-->
के.व्ही. कामथ यशस्वी बँकरची नवी इनिंग

के.व्ही. कामथ यशस्वी बँकरची नवी इनिंग


के.व्ही. कामथ यशस्वी बँकरची नवी इनिंग
Published on 27 Aug-2011 for pratima
प्रसाद केरकर, मुंबई
इन्फोसिसचे नारायणमूर्ती यांनी ज्या वेळी आपली सेवानिवृत्ती जाहीर केली होती त्या वेळी त्यांचा वारसदार कोण असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. जी काही अनेक नावे चर्चेत होती त्यात आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष कुंदापूर वामन कामथ यांचे नावही होते. वयाच्या 65व्या वर्षी ते ही जबाबदारी स्वीकारणार नाहीत अशी अनेकांची अटकळ होती; परंतु त्या सर्व तर्कांना विराम देत के. व्ही. कामथ यांनी इन्फोसिसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. एक यशस्वी बँकर म्हणून सर्वांना परिचित असलेल्या कामथ यांची आता एक नवीन ‘इनिंग’ इन्फोसिसमध्ये सुरू झाली आहे. 

आजवर त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक आव्हाने पेलली आहेत. आता हे नवीन आव्हनही ते सहजरीत्या पेलतील यात काहीच शंका नाही. कर्नाटकातील मंगलोर येथे 2 डिसेंबर 1947 रोजी जन्मलेल्या कामथ यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. सेंट अँल्युनस शाळेत शिक्षण पूर्ण केल्यावर कर्नाटक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते दाखल झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून त्यांनी पदवी संपादन केल्यावर 1969 मध्ये ते आयआयएम अहमदाबादमध्ये व्यवस्थापनातील उच्च पदवी संपादन करण्यासाठी दाखल झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण घेतलेल्या कामथ यांनी सुरुवातीपासूनच बँकिंग उद्योगात आपले करिअर केले. तसे पाहता त्यांच्या शिक्षणाचा व करिअरचा काडीमात्र संबंध नव्हता. असे असले तरी त्यांनी आपले करिअर यशस्वी घडवले. 1971 मध्ये आयआयएम पूर्ण केल्यावर कामथ आयसीआयसीआय या त्यावेळच्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणार्‍या सरकारी मालकीच्या उपक्रमामध्ये प्रकल्प वित्तसाहाय्य विभागात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तेथे विविध विभागांत काम केले. त्या वेळी त्यांनी आयसीआयसीआयच्या व्यवसाय वृद्धीसाठी अनेक उपाय योजले आणि त्यात ते यशस्वी झाले. 1998 मध्ये त्यांनी अखेर आयसीआयसीआयचा राजीनामा दिला आणि ते एशियन डेव्हलपमेंट बँकेत मनिला येथे दाखल झाले. एडीबीमध्ये असताना त्यांनी चीन, भारत, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, बांगलादेश व व्हिएतनाम या देशांतील विविध विकास प्रकल्प हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले. 1996 मध्ये कामथ पुन्हा मायदेशी परतले आणि त्यांनी आयसीआयसीआयचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी आयसीआयसीआयचे बँकेत रूपांतर करण्यात आले. अशा प्रकारे एका सरकारी उपक्रमाचे खासगी बँकेतही कालांतराने परिवर्तन करण्यात आले. आयसीआयसीआयचे आयसीआयसीआय बँकेत विलीनीकरण झाले. या दोन्ही टप्प्यांत कामथ यांनी फार महत्त्वाची कामगिरी बजावली. आयसीआयसीआयचा चेहरा पूर्णपणे बदलून एक आघाडीची बँक म्हणून नावारूपाला आणण्यात कामथ यांचा मोलाचा वाटा होता. कामथ यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 2008 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन सरकारने सन्मानित केले. त्याशिवाय बिझनेसमन ऑफ द इयर, बँकर ऑफ द इयर, जीवन गैरव पुरस्कार, एशियन बिझनेस लीडर ऑफ द इयर असे अनेक सन्मान व पुरस्कार त्यांना मिळाले. बनारस हिंदू विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला. 30 एप्रिल 2009 रोजी ते आयसीआयसीआयमधून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळात संचालकपदी होते. आता मात्र त्यांनी इन्फोसिस कंपनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आयटी उद्योग तसेच इन्फोसिस एका नव्या वळणावर येऊन ठेपली असताना त्यांच्याकडे या कंपनीची जबाबदारी आली आहे. अमेरिका तसेच युरोपातील मंदीच्या वातावरणामुळे आयटी उद्योगाला नवीन बाजारपेठा शोधाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर इन्फोसिस ही कंपनी देशात दुसर्‍या क्रमांकावर असली तरी त्यांना टाटा समूहाची या उद्योगातील कंपनी टीसीएसला उलाढालीत मागे टाकायचे आहे. कामथ यांचा आजवरचा कॉर्पोरेटमधला अनुभव लक्षात घेता ते इन्फोसिसला पहिल्या क्रमांकावर नेतील, असा विश्वास इन्फोसिसच्या व्यवस्थापनाला वाटतो. कामथ यात खरोखरीच यशस्वी होतील का, या प्रश्नाचे उत्तर येत्या काही वर्षांत आपल्याला मिळेलच. 

prasadkerkar73@gmail.com

0 Response to "के.व्ही. कामथ यशस्वी बँकरची नवी इनिंग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel