-->
मानवतावादाचा पुळका

मानवतावादाचा पुळका

संपादकीय पान गुरुवार दि. १८ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मानवतावादाचा पुळका
विरोधी पक्षाच्या बाकावर असताना आक्रमकपणे वावरणार्‍या व भाजपाची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखल्या गेलेल्या सुषमा स्वराज यांना सध्या मानवतावादाचा मोठा पुळका आलेला आहे. सत्तेत आल्यावर अनेकजण आपले रंग बदलून एकदम मवाळ बनतात, यामागची कारणे शोधली पाहिजेत. सुषमा स्वराज यांनी ७०० कोटी रुपयांचा घपला करुन देशातून पलायन करणारा आय.पी.एल.चा आयुक्त ललित मोदी याच्या पत्नीला आजारपपणासाठी मदत करण्यासाठी ज्या बाह्या सरसावल्या ते पाहता त्यांचा हा केवळ मानतावादाचा पुळका नाही तर यामागे निश्‍चितच काही हितसंबंध दडलेले आहेत. देशाला ७०० कोटी रुपयांनी गंडविणार्‍या आणि कायद्यापासून स्वत:ची सुटका करण्यासाठी फरार होऊन इंग्लंडमध्ये वास्तव्याला असणार्‍या ललित मोदी याच्याजवळ रीतसर पासपोर्ट नसतानाही इंग्लंडहून पोर्तुगालला जायला सुषमा स्वराज यांनी मदत केली व तसे करताना आपले मंत्रालयच नव्हे तर स्वत:चे व्यक्तिगत संबंधही त्यांनी वापरले. एकेकाळी आयपीएलचा सर्वेसर्वा म्हणून वावरणार्‍या या ललित मोदीवर ७०० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. तो या आयपीएलमध्ये असताना त्याच्यासोबतच्या खुर्चीवर क्रिकेटचे सामने हंसतखेळत पाहणार्‍या सुषमाबाईंची छायाचित्रे देशाने दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यावर पाहिली आहेत. ललित मोदी कायद्ाच्या कचाड्यातून सुटण्यासाठी सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याच्या पत्नीचे पोर्तुगालमध्ये कॅन्सरचे ऑपरेशन व्हायचे आहे. त्यासाठी द्याव्या लागणार्‍या हमीपत्रावर सही करायला त्याला त्या देशात जायचे आहे आणि तशी सोय त्याच्याजवळ नियमित पासपोर्ट नसतानाही सुषमाबाईंनी त्याला करून दिली. परंतु आता प्रसिध्द झालेल्या बातम्यांनुसार, पोर्तुगालमध्ये पत्नीच्या ऑपरेशनपूर्वी द्यावयाच्या हमीपत्रावर पतीची सही घेण्याची तरतूद पोर्तुगालच्या कायद्यातच नाही. ललित मोदीला मी केलेली मदत केवळ मानवतावादी भूमिकेतून केली असल्याचे सुषमा स्वराज यांचे सांगणे आहे. त्याच्यावर ७०० कोटींच्या अपहाराचा आरोप असताना व देशाचा सुटाबुटातला आर्थिक गुन्हेगार आहे त्याला देशाचे परराष्ट्र मंत्रालयच मदत केवळ मानवतावादामुळे करु शकते काय? अशा प्रकारच्या सर्वच आरोपींना केंद्र सरकार याच मानवतावादी भूमिकेतून असे सहाय्य करणार आहे काय? एकीकडे नरेंद्रभाई मोदी विदेशातला काळा पैसा परत आणण्याची भाषा निवडणुकीपासून करीत आहेत तर दुसरीकडे जो आर्थिक गुन्हेगार विदेशात दडून बसला आहे त्याला सरकार सहकार्य करते याला काय म्हणावयाचे? सुषमाबाईंचे यजमान व कन्या हे दोघेही वकिलीच्या व्यवसायात असून ते या ललित मोदीच्या बचाव पक्षाचे काम करीत आहेत. कदाचित त्यामुळे सुषमा स्वराज यांनी मोदींना बचावण्यासाठी हे काम केले असावे, याची शंका जास्त येते. कुप्रसिध्द तस्कर दाऊद इब्राहिम याला जर अशा प्रकारची मदत लागली तर सरकार करणार का, असाही सवाल उपस्थित होतो. ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी सुषमा स्वराज यांच्यापाठोपाठ वसुंधरा राजे यादेखील अडचणीत सापडल्या आहेत. ललित मोदींच्या इमिग्रेशन कागदपत्रांवर वसुंधरा राजे यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी दिली होती अशी माहिती समोर आली असून भाजपाने सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्ष कॉंग्रेसने केली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे कुटुंबीय व ललित मोदी यांचे घनिष्ठ संबंधही आता उघड झाले आहेत. ललित मोदींच्या इमिग्रेशन पेपरवर गुप्त साक्षीदार म्हणून राजे यांनी स्वाक्षरी केली होती. याशिवाय ललित मोदी यांच्या कॅन्सरग्रस्त पत्नीला घेऊन वसुंधरा राजे या दोन वेळा पोर्तुगालमध्ये उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या असे समजते. विशेष बाब म्हणजे पोर्तुगालमधील ज्या रुग्णालयात ललित मोदींच्या पत्नीवर उपचार झाले, त्याच रुग्णालयाने राजस्थानमध्येही कर्करोग रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. गोरगरीब कर्करुग्णांवर अल्पदरात उपचार मिळावे यासाठी राजस्थान सरकार व संबंधीत रुग्णालय यांच्यात हा करार झाल्याची माहितीही समोर आली आहे. वसुंधरा राजे यांच्या मुलाच्या कंपनीलाही ललित मोदींनी आर्थिक पाठबळ दिले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. सुषमा स्वराज या तशाही मुळातल्या संघ परिवाराशी संबंधित वा भाजपच्या कार्यकर्त्या नाहीत. त्यामूळच्या समाजवादी परिवारातल्या आहेत. जॉर्ज फर्नांडिसांच्या आग्रहावरून त्या भाजपात आल्या. त्यांच्या आताच्या अडचणीत त्यांना पाठिंबा द्यायला पुढे झालेल्या समाजवादी पक्षाचे त्यांच्याशी असलेले हे कनेक्शन नीट लक्षात घ्यावे असेही आहेतच. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सुषमाबाईंना संरक्षण देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र तो असमर्थनीयच नव्हे तर दुबळाही आहे. पूर्वी डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधानपदी असताना ते अनेक विषयावर मौन पाळत. त्यांच्या या स्वभावाची टीका करण्यात मोदी आघाडीवर होते. आता मात्र अडचणीची बाब असली की मोदी मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे मौन पाळणे पसंत करीत आहेत. खरे तर त्यांनी आपला कारभार पारदर्शक असेल असे आश्‍वासन दिले होते. पंतप्रधान रेडिओवरुन देशाला संबोधित करतात, मात्र एका महत्वाच्या विषयावर मौन पाळतात हे काही पटत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांच्या या सगळ्याला छुपा पाठिंबा आहे. किंवा त्यांना सुषमा स्वराज व वसुंधराराजे या दोघांचा गेम करावयाचा असावा. एकूणच काय भाजपाच्या सरकराचे रंग एका वर्षातच उघड होऊ लागले आहेत. ललित मोदी हे त्यातील एक महत्वाचे प्रकरण.
----------------------------------------------------

0 Response to "मानवतावादाचा पुळका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel