-->
संपादकीय पान बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
खटाराच वेगात धारणार 
-------------------------------------------
राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या सहा दशकात रायगड जिल्ह्यावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व राहिले आहे आणि यावेळच्या निवडणुकीतही ते वर्चस्व टिकणार हात काहीच शंका नाही. यावेळी शेकापला त्यांचे पूर्वीपार चालत आलेले खटारा हे चिन्ह पुन्हा एकदा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश निर्माण झाला आहे. राज्यात बहुतांशी मतदारसंघात पंचरंगी किंवा बहुरंगी लढती होणार आहेत. त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातही यावेळी बहुरंगी लढती झाल्या. जिल्ह्यातील ७ मतदारसंघात ८८ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. यावेळी कोणतीही युती वा आघाडी अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वबळावर आपले नशीब आजमावित आहे. बहुरंगी लढतीमुळे यावेळी अनेकांचे विजय हे निसटते म्हणजेच अतिशय कमी मतांनी लागतील असाही अंदाज आहे. नेहमीप्रामणे यावेळीही शेतकरी कामगार पक्ष आपले जिल्ह्यातील वर्चस्व कायम टिकवेल. प्रदीर्घ काळानंतर यावेळी जवळजवळ प्रत्येक पक्ष आता स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाची जिल्ह्यात नेमकी ताकद किती आहे त्याचा अंदाज लागेल. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघावर काही अपवादात्मक परिस्थिती वगळता शेकापचे वर्चस्व राहिले आहे. शेकापच्या रणरागिणी म्हणून गेली तीन तपे सक्रिय राजकारणात असलेल्या आमदार मिनाक्षीताई पाटील यांंनी यावेळी प्रकृतीच्या कारणावरुन निवडणूक लढविली नाही. त्यांच्याजागी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीत पाटील यांना शेकापने उमेदवारी दिली. अनेक गावागावात शेकापचे ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद बहुमत आहे. पंडित पाटील यांच्या कामाची पोचपावती त्यांना येथील जनता आमदारकी देऊन करेल यात काहीच शंका नाही. पेण मतदारसंघात धैर्यशिलदादा पाटील हे पुन्हा शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. शेकापचा पेण हा मतदारसंघ पूर्वीपासून बालेकिल्ला राहिला आहे. आमदार व माजी मंत्री स्व. मोहनभाई पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रदीर्घ काळ नेतृत्व केले होते. आता त्यांचे चिरंजीव धैर्यशिलदादा याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शहरी व ग्रामीण अशा संमिश्र असलेल्या या मतदारसंघात ग्रामीण भागाचा वरचश्मा आहे आणि शेकापने ग्रामीण भागात विविध विकास कामे करुन मतदारांना आपल्या सोबत ठेवले आहे. पेण अर्बन बँकेचे दिवाळे काढण्यात आले आणि अनेक ठेवीदारांचे करोडो रुपये बुडाले. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी विविध आंदोलने उभारुन शेकपाने व आमदार धैर्यशिल पाटील यांनी आपली सर्वसामान्यांशी असलेली नाळ दाखवून दिली आहे. य भागातील ए.सी.झेड.चे आंदोलन असो वा पेण अर्बनच्या ठेवीदारांचा प्रश्‍न असो किंवा मुंबई-गोवा महामार्ग विस्तारीकरणाने झालेल्या शेतकर्‍यांच्या प्रलंबीत मागण्यांचा प्रश्‍न असो या प्रत्येक जनआंदोलनात शेकाप व आमदार धैर्यशिल पाटील अग्रभागी राहिले आहेत. त्यामुळे येथील जनता पुन्हा एकदा धैर्यशिलदादांना निवडून देतील याबाबत काहीच शंका नाही. उरण विधानसभा मतदारसंघात शेकापचे आमदार विवेकभाई पाटील पुन्हा एकदा आपल्या केलेल्या जनसेवेची पोचपावती मागण्यासाठी तेथून उभे आहेत. जनता त्यांच्या कामाची पोचपावती देऊन पुन्हा आमदार म्हणून पाठवतील यात काही शंका नाही. उरण मतदारसंघ हा देखील शेकापने आपल्याकडे नेहमीच राखला आहे. ग्रामीण भागाचा वरचश्मा असलेल्या या मतदारसंघात शेकापने गावोगावी आपले जाळे विणलेले आहे आणि कामांच्या जोरावर आपल्या ताब्यात ग्रामपंचायती राखल्या आहेत. आमदार विवेकभाईंनी या मतदारसंघात आपला ठसा उमटविला असून त्यांच्या विकासा कामांची जंत्री फार मोठी आहे. असा वेळी शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, मनसे या पक्षांचा काही निभाव लागणार नाही व विवेकभाईंचा विजय नक्की आहे. उरणच्या मतदारसंघाशी जोडून असलेल्या पनवेल मतदारसंघाकडे यावेळी सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. यामागचे कारणही तसेच आहे. कॉँग्रेसमधून अचानक भाजपामध्ये उडी मारुन भगवा रंग परिधान करणारे प्रशांत ठाकूर यांचा हा मतदारसंघ. तसे पाहता या मतदारसंघात शहरी भाग मोठ्या प्रमाणात येतो. येथील सुजाण नागरिकांना प्रशांत ठाकूर यांनी मारलेली बेडूक उडी काही मान्य नाही. केवळ कंत्राटे मिळविण्यासाठी त्यांनी केलेले हे पक्षांतर येथील जनतेसाठी काही नवीन नाही. यापूर्वी त्यांनी कॉँग्रेसमध्ये देखील अशीच उडी मारली होती आणि आता त्यांनी त्याच कॉँग्रेसला रामराम करुन भाजपाचा वेश परिधान केला आहे. प्रशांत ठाकूरांनी गेल्या पाच वर्षात पनवेलचा विकास काय केला याचा हिशेब जनतकडे आहेच. मुख्यमंत्री अकार्यक्षम आहेत हे त्यांना गेल्या पावणे पाच वर्षात काही वाटले नव्हते का, असा सवाल आहे. त्याच बरोबर त्यांनी ज्या टोलच्या प्रश्‍नावरुन कॉँग्रेसचा राजीनामा दिला त्यासंबंधी त्यांना काहीच माहिती नव्हते असे म्हणणे चुकीचे ठरेल. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या टोलच्या प्रश्‍नी ते पूर्णपणे अंधारात होते व त्यांना याची काहीच माहिती नव्हती असे म्हणणे म्हणजे त्यांचाच अकार्यक्षमतेचा नमुना ठरावा. असो, प्रशांत ठाकूरांच्या या बेडूक उड्यांमुळे शेकापच्या बाळाराम पाटील यांचा विजय नक्की झाला आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात शेकापच्या महेंद्र थोरवे यांच्या उमेदवारीमुळे यावेळी रंगत वाढली आहे. शेकाप हे जिल्ह्यात पाळेमुळे घट्ट रोवलेला तसेच जनतेत काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे जनतेने     वेळोवेळी जनतेने लोकप्रतिनिधी शेकापचेच पाठविले आहेत. यावेळी देखील शेकाप आपले जिल्ह्यातील वर्चस्व कायम राखील व शेकापचा खटारा वेगात धावेल.
------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel