-->
संपादकीय पान सोमवार दि. ७ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
फेसबुक आणि भारत
--------------------------------
फेसबुकच्या सी.आ.ओ. शेरिल सँडबर्ग या गेले चार दिवस भारत भेटीवर आल्या होत्या या भेटीत त्यांनी पंतप्रधानांपासून ते उद्योजकांच्या संघटना, विविध एन.जी.ओ. यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. फेसबुक या सोशल मिडियातील आघाडीच्या कंपनीच्या सी.ओ.ओ.नी भारतासारख्या विकसनशील देशात येऊन भेटीगाठी घेणे याला विशेष महत्व आहे. अर्थातच फेसबुकचा झपाट्याने वापर भारतात होत आहे त्यांचा अमेरिकेच्या खालोखाल वापर भारतीय लोक करतात त्यामुळे फेसबुकच्या दृष्टीकोनातून भारत ही महत्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेचा आढावा घेण्यासाठी सी.ओ.ओ. शेरिल सँडबर्ग या खास आल्या होत्या. फेसबुकचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा अधिक वाढवण्याच्या दृष्टीने, नव्या व्यापारसंधी शोधण्याच्या निमित्ताने ही भेट महत्त्वाची होती. २००४ मध्ये जेव्हा अमेरिकेत फेसबुक सुरू झाले आणि त्याचा प्रसार हळूहळू जगभर होत गेला, तेव्हा हे माध्यम नव्या जगात नांदणार्‍या हजारो भाषिक, वांशिक समूहांना, ज्ञात-अज्ञातांना जोडणारा मानवी संवाद होता. पण दुसरीकडे तो अप्रत्यक्षपणे एक नवी जागतिक बाजारपेठ निर्माण करत होता. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिकीकरणाला वेग येऊन जगाची नवी रचना आकारास येऊ लागली होती. अगदी २००० सालापर्यंत जग हे जी-५, जी-८, ब्रिक्स, युरोपियन युनियन, सार्कसारख्या व्यापारी संघातून जोडले जात होते, पण याला भौगोलिक-सामरिक चौकटी होत्या. फेसबुकसारख्या सोशल मीडियाने पहिल्यांदा या चौकटींना सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. हा मीडिया जसा वेगाने विस्तारत गेला, तसा तो केवळ व्यक्ती-व्यक्तीमधील संवाद राहिला नाही तर त्याने २१व्या शतकातील जगाच्या राजकीय व आर्थिक रचनेवर आपला प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. या मीडियाने लोकशाही मूल्यांची, भ्रष्टाचारमुक्त समाजाची, पारदर्शी कारभाराची, मानवी सबलीकरणाची, प्रामाणिक संवादाची व व्यापाराची भाषा मांडण्यास सुरुवात केली. त्याचे दृश्य परिणाम पश्चिम आशियातील राजकीय क्रांत्यांपासून भारतातील अण्णा हजारेंच्या देशव्यापी भ्रष्टाचारमुक्त चळवळ ते लोकसभा निवडणुकांमधील कॉंग्रेसच्या दारुण पराभवापर्यंत दिसून आले. केंद्रात भाजपची सत्ता येण्यामागील अनेक कारणांपैकी सोशल मीडियातील या पक्षाचा प्रभावी प्रचार हेही एक प्रमुख कारण आहे. आता सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे आर्थिक धोरण भांडवलदारांना धार्जिणे पण विकासाची भाषा करणारे असल्याने अनेक विदेशी कंपन्या देशात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या कंपन्यांना सरकारच्या विविध विकासवादी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. फेसबुक ही त्यापैकी एक कंपनी आहे. फेसबुकचे अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक युजर असून ही संख्या १० कोटींवर आहे. चीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून फेसबुकवर बंदी घातली आहे. त्यामुळे जगात दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला भारत फेसबुकसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. म्हातारपणाकडे झुकलेल्यएा युरोपातील जनतेकडून नवे ग्राहक मिळतील, अशी शक्यता या कंपनीला वाटत नाही. उलट भारताची बाजारपेठ केवळ नवे युजर जोडण्याएवढी मर्यादित नाही; तर या देशातील जाहिरात संस्था, वित्तीय संस्था, मनोरंजन उद्योग, मध्यम व छोटे उद्योगधंदे, राजकीय-सामाजिक संस्था यांना एकमेकांशी जोडणारे एक व्यासपीठ हवे आहे. ते व्यासपीठ फेसबुकमुळे मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, भारतात लहान-मध्यम उद्योग जगतात सुमारे २ कोटी ५० लाख कंपन्या आहेत. या कंपन्यांना देश-विदेशातील नवा ग्राहक फेसबुकमुळे मिळू शकतो. फेसबुकवर अशा उद्योगांच्या बर्‍याच कम्युनिटी व पेजेस आहेत. नवनव्या कल्पना राबवण्यासाठी फेसबुकचे सहकार्य लाभल्याने मोठ्या प्रमाणात व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. सँडबर्ग यांनी नव्वदच्या दशकात मध्य प्रदेशमध्ये जागतिक बँकेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले होते. हा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. भारताच्या शहरी व ग्रामीण भागातील महिलांमधील दडलेल्या व्यावसायिक कौशल्य, महत्त्वाकांक्षेला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट दिल्यास सबलीकरणाची लढाई अधिक यशस्वी होईल, असे त्यांना वाटते. सॅँडबर्ग यांनी भारतात लवकरच विकास व संशोधनासाठी गुंतवणूक करणार असल्याचेही जाहीर केले. त्याचे एक कारण म्हणजे, देशात स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने फेसबुकच्या ग्राहकसंख्येतही वाढ होत आहे. फेसबुकला भारतातील आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी आपले योगदान देण्याची इच्छा आहे. सँडबर्ग यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली तेव्हा मोदींनी देशातील स्वच्छता अभियानात सोशल मीडियाची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते. भारत हा प्रचंड अस्वच्छ देश असल्याने विदेशी पर्यटकांची भारताला फारशी पसंती नसते. त्यामुळे पर्यटनाची बाजारपेठ अधिक समृद्ध करण्यासाठी प्रबोधनाची जबाबदारी सोशल मीडियाने शिरावर घेतल्यास त्याचा परिणाम दिसून येईल, असे मोदींचे म्हणणे होते. मोदींच्या म्हणण्यात तथ्य आहे. कारण या मीडियाने जगभरातील राजकीय चळवळींना बळ दिले होते. ही ऊर्जा समाजाच्या सबलीकरणासाठी खर्च होत असेल तर सँडबर्ग यांच्या भेटीचे फलित झाले, असे समजण्यास हरकत नाही. भविष्यात फेसबुक व स्मार्ट फोन हे प्रत्येकाच्या जीवनात अग्रभागी असणार आहेत. विकासाच्या मॉडेलच्या अग्रभागी हे आधुनिक तंत्रज्ञान असणारच आहेत. फेसबुक, व्हॉटस्‌ऍपच्या माद्यमातून अनेक सरकारी प्रकल्प आम जनतेपर्यंत सहजरित्या पोहोचविणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रात आता फलोद्यान योजनेतील सर्व लाभ शासनाच्या वेबसाईटवरुन मिळण्यास सुरुवात झाली आहे. यातून पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. फेसबुक व व्हॉटस् ऍप ही त्याची पुढची पायरी ठरणार आहे. त्यामुळेच फेसबुकच्या सी.ओ.ओ.ची भारत भेट ही एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
-----------------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel