-->
संपादकीय पान मंगळवार दि. ८ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
नर्सेस परतल्या, पुढे काय...?
------------------------------
इराकमधील ४७ भारतीय नर्सेस गेले महिनाभरांनतर अतिरेक्यांच्या तावडीतून सुटल्यावर आता पुन्हा मायदेशी परतल्या आहेत. तेथे असलेले विविध प्रकारची कामे करणारे सुमारे २२०० भारतीय मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत. इराकमधील या नर्सेसचे भारतात स्वागत करीत असताना आपल्यापुढे अनेक प्रश्‍न उभे राहाणार आहेत. विदेशातील जे भारतीय तेथे चांगले वेतन घेऊन मायदेशी विदेशी चलन पाठवित असताना त्यांच्या परतण्याने एक मोठे आव्हान आपल्या देशापुढे उभेे राहाणार आहे. केवळ इराकच नव्हे तर विदेशात असलेले करोडो लोक भारतात गुंतवणुकीच्या रुपाने विदेशी चलन पाठवून देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा हातभार लावीत असतात. आखाती देश हा लाखो भारतीयांसाठी अकुशल कामगारांसाठी एकेकाळी कष्ट करुन पैसे कमविण्याचे साधन झाला होता. अनेक दक्षिणेतील राज्यांमध्ये त्यांनीच विदेशी घाम गाळून भारतात पैसा पाठविला. यातूनच त्यांनी भारतात घरे बांधली, उद्योग-व्यवसाय सुरु केले. त्याचबरोबर चांगल्या शिक्षित भारतीयांसाठी अमेरिका, युरोपातील देश हे चांगली कमाई करण्यासाठी खुणावू लागले. डॉलर कमविणारे हे भारतीय मात्र परत भारतात येण्यास काही राजी होत नाहीत. अर्थात त्यांना तेथे स्थैर्य असल्यामुळे भारतात परतण्याची गरजही वाटत नाही. सध्या सर्वात जास्त अस्वस्थता इराकमध्ये आहे. इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया (आयएसआयएस) या संघटनेने इराकमध्ये गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवत त्या देशाची सत्तासूत्रे हाती घेण्यासाठी आक्रमक पावले टाकायला सुरुवात केली आहे. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी इराकमधील मोसूल शहरावर कब्जा केला असून तेथील काही प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली. जगातील मुस्लिमांनी आपली आज्ञा पाळावी तसेच जागतिक स्तरावर जिहाद छेडण्यासाठी सज्ज व्हावे असे आगखाऊ भाषण आयएसआयएसचा प्रमुख नेता अबू बक्र अल-बगदादी याने नुकतेच केल्याने इराकमधील तणावात आणखी भर पडली. इराकमध्ये आयएसआयएसने घातलेल्या धुमाकुळास प्रारंभ होण्यापूर्वी तिथे सुमारे दहा हजार भारतीय होते, असे सांगितले जाते. त्यापैकी किती हजार भारतीय अजूनही इराकमध्ये अडकलेले आहेत याचा नेमका अंदाज येणे कठीण झाले आहे. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांची इतकी मजल गेली होती की त्यांनी इराकमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय परिचारिकांना ओलीस ठेवले होते. त्यांच्या तावडीतून मुक्तता करून ४७ भारतीय परिचारिकांसह सुमारे १३७ भारतीय नागरिकांना इराकमधून भारतात शनिवारी परत आणण्यात केंद्र सरकारला यश आले. या ४६ परिचारिकांपैकी एक सोडून बाकी सार्‍या जणी एकट्या केरळ राज्यातील आहेत. त्यांनी इराकमधील अराजकाची जी वर्णने केली आहेत ती अंगावर काटा आणणारी आहेत. या परिचारिकांना इराकमधून भारतात सुखरूप परत येईपर्यंत आपण जिवंत राहू याची शाश्वती नव्हती. आता जीव धोक्यात घालून पुन्हा इराकमध्ये नोकरीसाठी जाण्याची या परिचारिकांपैकी एकीचीही तयारी नाही, यावरून तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे. इराक-इराण युद्ध तसेच इराक, कुवेत, अफगाणिस्तानसारख्या देशांत जेव्हा जेव्हा युद्धप्रसंग किंवा अराजक निर्माण झाले तेव्हा तेथे नोकरीधंदा करणार्‍या भारतीयांना सुखरूप मायदेशात आणण्याची जबाबदारी केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, त्यांनी ती नीटसपणे पार पाडली होती. १९७० व १९८०च्या दशकात इराकमधील बाथ पक्षाच्या सरकारने आपल्या देशातील अनेक विकास प्रकल्पांची कंत्राटे भारतीय कंपन्यांना देऊ केली होती. त्या वेळेपासून त्या देशात नोकरीधंद्यानिमित्त भारतीय मोठ्या प्रमाणावर जाऊ लागले होते. अमेरिकेने कारवाई करून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन याची सत्ता उधळून लावली होती. त्याला फासावर लटकावले. अमेरिकेच्या मनाप्रमाणे सारे घडूनसुद्धा त्यानंतरही इराकमध्ये स्थिर राजकीय राजवट अस्तित्वात येऊ शकलेली नाही. सद्दाम हुसेन हा अतिरेकी असल्याचा व त्याने रासायनिक शस्त्रे ठेवल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. हा आरोप अमेरिका मात्र कधीही सिध्द करु शखली नाही. सध्दाम हुसेन कसाही असो त्याने एक चांगली शासनव्यवस्था अंमलात आणली होती. त्या देशात जी स्थिरता होती ती आता संपुष्टात आली आहे आणि याला अमेरिका कारणीभूत आहे हे मान्य करावयास हवे.  सद्दामच्या पश्‍च्यात या देशात अराजकसदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. या अराजकाचा फायदा दहशतवादी आता उठवत आहेत. सद्दाम हुसेन हा हुकूमशहा असला, तरी त्याला भारत व भारतीयांविषयी मनातून प्रेम होते. सद्दामच्या राजवटीत इराकी लष्कराच्या तुकड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने भारतीय लष्कराचेच आवर्जून सहकार्य घेतले होते. अशा विविध पातळ्यांवर इराक व भारत संबंध प्रस्थापित झालेले असल्यामुळे त्या देशातील यादवीवर भारताचे बारीक लक्ष असणे स्वाभाविकच आहे. इराकप्रमाणेच युक्रेनमध्येही अराजकी स्थिती अजूनही कायम आहे. इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूडचा नेता मोहंमद बदी व त्याच्या समर्थकांना तेथील न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्याने त्या देशातील बंडखोरांतही अस्वस्थता आहेच. अफगाणिस्तानातील हेरात शहरात असलेल्या भारतीय वकिलातीवर गेल्या मे महिन्यात दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. पण त्यांचा हा प्रयत्न फसला. अफगाणिस्तानात सुरू असलेल्या अनेक  विकास प्रकल्पांमध्ये काम करणार्‍या भारतीयांवरही दहशतवादी हल्ले होण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. नेपाळ, बांगलादेश या शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या भारतीयांविरोधात नफरत निर्माण करण्याचे षड्यंत्र आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने आखले होते. त्यात ते काही प्रमाणातही यशस्वी झाले होते. इराकमधील ही यादवी भारताच्या मुळावर येणार आहे. एकतर खनिज तेल महाग होत चालले आहे आणि दुसरीकडे तेथील भारतीय मायदेशी परतत असल्याने त्यांना रोजगार देण्याचे आव्हान आपल्यावर आहे.
--------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel