-->
पुणेरी स्तुत्य उपक्रम

पुणेरी स्तुत्य उपक्रम

शुक्रवार दि. 08 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पुणेरी स्तुत्य उपक्रम
पुण्यातील इंद्रायणी नदीचे जल प्रदूषण रोखले जावे यासाठी तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन विसर्जन केलेल्या 45 हजार मूर्ती नदीतून बाहेर काढण्याचा अभिनव उपक्रम केला. देवाची आळंदी मध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होते. त्याचमुळे आळंदी मधील एम.आय.टी. आळंदी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्हिजनरी फायटर्सद्वारे जलप्रदूषण मुक्त करण्याचा वसा हाती घेतला आहे. दीड आणि सात  तसेच अकरा दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी एकूण सुमारे 45 हजार गणेश मूर्ती इंद्रायणी नदीतून बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यातील आठ हजार मूर्ती दानही करण्यात आल्या आहेत. मानवी साखळीद्वारे या सगळ्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. या उपक्रमामुळे जल प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. इतकेच नाही तर जलचरांचा जीव वाचण्यासही मदत होणार आहे. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. इंद्रायणी नदीतून बाहेर काढण्यात आलेल्या सगळ्या गणेश मूर्ती आळंदी नगरपरिषदेला देण्यात येतात. पुढील वर्षी गणपती जेव्हा घरात विराजमान होईल तेव्हा शाडू मातीचा हा बाप्पा घरी घेऊन जावा असा संदेशही यावेळी पथनाट्यातून देण्यात येतो. अशा प्रकारच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे. तसेच असा उपक्रम ठिकठिकाणी राबविण्यात यावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले ते योग्यच आहे. एकीकडे अशा प्रकारचा विधायक उपक्रम पुण्यात राबविला जात असताना पुण्यात यंदा गणेशोत्सावाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिका आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात रंगलेला वाद विसर्जनाच्या दिवशीही कायम होता, ही बाब निराशाजनक ठरावी. मंडळाकडून गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या रथावर एक फलक लावण्यात आला होता. या फलकावर भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळक यांची छायाचित्र लावण्यात आली होती. भाऊसाहेब रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक तर लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रसारक म्हटले होते. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच पुणे महापालिका आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली होती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पुण्यातील गणेशोत्सवाला 1882 पासून सुरुवात केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजानिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. त्यांच्या नावाचा उल्लेख देखील केला जात नाही अशी तक्रार होती. परंतु अशा प्रकारचे वाद हे निरर्थक आहेत व त्यात आपण आपली किती शक्ती खर्ची घालावयाची हे गणेशोत्सव मंडळांनी व महापालिकेने ठरवायचे आहे. आता इतिहासात जास्त काळ डोकावण्यापेक्षा सध्याच्या गणेशोत्सवाचे जे विभत्स रुप झाले आहे त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्याचा गणेशोत्सव पाहून भाऊसाहेब रंगारी व लोकमान्य टिळक आपण कशासाठी हा लोकोत्सव सुरु केला व आता काय त्याचे स्वरुप झाले आहे असा विचार करत असतील. त्यामुळे आता गणेशोत्सवात बदल होण्यासाठी जनतेत जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे शाडूच्या मूर्ती सर्वांनी तयार करणे. गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली आता या देखील स्तुत्य उपक्रमाची सुरुवात पुण्यातच व्हावी.

0 Response to "पुणेरी स्तुत्य उपक्रम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel