-->
घरगुती बचतीची  घसरण  चिंतेची

घरगुती बचतीची घसरण चिंतेची


घरगुती बचतीची 
घसरण 
चिंतेची
 Published on 29 Aug-2011 Arthprava
प्रसाद केरकर, मुंबई
देशात एकदा निराशेचे वातावरण सुरू झाले की ते रोखणे कठीण असते. गुंतवणूकदारांच्या मनावरही आता निराशेच्या वातावरणाने पूर्णपणे ताबा घेतला आहे. गेल्या वर्षात महागाईने उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष प्रत्यक्षात गुंतवणूक करण्याकडून दूर झाल्याचे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले. गुंतवणुकीचा दर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10 टक्क्याच्या खाली गेला. गेल्या 13 वर्षांत हे प्रमाण एवढे खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. जगाच्या तुलनेत आपल्याकडे गुंतवणुकीचे प्रमाण समाधानकारक असले तरी गेल्या वर्षात ज्या वेगाने हे प्रमाण घसरले ती चिंतेची बाब ठरावी अशीच स्थिती आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदार हा आपली गुंतवणूक बँकांतील वा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांतील मुदत ठेवी, शेअर्स, डिबेंचर, पोस्टाच्या बचत योजना आणि विविध प्रकारच्या विमा योजना यात प्रामुख्याने गुंतवणूक करीत असतो. गेल्या वर्षी गुंतवणुकीचा हा दर 12 टक्क्यांवर होता. तो आता घसरून 9.7 टक्क्यांवर आला आहे. शेअर बाजारातील मंदीमुळे समभागातील घसरलेली गुंतवणूक आपण समजू शकतो. कारण मंदीच्या काळात समभागातील गुंतवणूक नेहमीच कमी होते. तेजीच्या काळात समभागात गुंतवणूक करणारे वाढतात हा नेहमीचाच कल असतो. सेन्सेक्सच्या घसरणीचा परिणाम म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही लोकांनी काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक म्युच्युअल फंडातील गुंतवणूक घसरणे स्वाभाविक आहे. मात्र, बँकांच्या ठेवींचे दर वाढूनही या ठेवींचे प्रमाण काही विश्ेाष वाढलेले नाही ही सर्वात चिंतेची बाब ठरावी. याचा एकच अर्थ आहे की, वाढत्या महागाईमुळे लोकांचा बचत करण्याचा कल कमी झाला आहे. गेल्या वर्षात ठेवींचे व्याज दर वाढले असले तरीही कर्जाचेही दर वाढले आहेत. त्याच्या जोडीला महागाई वाढलेली असल्याने लोकांकडे बचत करण्यासाठी पैसा हातात कमी शिल्लक राहत आहे. कर्जाचे दर वाढल्याने गृहकर्ज महागले आहे. याचा सर्वात मोठा फटका घर घेणार्‍या मध्यमवर्गीयांना बसला आहे. एकीकडे वाढत असलेली महागाई, समभागांची सुरू असलेली घसरण, त्याचा परिणाम म्हणून म्युच्युअल फंडांचाही लाभ कमी झाल्याने लोकांना यात पुन्हा गुंतवणूक करणे लाभदायक वाटत नाही. दुसरीकडे सोन्याच्या भावाने दररोज नवनवीन उचांक गाठण्याची स्पर्धाच चालवली आहे. देशाचा गुंतवणुकीचा दर 2004 मध्ये 8 टक्के होता. पुढच्या पाच वर्षात हा दर तब्बल 30 टक्क्यांवर पोहोचला. यामुळे देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार झाले. विदेशातील गुंतवणुकीच्या ओघावर अवलंबून राहण्याची पाळी आली नाही. गेल्या दश्कात भारत व चीन या दोन देशांत गुंतवणुकीचा वेग चढता राहिल्याने याचा फार मोठा फायदा झाला; परंतु चलनवाढीने वेग धरल्यावर मात्र या गुंतवणुकीच्या वाढीला आळा बसला. गेल्या दोन वर्षांत चलनवाढीचा वेग वाढल्याने अनेकांची घरगुती बचतीची समीकरणे बदलली आहेत. बचतीला प्राधान्य देण्याऐवजी वाढत गेलेल्या खर्चांचा मेळ बसवणे गरजेचे ठरले. यातून बचत कमी होऊ लागली आहे; परंतु ही स्थिती कायम टिकणारी नाही. येत्या काही महिन्यांत चलनवाढीला आळा बसल्यास तसेच शेअर बाजारातील मंदी संपुष्टात आल्यास हे चित्र पालटू शकते.

0 Response to "घरगुती बचतीची घसरण चिंतेची"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel