-->
नगरांचा शिल्पकार

नगरांचा शिल्पकार

संपादकीय पान शुक्रवार दि. १९ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नगरांचा शिल्पकार
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुविशारद चार्ल्स कोरिआ यांचे मंगळवारी रात्री मुंबईत अल्पशा आजाराने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. कोरिआ यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील अनेक ऐतिहासिक वास्तू उभ्या राहिल्या. यामध्ये गुजरातमधील गांधी स्मारक, भोपाळमधील विधान भवन, गोव्यातील कला अकादमी, पुण्यातील आयुका, बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानक आणि संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कार्यालयाचा समावेश तसेच संपूर्ण नवी मुंबईची उभारणी याचा समावेश आहे. कोरिया यांच्या रुपाने आपण एक जागतिक किर्तीचा शिल्पकार गमावला आहे. सध्याच्या काळात प्रामुख्याने शहरांचा विकास झपाट्याने होत असताना त्याचे नियोजन करणे फार महत्वाचे असते. केवळ चार भींती उभारल्या म्हणजे घर उभे रहात नाही. तर घरांचा समूह एकत्र झाला की शहर रहात नाही. शहर व त्यातील घरे उभारण्यासाठी कल्पकता लागते, नियोजन करावे लागते तरच ते शहर सजते. नाहीतर ओबडधोबड शहरे ही त्या देशावर बोजा म्हणून राहातात. गेली साडे सहा दशके चार्ल्स कोरिया घरे, इमारती व शहरे उभारण्याचे काम करीत आले. परंतु त्यांच्या प्रत्येक कार्यात कधीही तोच-तोच पण नव्हता. त्यांनी उभारलेली प्रत्येक इमारत ही वास्तुशिल्पाचा एक नमुना ठरली आहे. त्यामुळेच त्यांचे नाव केवळ देशात नव्हे तर जगात झाले. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना १९७२ मध्ये पद्मश्री आणि २००६ पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. कोरिआ यांचा भारताप्रमाणेच मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधील द ब्रेन सेंटर आणि कॅनडातील इस्माईली सेंटर इन टोरांटोच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा होता. मुंबई शहर जसे गेल्या ५० वर्षांपूर्वी वाढायला सुरुवात झाली तसे मुंबईला एका जुळ्या शहराची गरज भासू लागली होती. मुंबईतील लोकसंख्या वाढीचा स्फोट त्याशिवाय रोखणे कठीण होते. त्यावेळी सरकारने नवी मुंबई हे जुळे शहर विकसीत करण्याचे ठरविले. हे शहर नियोजित असावे व ते एका चांगल्या नगरविकास तज्ञाकडून वसवून घ्यावे असा सरकारचा विचार होता. अर्थातच त्यावेळी कोरिया यांचे नाव पुढे आले. यातून त्यांनी संपूर्ण शहराचे नियोजन केले. आज नवीन मुंबई एक नियोजनबध्द शहर म्हणून आपल्या डोळ्यापुढे दिसते त्यामागचेे शिल्पकार हे प्रामुख्याने कोरिया हेच होते. त्यानंतर या नवी मुंबईच्या कुशीत सृष्टी सौंदर्याच्या वातावरणात कलाकारांनी राहावे व त्यांच्यांसाठी एक कलात्मक साजेशी वसाहत उभी राहावी अशी योजना आली. कलाकारांची ही नगरी उभारण्याचे कामही कोरिया यांनी केले. पुढे कालांतराने या नगरीचे देखणेपण टिकविण्यात आपल्याला अपयश आले. अर्थात तो दोष काही कोरिया यांचा नव्हता. मुंबईतील गिरण्या बंद झाल्यावर तेथे जवळपास ६०० एकर जमीन उपलब्ध होणार होती. ही जागा चांगल्या कामी लागावी असे कोरिया यांना मनोमन वाटे. त्यासाठी त्यांनी या जमिनीचे तीन वाटे केले, त्यातील पहिला वाटा गिरणी मालकांना, दुसरा वाटा मोकळा ठेवणे व तिसरा वाटा गिरणी कामगारांसाठी व नागरिकांसाठी स्वस्त घरे तयार करावीत अशी त्यांची योजना होती. मात्र ही योजना प्रत्यक्षात कधीच उतरली नाही व ही जागा गिरणी मालकांनी पूर्णपणे गिळंकृत करुन तेथे श्रीमंतांना परवडतील अशा फ्लॅटचे टॉवर उभारले. कोरिया यांची ही योजना जर सरकारने मान्य केली असती तर गिरण्यांच्या जमिनीवर वेगळे चित्र निर्माण झाले असते. शहरीकरण होत असताना पर्यावरणदेखील जपले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. आपली वास्तुशास्त्राची कला त्यांनी त्याकामी लावली. केवळ इमारती उभारल्या नाहीत, तर त्या इमारतीतील सौंदर्य कसे खुलेल ते पाहिले. दक्षिण मुंबईतील कांचनगंगा ही इमारत त्याचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. मुंबईतील अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा होता. ब्रिटनच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट या संस्थेने त्यांना सुवर्णपदकही प्रदान केले होते. कोरिआ यांनी अहमदाबादमधील गांधी स्मारक अवघ्या २८ व्या वर्षी उभारले. स्थानिक वातावरणाशी पूरक आणि ओपन टू स्काय हे त्यांच्या रचनेचे आणखी एक वैशिष्ट्‌य. आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद मध्ये १९३० मध्ये चार्ल्स कोरिआ यांचा जन्म झाला. मुंबईतील सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयानंतर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून पदवी मिळवली. भारतात ते जन्मले असले तरी त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र हे जग राहिले. आज जगातील अनेक देशात त्यांच्या वास्तुशास्त्राचे नमुने दिमाखात उभे आहेत. दुदैवाची बाब म्हणजे या कलाकाराचा आपल्या देशातील मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, त्यांनी पुरेसा उपयोग करुन घेतला नाही. धारावी हा आपल्या देशाला लागलेला झोपडपट्टीचा एक कलंक आहे. मात्र ही झोपडपट्टी आपल्याकडील जीवनातील एक वास्तवही आहे. परंतु ही झोपडपट्टी आपल्या देशाच्या नकाशातून फुसली जावी व तेथील लोकांचे पुर्नवसन तेथेच केले जावे अशी योजना त्यांनी आखली होती. तेथील नागरिक त्याच ठिकाणी राहातील व तेथील लहान मोठे उद्योग तेथेच राहून आपले अस्तित्व टिकवतील अशी योजना त्यांनी आखली खरी परंतु ही योजना सरकारी लाल फितीत अडकली त्यएाला आता एक दशक ओलांडले. सरकारने धारावीच्या पुर्नवसनाची सर्वमान्य अशी योजना कोरिया यांना हाताशी घेऊन तयार केली असती तर ती एवढ्यात पूर्णत्वाला गेली असती. पण तसे झाले नाही. कोरिया यांनी देशाच वास्तुशास्त्राची अनेक कामे केली. परंतु सरकारने इच्छाशक्ती दाखविली असती तर याहून काही चांगले या महान माणसाच्या हातून घडले असते, याचे वाईट वाटते.
-----------------------------------------------------

0 Response to "नगरांचा शिल्पकार "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel