
भारताचा आता नवीन सुपर संगणक
भारताचा आता नवीन सुपर संगणक |
Published on 26 Aug-2011 Article for Kiyama |
प्रसाद केरकर, मुंबई |
याच्या उभारणीसाठी दहा हजार कोटी रुपये खर्च झाला तरी बेहत्तर; परंतु या सुपर संगणकाचे काम थांबता कामा नये, असे आदेश थेट पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आलेले आहेत. हा सुपर संगणक कार्यान्वित झाल्यावर भारत हा देश ‘सुपर कॉम्प्युटिंग हब’ होईल. या संगणकाचा उपयोग संरक्षण, अणुऊर्जा व अवकाश संशोधन या क्षेत्रात प्रामुख्याने केला जाणार असल्याने याची गुप्तता पाळण्यात येत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होणार आहे. आपण आयटी क्षेत्रात घेतलेल्या भरारीने अमेरिकेचीही धडकी भरली आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक क्रांतीची बीजे रोवली आणि आपल्या तरुण पिढीला एक नवे दालन त्यांनी खुले करून दिले. राजीव गांधींच्या या धोरणावर त्या वेळी सर्वच विरोधी पक्षांनी टीका केली खरी; परंतु हाच संगणक उद्योग आता आपल्याला सर्वात जास्त विदेशी चलन मिळवून देत आहे. मोठय़ा संख्येने रोजगारही या उद्योगाने दिला आहे. या संगणकाचा केवळ सरकारी क्षेत्राला फायदा होणार आहेच त्याचबरोबर खासगी कंपन्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे, असे ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ द अँडव्हान्स कॉम्प्युटिंग’चे संस्थापक संचालक विजय भटकर यांनी सांगितले. भारताने यापूर्वीही सुपर संगणक विकसित केला होता; परंतु आता आता नवीन उभारला जाणारा हा संगणक अत्याधुनिक असेल. यामुळे हवामानाचे अंदाज अचूक बांधता येतील. क्लिनिकल लॅबोरेटरीच्या अहवालाच्या विश्लेषणापासून ते गणिती, संशोधक यांना याचा मोठा उपयोग होईल. डेटा संशोधन, विश्लेषण, थ्रीडी अँनिमेशन यांच्यासह अनेक क्षेत्रांत खासगी उद्योगांना अत्याधुनिक संगणक लागतात. त्यांना याचा उपयोग करता येईल. अनेक खासगी कंपन्यांना सुपर कॉम्प्युटरची गरज भासते. उदाहरणार्थ - भारतातील एका तेल कंपनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आयबीएम सध्या सुपर कॉम्प्युटरचा वापर करते. आता त्यांना कालांतराने भारतातील हा सुपर कॉम्प्युटर वापरता येईल. आपल्याकडे या सुपर कॉम्प्युटरचा अशा प्रकारे विविध उद्योगात उपयोग होणार आहे. आपल्याकडे पुण्यातील टाटा कॉम्प्युटरिंग रिसर्च लॅबोरेटरीजने 2007 मध्ये बांधलेला सुपर कॉम्प्युटर हा त्या काळी चौथा वेगवान संगणक म्हणून ओळखला गेला होता; परंतु आता त्याचा क्रमांक 58वर फेकला गेला आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला एका बहुउद्देशीय सुपर कॉम्प्युटरची गरज होतीच. आता ही गरज भरून निघेल असे दिसते. Prasadkerkar73@gmail.com |
0 Response to "भारताचा आता नवीन सुपर संगणक"
टिप्पणी पोस्ट करा