-->
संरक्षण दलाचा अपमान

संरक्षण दलाचा अपमान

संपादकीय पान बुधवार दि. १७ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
संरक्षण दलाचा अपमान
संरक्षण मंत्री हे कसे नसावेत, असा प्रश्‍न पडेल असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले आहे. संरक्षण मंत्र्यांच्या विधानांमुळे देशातील संरक्षण दलाचा कणा असलेल्या सर्वसामान्य सैनिकाच्या मनात देशाविषयी आणखी प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. त्याच्या मनात देशाच्या सीमेवर लढण्याची उर्मी चेतावली गेली पाहिजे. परंतु पर्रिकर यांनी केलेल्या विधानामुळे संरक्षण दलाचा अपमानच सन्मान सोडा पण अपमानच केला आहे. गेली ४०-५० वर्षे भारतीय लष्कराने युद्धच लढलेले नाही; त्यामुळे त्यांना कुणी गांभीर्याने घेईनासे झाले आहे. त्याचे महत्त्व घटले आहे, असे अजब तर्कट केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र त्याचवेळी, हे वक्तव्य म्हणजे मी युद्धखोर आहे, असे नव्हे, असेही त्यांनी म्हटले आहे. देशाच्या सीमेच्या सुरक्षेबाबतची आव्हाने व त्यावरील उपाय या संदर्भात जयपूर येथे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात पर्रीकर यांनी वरील तर्कट मांडले. सीमेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. त्यातील थोडक्या मुख्यमंत्र्यांनी त्यास अनुसरून पावले टाकली, तर अनेकांनी काहीच केले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे लष्कराचे कमी झालेले महत्त्व हे आहे, असे पर्रीकर म्हणाले. गेली ४० ते ५० वर्षे भारतीय लष्कराने युद्धच लढलेले नाही. कुठलेही युद्ध न लढता लष्करी अधिकार्‍यांच्या दोन पिढ्या निवृत्त झाल्या. याचा अर्थ आपण लगेच युद्ध लढावे, असे मला म्हणायचे नाही. लष्कराचे स्वतःचे असे महत्त्व आहेच. पण, युद्धाअभावी लष्कराचे महत्त्व कमी होते, हे मला अधोरेखित करायचे आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. त्यासोबत, जे राष्ट्र स्वतःच्या लष्कराचे रक्षण करू शकत नाही, ते प्रगती करू शकत नाही, असेही पर्रीकर म्हणण्यास विसरलेले नाहीत. आता पर्रिकरांचे हे विधान त्यांच्या आंगलटी येण्याची शक्यता असल्याने माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला असा खुलासा ते नेहमीच्या राजकारण्यांनुसार करतील. अर्थात अलिकडच्या काळातील पर्रिकरांचे हे दुसरे वादग्रस्त वक्तव्य आहे. अतिरेकी राखण्यासाठी अतिरेकीच तयार करावे लागतील असे विधान केले होते. हे विधान देखील त्यांच्या आंगलटी आले होते. एका जबाबदार मंत्रीपदाचा भार स्वीकारलेला असताना असे विधान करणे केव्हाही धोकादायक आहे हे पर्रिकरांसारखा आय.आय.टी.तून शिकलेला ज्येष्ठ राजकारणी समजू शकत नाही याचे आश्‍चर्य वाटते. आता देखील त्यांनी सरंक्षण दलाचा अपमान करणारे विधान केले आहे. गेल्या ४०-५० वर्षे देशात युध्द झाले नाही व त्यामुळे संरक्षम दलाला त्यांचा मान मिळत नाही हे विधान म्हणजे इतिहासाचा विपर्यास करणारे आहे. कारण पर्रीकर कारगिलसह काश्मीरमध्ये जवळपास दररोज होणार्‍या छुप्या युद्धापर्यंतचा ताजा इतिहास कसा विसरू शकतात. त्यांनी तज्ज्ञ मंडळींकडून नेमका विचार समजून, मग विधान करणे गरजेचे होते. कारगिल हे युध्दच होते व भाजपाच्या काळातच ते झाले होते. त्यामुळे कारगिल हे युध्द नव्हते असे ते म्हणू शकत नाहीत. केवळ कारगिलच नव्हे तर पाकिस्तानच्या सीमेवर दररोज छुपे युध्द सुरु असते व त्या युध्दात अनेक जवान धारातीर्थी पडत असतात. युध्द म्हणजे दोन देशांनी केवळ घोषणा करुनच कारवयाचे असते काय? आज जी आपल्या सीमेवर अघोषीत युध्दे सुरु असतात किंवा जगात चालली आहे ती छुपी युध्द सुरु आहेत त्याबाबत परर्रिकारांना कल्पना नाही असे म्हणावयाचे का? किंवा सरकारच्या अशा अनास्थेमुळेच सैनिकांना व एकूणच संरक्षण दलाला समाजात मान सन्मान मिळत नाही असे वाटते. पर्रिकर आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नात अहेर देण्यासाठी रांगेत उभे होते असे सोशल मिडियावर मोठ्या अभिमानाने प्रसारित केले गेले. मात्र याच पर्रिकरांना माजी सैनिकांना आपली कामे करुन घेण्यासाठी किंवा पेन्शन मिळविण्यासाठी रांगा लावाव्या लागतात याची जाणीव त्यांना करुन देण्याची गरज आहे. आता एक रँक एक पेन्शन योजनेचा प्रश्‍न सरकारने सोडवितो असे निवडणूकपूर्व दिलेले आश्‍वासन अजूनही एक वर्ष झाले तरी सोडविलेले नाही. सरकारी तिजोरीवर यामुळे भार पडेल असे सरकारला आता वाटतो, मात्र सत्तेवर येण्यासाठी हे आश्‍वासन देताना हा मुद्दा लक्षात आला नव्हता का हा प्रश्‍न आहे. तसेच लष्कर हे केवळ युध्दाचे सीमेवर काम करते असे नाही तर देशात कोणताही युध्दजन्य परिस्थिती उभी राहिल्यास मग पूर असो, भूकंप असो किंवा कोणतीही आपत्ती असो लष्कर देश सेवेत तत्पर हजर असते. लष्कराची ही कामगिरी अत्यंत मोलाची असते. पर्रिकरांनी बेजबाबदार वक्तव्ये करताना लष्कराच्या या मोलाच्या कामगिरीचा विसर पडला असावा असेच दिसते. यासाठी पर्रिकरांनी देशाची माफी मागावयास हवी. युध्द झालेले नसतानाही जे जवान शहीद गेल्या काही वर्षात झाले आहेत त्यांचा अप्रत्यक्षरित्या अपमानच त्यांनी केला आहे. लष्कराचा विसर जर पडत असले तर लोकांना नाही, देशातील जनतेला सैनिकांचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे, मात्र विसर पडला आहे तो सरकारलाच असे खेदाने बोलावे लागते.
------------------------------------------------------

0 Response to "संरक्षण दलाचा अपमान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel