-->
‘गुगल’चा मोटरोलावर कब्जा

‘गुगल’चा मोटरोलावर कब्जा


 Source: प्रसाद केरकर  (22/08/11)
विलीनीकरण (मर्जर) आणि ताबा (टेकओव्हर) ही व्यावसायिक जगातली नित्याचीच बाब असते; परंतु काही घटनांमध्ये आर्थिक जगताचा प्रवाह बदलण्याची शक्यता दडलेली असते. ‘गुगल’ने मोटरोला ताब्यात घेण्याची घटनासुद्धा माहिती तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत वर्चस्वाची नवी समीकरणे तयार करणारी ठरली आहे. ब्लर्ब-‘मोटोरोला’च्या ताब्यात असलेली बौद्धिक सामर्थ्याचे सुमारे १७ हजार पेटंट व १९ हजार ज्ञानसंपन्न अभियंत्यांची फौज आता या टेकओव्हरमुळे ‘गुगल’च्या हाती आली आहे.

जगातील आघाडीचे सर्च इंजिन म्हणून परिचित असलेल्या ‘गुगल’ने मोटरोला मोबिलिटी ही मोबाइल हँडसेट निर्मिती उद्योगातील आघाडीची कंपनी तब्बल १२.५ अब्ज डॉलरला (५६,७५० कोटी रुपये) विकत घेऊन खळबळ उडवली. अशा प्रकारे ‘गुगल’ने  डेस्कटॉपवरून आता मोबाइल हँडसेटच्या क्षेत्रात उडी घेतली आहे. सध्या जागतिक पातळीवर गुगल, अ‍ॅपल, फेसबुक आणि अ‍ॅमेझॉन या चार कंपन्या डिजिटल युगात आपले वर्चस्व स्थापून आहेत. या चारही कंपन्यांची परस्परांत जीवघेणी स्पर्धा सध्या जागतिक बाजारपेठेत सुरू आहे.

‘अ‍ॅपल’ने स्मार्ट फोनच्या बाजारपेठेवर पूर्ण कब्जा मिळवल्याने त्यांना स्पर्धा निर्माण करणे आणि त्यासाठी ‘अ‍ॅपल’च्या दर्जाची उत्कृष्ट उत्पादने बाजारपेठेत आणणे हे आता गुगलचे लक्ष्य राहील. त्यांच्या या बाजारपेठेला आव्हान देण्यासाठी गुगलने मोटरोला ताब्यात घेऊन बाह्या सरसावल्या आहेत. मोटोरोलाच्या ताब्यात असलेली बौद्धिक सामर्थ्याची सुमारे १७ हजार पेटंट व १९ हजार ज्ञानसंपन्न अभियंत्यांची फौज आता या टेकओव्हरमुळे गुगलच्या हाती आली आहे. सध्याच्या डिजिटल युगात ज्याच्या हाती बौद्धिक संपत्ती तो राजा ठरतो. मोटरोलाने आपल्याकडील या बौद्धिक सामर्थ्याचा म्हणावा तेवढा प्रभावी वापर केला नाही किंवा त्यांना वाढत्या स्पर्धेला तोंड देताना म्हणावी तेवढी चांगली कामगिरी करता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच गुगलने या बाजारपेठेवर आपले अधिराज्य स्थापन करण्यासाठी मोटोरोलावर ताबा मिळवला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्याचबरोबर स्मार्ट फोन्ससाठी लागणारी अँड्रॉइड ही कार्यप्रणाली गुगलने विकसित केली. अर्थातच ही कार्यप्रणाली सध्या जगात लोकप्रिय झाली, ही बाब गुगलच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. मात्र अँड्रॉइड ही कार्यप्रणाली गुगल स्वत: तयार करीत असली तरी ती अन्य उत्पादकांच्या फोनमध्ये बसवली जाते. हँडसेट निर्मात्या कंपन्या ही कार्यप्रणाली गुगलकडून रीतसर विकत घेतात. गुगल मात्र स्वत: फोनचे उत्पादन आजवर करीत नव्हती. परंतु आता मोटोरोला ही हँडसेट उत्पादन करणारी कंपनी ताब्यात घेऊन गुगलने आपल्यातली ही व्यावसायिक उणीव दूर केली आहे. अर्थात, अँड्रॉइड ही कार्यपद्धती यापुढे अन्य कंपन्यांना न विकता फक्त आपल्याच मोटरोलाच्या हँडसेटमध्ये वापरण्याचे ठरवल्यास अन्य मोबाइल फोन कंपन्यांची भविष्यात मोठी गोची होऊ शकते.

आजवरच्या इतिहासात गुगलचे हे सर्वात मोठे टेकओव्हर आहे. यापूर्वी गुगलने २००८ मध्ये डबलक्लिक ही कंपनी ३.२ अब्ज डॉलरला खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी केलेले हे सर्वात मोठे डील आहे. आता मोटोरोला आपल्या ताब्यात घेतल्यावर गुगल तिचे स्वतंत्र अस्तित्व ठेवणार की आपल्यात विलीन करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु मोटरोला ताब्यात घेण्याची सर्व प्रक्रिया २०१२ च्या प्रारंभी पूर्ण केल्यानंतरच याविषयी निर्णय घेतला जाईल. अर्थात मोटोरोला विलीन झाल्यास वा न झाल्यास काही फरक पडणार नाही. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘गुगल’ची बाजारातली स्थिती मजबूत होणार आहे. कारण मोटोरोला घेण्यापूर्वी गुगलकडे वायरलेस व टेलिकॉम उद्योगातली फार कमी पेटंट होती. त्यामुळे ही पेटंट वाढावी हा सतत या कंपनीचा प्रयत्न होता. त्यानुसार त्यांनी अलीकडेच नॉर्टेल कॉर्पोरेशन ही कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यात ते यशस्वी झाले नव्हते. आता मात्र त्यांनी मोटरोला ताब्यात घेतल्याने त्यांच्याकडे हजारो पेटंट चालत आली आहेत. सध्या मोटोरोलाचा मोठा व्यवसाय हा स्मार्ट फोनच्या विक्रीतून येतो. १९२८ मध्ये स्थापन झालेल्या मोटोरोलाने जगातला पहिला पोर्टेबल मोबाइल फोन १९८३ मध्ये बाजारात आणला. भारतातही सर्वात प्रथम जो मोबाइल आला तो मोटरोलाचाच होता. त्या काळी मोबाइलचा आकार  वॉकीटॉकीएवढा होता. मात्र नंतर तंत्रज्ञान जसे विकसित होत गेले तसा मोबाइलचा आकारही कमी होत गेला. काही काळाने मोटोरोला कंपनीने त्यांचा मोबाइल फोन विभाग वेगळा केला आणि वेगळी कंपनी स्थापन झाली. मोबाइलच्या बाजारपेठेत आता जगात मोठे बदल होऊ घातले आहेत. मोटरोलापाठोपाठ कोणत्या मोबाइल हँडसेट निर्मिती कंपनीची ‘विकेट’ पडणार याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. ‘नोकिया’ या कंपनीने गेल्या वर्षात आपला बाजारपेठेतील वाटा गमावल्यामुळे ही कंपनी बहुधा कोणीतरी खरेदी करेल अशी चर्चा आहे. मोटरोलाची गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारे पीछेहाट झाल्याने तिला गुगलच्या पदराखाली जावे लागले. मोटरोलाला वाढत्या स्पर्धेत आपली कामगिरी चमकदार करणे शक्य नाही हे पटले होते.  दुस-या बाजूला आपली बाजारपेठ विस्तारण्यासाठी हँडसेट निर्मितीत उतरणे हा गुगलचा ‘मोटो’ होता.

0 Response to "‘गुगल’चा मोटरोलावर कब्जा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel