-->
नव्या भांडवलशाहीचा अपवादात्मक आदर्श

नव्या भांडवलशाहीचा अपवादात्मक आदर्श


 Source: दिव्य मराठी (20/08/11) edit
बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर ज्यांनी आय. टी. उद्योगात साम्राज्य उभे केले ते एन. आर. नारायणमूर्ती वयाच्या ६५ व्या वर्षी कंपनीच्या दैनंदिन कामातून आज सेवानिवृत्त होत आहेत. नारायणमूर्ती यांनी आपल्या सहा सहका-यांसमवेत सुमारे २५ वर्षांपूर्वी जे रोपटे लावले होते त्या इन्फोसिस कंपनीच्या वटवृक्षाचे बाजारमूल्य आता तब्बल ३० अब्ज डॉलर झाले आहे. या कंपनीचे संस्थापक आपण असलो तरी आपल्याला आता थांबले पाहिजे, तरुण पिढीने या कंपनीची सूत्रे सांभाळली पाहिजेत, असे नारायणमूर्तींना मनोमन वाटत होते. अखेर हा दिवस आला आणि इन्फोसिस आपल्या या नेत्याला निरोप द्यायला सज्ज झाली. आय.आय.टी.तून अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेल्या नारायणमूर्तींनी ज्या वेळी कंपनी स्थापण्याचे स्वप्न पाहिले तो काळ वेगळा होता. देशात संमिश्र अर्थव्यवस्था होती आणि आय. टी. उद्योगाची आणि आधुनिकीकरणाची बीजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी रोवली होती. संगणक म्हणजे बेरोजगारीला आमंत्रण ही संकल्पना आपल्याकडे प्रचलित होती. तसेच त्या काळी एखादा उद्योग स्थापन करणे  फक्त उद्योगपतींनाच शक्य असे. कारण ज्याच्याकडे पैसा उपलब्ध आहे तोच प्रकल्प उभारणीसाठी गुंतवणूक करू शकत असे. बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर उद्योग उभारता येऊ शकतो ही बाब कुणाच्या खिजगणतीतही नव्हती. अशा कठीण प्रसंगी नारायणमूर्तींना त्यांच्या पत्नीने आपले दागिने गहाण टाकून दहा हजार रुपये दिले आणि इन्फोसिसचा जन्म झाला. नारायणमूर्तींचा मोठेपणा यातच आहे की, अशा प्रकारे शून्यातून निर्माण केलेल्या ‘आपल्या’ कंपनीतून ते सहजरीत्या आपल्या केवळ स्मृती ठेवून बाहेर पडत आहेत. त्याहून मोठी बाब ही की त्यांनी आपल्या दोन मुलांपैकी कुणालाही ‘आपल्या’ कंपनीचा वारस म्हणून नियुक्त केलेले नाही. अर्थात त्यांची दोन्ही मुले खरे तर ही कंपनी चालवण्यास समर्थ ठरतील एवढी शिकलेली आहेत. परंतु त्यांनी त्यांना ‘आपल्या’ कंपनीत साधे संचालकपदही दिलेले नाही. तरुणपणी साम्यवादी विचाराने प्रभावित झालेले नारायणमूर्ती पुढे त्यांना आलेल्या कम्युनिस्ट रुमानियातील विदारक प्रसंगाने या विचारापासून दूर झाले. पुढे चालून एक यशस्वी उद्योजक-भांडवलदार झाले. मात्र त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. आपण पैसा कमवीत असताना आपले कर्मचारी, समभागधारक यांनाही श्रीमंत केले. इन्फोसिसने आपल्याकडील अतिरिक्त पैसा बोनस व लाभांश रूपाने घसघशीतपणे वाटून कर्मचारी व समभागधारकांना लखपतीच नव्हे तर करोडपती केले. कंपनीतील कर्मचा-यांना समभाग देण्यास व त्यांना कंपनीतील नफ्यातील वाटेकरी करण्यास निदान आपल्या देशात तरी नारायणमूर्तींनी सुरुवात केली, असे म्हणता येईल. त्यांच्या या कृतीमुळे नंतर अनेक कंपन्यांना आपल्या कर्मचाºयांना समभाग देणे भाग पडले.  देशातील कॉर्पोरेट जगतात त्यांच्यामुळे असे अनेक नवीन पायंडे पडले. त्यामुळे नारायणमूर्ती हे कर्मचारी आणि समभागधारक यांच्या बरोबरीने देशातील एकूणच मध्यमवर्गीयांच्या गळ्यातले ताईत झाले. पुण्यातील एका छोट्याशा फ्लॅटमध्ये सुरू केलेल्या इन्फोसिसचा पसारा आज जगात पोहोचला आहे. १९९३ मध्ये कंपनीने ज्या वेळी खुली समभाग विक्री केली त्या वेळी ही कंपनी आपले भाग्य बदलेल याची कल्पना समभागधारकास नव्हती. परंतु जे गुंतवणूकदार त्यांच्याबरोबर राहिले ते आज करोडपती झाले. इन्फोसिसने केलेला हा चमत्कार आहे. अर्थात देशातील इतर कुणाही भांडवलदाराला हा चमत्कार करणे शक्य होते. परंतु त्यांची दुसºयाला ‘भरभरून देण्याची’ मानसिकता नसल्याने नारायणमूर्ती हे अन्य भांडवलदारांपेक्षा वेगळे ठरले. खुली समभाग विक्री झाल्यावर त्यांनी समभाग विश्लेषकांची बैठक बोलावली आणि आपल्या कामगिरीचा अध्याय त्यांच्यापुढे उलगडून ठेवला. भारतातील कॉर्पोरेट जगतात हा एक नवा पायंडा त्यांनी पाडला. इन्फोसिसने मुंबई शेअर बाजारात नोंदणी केल्यावर सहा वर्षांनी नॅसडॅक शेअर बाजाराचे दरवाजे ठोठावले. देशातील एखादी कंपनी विदेशातील शेअर बाजारात नोंद होणे ही आता काही कौतुकाची बाब राहिली नसली तरी त्या काळी ही घटना देशाच्या दृष्टीने प्रेरणादायी होती. या घटनेमुळे इन्फोसिस हा ग्लोबल ब्रँड झाला. इन्फोसिसच्या कामगिरीने भारून जाऊन आय. टी.त उद्योजकांची एक नवीन पिढी जन्माला आली. त्यांचे प्रेरणास्थान  नारायणमूर्तीच होते व आजही आहेत. जीवनात साधेपणा नेहमी जपणाºया नारायणमूर्तींनी सामाजिक भानही ठेवले आणि अनेक संस्थांना मदतीचा हात दिला. त्यांनी आपल्या भांडवलापैकी काही भाग विकून तो सामाजिक कार्यासाठी, प्रामुख्याने शैक्षणिक कार्यासाठी खर्च करण्याचे ठरवले. अर्थात हा इन्फोसिसचा सामाजिक उपक्रम नव्हता तर त्यांच्या स्वत:च्या कमावलेल्या पैशातून त्यांनी दिलेला सामाजिक कार्याचा वाटा होता. आपण समाजाचे देणे लागतो आणि आपल्या कमाईतील काही वाटा वंचितांसाठी दिला पाहिजे हे व्रत त्यांनी भांडवलदार म्हणून वावरत असताना जपले. आतादेखील निवृत्तीनंतर ते  उद्योजकांची नवीन पिढी तयार व्हावी यासाठी खास निधी स्थापन करून कार्य करणार आहेत. अशा प्रकारे नारायणमूर्तींनी कॉर्पोरेट जगताला कर्मचा-यांच्या हिताचा आणि सामाजिक बांधिलकीचा गुरुमंत्र तरुण पिढीसाठी दिला आहे.

0 Response to "नव्या भांडवलशाहीचा अपवादात्मक आदर्श"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel