी दिल्लीत सरकारच्या विरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांनी मोठे आंदोलन उभारले. मात्र त्याविरोधात शिला दिक्षीत मोठ्या हिंमतीने उभ्या राहिल्या व तेथील ही सर्व वाहने सी.एन.जी.वर करण्यात आली. त्यामुळे प्रदूषणला आटोक्यात ठेवण्यात मोठे यश आले. त्यातच मेट्रोचे जाळे दिल्लीत उभारण्याचा झपाटा लावला गेला. यातून दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आले. मात्र गेल्या काही वर्षात दिल्लीत डिझेलची वाहने मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे मेट्रोवरील ताण वाढत गेला. परिणामी लोकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर आणणे पसंत केले. याचाच परिणाम म्हणून सध्याचे प्रदूषण दिल्लीच्या माथी आले आहे.
दिल्लीतील जनता प्रत्येक बाबतीत सजग आहे. भ्रष्टाचार व महागाई या विरोधात केजरीवाल यांनी एल्गार दिला त्यावेळी त्यांना पहिली साथ दिल्लीवासियांनी दिली. कॉँग्रेसचे सरकार त्यांनी उलथवून लावले आणि केजरीवाल हे सत्तास्थानी आले. आता केजरीवाल यांनी ज्यावेळी रस्त्यावर धावणार्‍या वाहनांबाबत सम-विषम फॉर्म्युला आणण्याची घोषणा केली तेव्हा एकदम या निर्णयाची खिल्ली उडवण्यात अनेक जण आघाडीवर होते. दिल्लीकरच या मोहिमेला विरोध करून ती साफ हाणून पाडतील, इथपासून अशा मोहिमेतून प्रदूषण कमी होणे शक्य नाही, असे दावे होऊ लागले. प्रत्यक्षात केवळ १५ दिवसांत लोकांनीच सम-विषमदिनी क्रमांकानुसार आपली वाहने रस्त्यावर आणली. मेट्रो, बस, सायकलीने प्रवास केला व एक जबाबदार नागरिक म्हणून दिल्लीचे प्रदूषण कमी करण्यास मोलाची मदत केली. केजरीवाल सरकारने सम-विषम मोहीम राबवताना राजकीय टीकेकडे दुर्लक्ष करत आपले धोरण सहजरित्या राबविले ते कौतुकास्पद आहे. न्यायालयांनीही सरकारच्या बाजूने उभे राहून अशा मोहिमांना बळकटी दिली. पर्यावरणाविषयी आपल्याकडे विशेष जनजागृती नाही. त्यातच दिल्लीसारख्या महानगरात वायू प्रदूषणामुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागते. यातून भावी पिढीवर मोठे परिणाम होऊ घातले आहेत. याचे गांभिर्य आपल्याकडे जनतेला नाही. मात्र केजरीवाल यांनी सम-विषमचा प्रयोग राबवून या सर्व प्रश्‍नावर मात करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. हा प्रयोग आता यशस्वी झाला असला तरी दिल्लीतील प्रदूषण टप्प्या टप्प्याने कमी करण्यासाठी सरकारला आता दीर्घकालीन उपाययोजना करावी लागणार आहे. त्यात सम-विषमच्या प्रयोगाची अंमलबजावणी महत्वाची ठरेल.
------------------------------------------------------------------------

0 Response to "दिल्लीतील यशस्वी प्रयोग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel