
डोलोच्या निमित्ताने...
दि. 11 सप्टेंबरच्या मोहोरसाठी चिंतन
डोलोच्या निमित्ताने...
कोरनाच्या काळात ताप व दुखीवरील लोकप्रिय झालेले औषध डोलोच्या उत्पादक कंपनीवर गेल्या काही दिवसात ईडीच्या धाडी पडल्याने केवळ याच कंपनीच्याच नव्हे तर एकूण औषध निर्मीती कंपन्यांचे गैरप्रकारांचे वास्तव उघडकीस आले आहे. डोलोच्या उत्पादकांनी आपले औषध डॉक्टरांनी रुग्णांना घ्यावे, याची शिफारस करण्यासाठी त्यांना विविध प्रकारे लाच देण्यात आली होती. यातून डोलोची उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढली व या कंपनीने भरघोस नफा कमविला. डॉक्टरांवर केलेला हा खर्च कंपनीने व्यवसायवृध्दीचा खर्च दाखून त्यातून कर सवलतही मिळविली. अर्थात अशा प्रकारे अनेक औषध कंपन्या गेली कित्येक वर्षे व्यवहार करत आहेत. मात्र डोलोची ही बाब नजरेत भरली व त्यातून त्यांचे हे गैरप्रकार उघडकीस आले. त्यातच देशातील मेडिकल रिप्रेझेंन्टीटीव्हच्या संघटनेचे अशा प्रकारे गैरव्यवहार करण्यास प्रतिबंध करावा यासाठी रिट पिटीशन न्यायलयात दाखल केला आहे. अर्थात ज्यांच्या मार्फत हे गैरव्यवहार केले जातात त्या एम.आर.च्याच संघटनेने अशी याचिका करावी हे एक वेगळे गौडबंगालच म्हटले पाहिजे. कदाचित हे एम.आर.च अशा प्रकारांना कंटाळले असावेत, त्यामुळेच त्यांच्या संघटनेने शेवटी हे प्रकार थांबावेत यासाठी न्यायालयात धाव घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैद्यकीय क्षेत्रात अशी चर्चा आहे की, डोलोच्या उत्पादकांची ही चोरी सरकारच्या लक्षात आली होती. त्यातून त्यांच्याकडे सुमारे २०० कोटी रुपयांची मागणी झाली. मात्र त्यांनी शंभर कोटी रुपये देऊ केले होते. त्यातून शेवटी इडीने धाडी टाकल्या. शेवटी किती कोटी रुपयांवर समझोता झाला हे काही कुणालाच समजले नाही. आता डोलोच्या गैरव्यवहारावर कुणीच बोलत नाही. सर्व काही थंड पडले आहे. असो. आपल्याकडील वैद्यकीय सेवेचे वाभाडे कोरोनाच्या निमित्ताने उघड झाले आहेत. अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात लोकांना आपली वैद्यकीय सेवा देत असताना वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. अर्थात याला अनेक डॉक्टर अपवाद देखील आहेत. परंतु अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या रुग्णांना लुटले ही वस्तुस्थिती नाकारण्यात काहीच अर्थ नाही. त्यावेळी रुग्णांच्या असलेल्या असाह्यतेचा गैरफायदा अनेक डॉक्टरांनी घेतला. त्याचबरोबर औषध कंपन्यांनीही अशाच प्रकारे लूट करण्यात काही गैर मानले नाही. खरे तर जागतिक पातळीवर शतकानंतर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जनतेला जेवढा दिलासा देता येणे गरजेचे होते, त्यादृष्टीने औषध कंपन्यांनी व डॉक्टरांनी सेवा देणे अपेक्षित होते. परंतु तसे काही झाले नाही आणि मानवतेला काळीमा लावणाऱ्या अनेक घटना घडल्या. गेल्या दोन-तीन दशकात आपल्याकडील वैद्यकीय सेवेचे चित्र पार बदलले आहे. डॉक्टरांची वैद्यकीय सेवा न राहता वैद्यकीय व्यवसाय झाला आहे. त्यामुळे एकदा का व्यवसाय आल्यावर यातील अनेक गैरप्रकार चिकटण्यास फारसा वेळ लागत नाही. कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असतो आणि यासाठी आपल्याला डॉक्टरांचीच मदत होणार आहे हे ओळखल्यावर दोन-तीन दशकांपासून डॉक्टरांना भुलविण्यास सुरुवात झाली. त्यातून त्यांना विविध पार्ट्या देणे, भेट वस्तू देणे, विदेशी प्रवासाची लालूच दाखविणे असे प्रकार सुरु झाले. हळूहळू काळाच्या ओघात डॉक्टरही या बाबींना सरावले गेले. सुरुवातीला काही डॉक्टरांना हे गैर वाटत होते मात्र अनेक डॉक्टर हे स्वीकारतात हे पाहिल्यावर त्यांची भीड चेपली. त्यातून बहुतांशी डॉक्टरांनी अशा भेटी स्वीकारण्यास सुरुवात केली आणि त्याबदल्यात रुग्णांना संबंधीत कंपन्यांची औषधे सुचविण्यास प्रारंभ केला. एकीकडे हे सुरु झाले असताना डॉक्टरांनी रुग्णांना विविध चाचण्या करण्यास पाठविल्यावर त्यातील बिलाच्या काही टक्केवारी संबंधित लॅब देऊ लागल्या. खरे तर हे सर्व प्रकार वैद्यकीय व्यवसायाच्या नियमावलीशी प्रतारणा करणारे आहेत. परंतु गेल्या दोन दशकात आपल्याकडे भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की अनेकांना आपण करीत असलेला गैरव्यवहार हा कळेनासा झाला आणि अनेक चुकीच्या बाबी आपल्या आगवळणी पडून रुळल्या. डॉक्टरांचेही असेच झाले. आपण अशा प्रकारे अनावश्यक चाचण्या करुन किंवा गरज नसतानाही रुग्णांना औषधे सुचवून काही गैरप्रकार करीत आहोत, असे वाटायचे थांबले आणि डॉक्टरी सेवेला गैरमार्गाचे वळण लागले. त्यातच आपल्याकडे कॉर्पोरेट रुग्णालये आली आणि त्यांनी वैद्यकीय सेवेला कॉर्पोरेट रंग दिला. यातही अनेक डॉक्टरांना भरघोस पगार देण्यात आला, मात्र त्यांना काही ठराविक ऑपरेशन्स उदा. हृदयरोगाशी संबंधित करण्याची सक्ती आली. त्यातून अनेक अनावश्यक ऑपरेशन्स सुरु झाली. ज्या कंपन्या आरोग्य विमा सेवा पुरवितात त्यांचे तर डॉक्टरांशी व रुग्णलयांशी मोठे रॅकेट गेल्या काही वर्षात निर्माण झाले आहे. या कंपन्यांना देखील शिस्त लावण्याची आवश्यकता आहे. या सर्व धबाडक्यात सर्वसामान्य माणसाला मात्र ही महागडी ट्रिटमेंट करणे शक्य नाही, त्यांना सरकारी रुग्णालयांशिवाय काहीच पर्याय नाही. मात्र अनेक सरकारी रुग्णालयातील स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायला किंवा त्यात सुधारणा करायला सरकारचीही इच्छा नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. डॉक्टरी सेवेला व्यवसायीकरणाचे लागलेले ग्रहण सुटणार तरी कसे असा सर्वांना प्रश्न पडेल. हे ग्रहण सुटू शकते, मात्र त्यासाठी सरकारने या गैरप्रकारांवर बडगा उगारला पाहिजे. परंतु ते उगारण्याचे धारिष्ट्य सरकार दाखवू शकत नाही कारण या सर्व गैरप्रकारात त्यांचेही हात गुंतले आहेत. या दुष्टचक्र थांबविण्यासाठी जनतेनेच आता पुढे आले पाहिजे.
0 Response to "डोलोच्या निमित्ताने..."
टिप्पणी पोस्ट करा