-->
कॉर्पोरेट जगताला धक्के देणारा उद्योगपती अजय पिरामल

कॉर्पोरेट जगताला धक्के देणारा उद्योगपती अजय पिरामल

कॉर्पोरेट जगताला धक्के देणारा उद्योगपती अजय पिरामल
Published on 20 Aug-2011 for pratima
प्रसाद केरकर
भारतीय कॉर्पोरेट जगताला आश्चर्याचे धक्के देणारे हे अजय पिरामल आहेत तरी कोण? 20 डिसेंबर 1955 रोजी राजस्थानात जन्मलेले अजय हे आज देशातील आघाडीच्या 50 र्शीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन अजय जन्माला आले असले तरी त्यांनी मोठय़ा हिमतीने आपल्या उद्योगसमूहाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले.

मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी संपादन केल्यावर अजय पिरामल यांनी जमनालाल बजाजमधून व्यवस्थापनातील पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून व्यवस्थापनातील उच्च पदवी संपादन केली. त्यांचे वय 29 वर्षे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या वेळी पिरामल समूह हा प्रामुख्याने वस्त्रनिर्मिती उद्योगातच होता. वडिलांच्या निधनानंतर या समूहाची सर्व सूत्रे अजय यांच्या थोरल्या बंधूंकडे आली.

दुर्दैवाने त्यांच्या या थोरल्या बंधूचे पाच वर्षात निधन झाले. त्याचदरम्यान पिरामल बंधूंमध्ये मालमत्तेची वाटणी झाली. 1982 मध्ये मुंबईत गिरणी कामगारांचा संप झाला आणि पिरामल समूहाची आघाडीची कंपनी मोरारजी मिल्स तोट्यात आली. अशा प्रकारे अजय पिरामल यांच्या हातात सूत्रे आली त्या वेळी या समूहाची कामगिरी निराशाजनकच होती. अजय पिरामल यांनी अशा या कठीण काळातून आपल्या समूहाला सावरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

1988मध्ये ऑस्ट्रेलियाची बहुराष्ट्रीय औषधांची कंपनी निकोलस लॅबोरेटरीज भारतातील आपल्या कंपनीची विक्री करणार असल्याचे अजय यांना समजले आणि त्यांनी यात रस दाखवला. ही कंपनी त्यांनी ताब्यात घेतली. या कंपनीत त्यांनी आक्रमकरीत्या विस्तार प्रकल्प आखले. देशातील औषधांची बाजारपेठ या वेळी वाढत असल्याने त्याचा त्यांना फायदा मिळाला. ही कंपनी त्यांनी देशातील पहिल्या पाच औषध कंपन्यांत नेऊन पोहोचवली.

निकोलस ताब्यात घेऊन तिचा यशस्वी विस्तार केल्यावर पिरामल यांचा विश्वास वाढला आणि त्यांनी कंपन्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. पुढील काही वर्षांत त्यांनी रोश, बोरिंजल मेहॅम, रोहन्हे प्युमिक, आय.सी.आय. आणि हेक्ट संशोधन केंद्र या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील उपकंपन्या त्यांनी ताब्यात घेतल्या. एकेकाळी तोट्यात असलेल्या वस्त्रनिर्मिती कंपनीचा ताबा मिळवल्यापासून त्यांनी सुरुवात करून आपला समूहाची उलाढाल तब्बल 4000 कोटी रुपयांवर नेली. त्यांनी देशातला पहिला मॉल सुरू केला.

मुंबईत ताडदेव या गजबजलेल्या भागात त्यांनी आपल्या औषध कंपनीच्या प्रकल्पाचे रूपांतर एका आलिशान मॉलमध्ये ‘क्रॉसवर्ड्स’मध्ये केले. या मॉलचे रूपांतर करण्यासाठी त्यांनी खास सिंगापूरहून आर्किटेक्ट आणले होते. कालांतराने त्यांनी योग्य वेळ येताच हा मॉल विकूनही टाकला. त्या वेळीही अनेकांना आश्चर्य वाटले होते. तसेच त्यांनी आपल्या औषध कंपनीतील एक विभाग गेल्या वर्षी विकला होता. यातून त्यांना तब्बल तीन अब्ज डॉलर मिळाले होते. यातीलच काही गुंतवणूक आता त्यांनी व्होडाफोन एस्सारमध्ये केली आहे. एक सच्चा मुंबईकर म्हणून ओळखला गेलेला हा उद्योगपती वारंवार आश्चर्यकारक निर्णय घेऊन देशाच्या कॉर्पोरेट जगताला धक्के देत आला आहे.

कंपन्या ताब्यात घेणे आणि योग्य वेळ आली की त्या विकणे यात माहिर असलेले पिरामल यांनी व्होडाफोनमधील गुंतवणूक याच उद्देशाने केलेली आहे यात काहीच शंका नाही. आणखी काही वर्षांनी अजय पिरामल यांनी एस्सारमधील आपला हा भांडवली वाटा विकल्याची बातमी आल्यासही आश्चर्य वाटावयास नको.

Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "कॉर्पोरेट जगताला धक्के देणारा उद्योगपती अजय पिरामल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel