-->
पावसाचा रुद्रावतार

पावसाचा रुद्रावतार

संपादकीय पान शनिवार दि. २० जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पावसाचा रुद्रावतार
गेले तीन महिने आंगाची लाही-लाही होऊन घामाच्या धारा वाहत असताना वरुणराजाची बळीराजापासून ते सर्वच जण आतुरतेने वाट पहात होते. यंदा पावसाळा सरासरीपेक्षा कमीच पडण्याचा वेधशाळेचा अंदाज व्यक्त झाल्याने एक प्रकारची चिंता सर्वत्र पसरली असताना जूनच्या दुसर्‍या आठवड्यात मुंबईसह कोकणपट्‌ट्यात पावसाचे आगमन झाले. खरे तर यंदा पावसाळा लवकर असल्याच्या बातम्या होत्या. परंतु हे सर्व अंदाज खोटे ठरले आणि पहिला पाऊस पडताच कोकणपट्टीतील शेतकर्‍यांनी तांदळाच्या राबाची सुरुवात केली. तांदळाचे राब वर आले असताना गुरुवारपासून आकाश फाटल्यासारखा पाऊस सुरु झाला आणि पुन्हा एकदा चिंतेचा विषय झाला. कारण सध्या पडलेला हा धुवाधार पाऊस राबासाठी फायदेशीर नाही. सध्याचा हा पाऊस भात शेतीला मारक ठरु शकतो. त्यामुळे यंदा शेतकर्‍याचे प्रामुख्याने कोकणातील शेतकर्‍यांचे हाल काही संपणार नाहीत असेच दिसते. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या या पावसामुळे केवळ अलिबागच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हाच पाणीमय झाला आहे. अलिबागमध्ये काही सखल भागात नदी झाल्यासारखी स्थिती होती. त्याचबरोबर रात्रीपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन शुक्रवारी सकाळी ठप्प झाले. शहरात विविध ठिकाणी पाणी साचल्याने त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईची लाईफलाईन असणार्‍या लोकलच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गावर ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा  ठप्प झाली. प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने तीनही मार्गावरील सेवा काही काळ बंद ठेवली. रेल्वेसेवा कोलमडल्याने बेस्टतर्फे जादा अडीचशे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतु त्यामुळे मुंबईचा आवाका पाहता जनजीवन सुरळीत होण्यास त्याने काही मदत झाली नाही. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच घराबाहेर पडावे असा इशारा सरकारतर्फे देण्यात आला. एकूणच पावसामुळे मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली आणि ही आपल्या देशासाठी शरमेची बाब ठरावी. मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचे आवाहन केलेे. महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी बृहन्मुंबईतील सर्व महापालिका आणि खासगी शाळा आज बंद ठेवण्याचे आवाहन केले. खरे तर अशा प्रकारची परिस्थीती उद्दभवतेच का, याबाबतच्या नियोजनाचा का बोजवार्‍या वाजतो, याचा विचार कोणच करताना दिसत नाही. मराठी माणसांच्या अस्मितेच्या गप्पा करणार्‍या शिवसेनेची सत्ता मुंबई माहनगरपालिकेत किमान दोन दशकांहून जास्त काळ आहे. असे असूनही शिवसेने मुंबईच्या विकासाचा ठोस प्लान तयार केला नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. सध्या समुद्रात तुफान आले असून समुद्राच्या लाटाही उंच उंच येत आहेत. अर्थात हा इशारा ७२ तासांसाठी देण्यात आला असून येत्या दिवसात जोर कमी झाल्यास ही परिस्थिती निवळेल. त्यामुळे २००६ सालच्या आलेल्या महापुराची स्थिती सध्यातरी दिसत नाहीत. त्यामुळे फार मोठ्या चिंतेची बाब नसली तरीही आपल्याकडे आपतकाही परिस्थीती हाताळण्यास किती अकार्यक्षम आहोत त्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले आहे. किंबहुना आपल्याकडे आपतकालीन परिस्थीती हाताळण्यासाठीची यंत्रणा अस्तित्वातच नाही असे दिसते. २००६ सालच्या पावसानंतर मुंबईसह कोकणात कोणतीही आपतकालीन परिस्थिती उद्भभवल्यास त्यावर उपाय करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे ठरले होते. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस पावले पडली नएाहीत. मुंबईसारखी महानगरी त्यावेळी तीन दिवस पाण्याखाली होती, संपूर्ण जनजीवन ठप्प झाल्याची स्थिती होती. एवढेच काय सर्व सरकारी यंत्रणा हतबल झाल्यासारखी हे सर्व पहात होती. अर्थात अशी आपतकालीन परिस्थीती गेल्या शंभर वर्षातून पहिल्यांदाच उद्भवली होती. असे असले तरीही प्रत्येक समस्येवर उत्तर हे असलडेच पाहिजे. मागच्या अनुभवातून आपण शिकून तयार व्हायला पाहिजे. २००६ सालच्या महापुरानंतर मुंबईत पूर आल्यास पाण्याचा निचरा होण्यासाठी यंत्रणा उभारण्याची योजना तयार करण्याचे ठरले. मात्र हे सर्व कागदावरच झाले. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. यातील काही योजना जर प्रत्यक्षात उतरल्या असत्या तर आज मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे तसे झाले नसते. आपल्याकडे शहरीकरण झपाट्याने होत आहे. मात्र हे नागरीकरण होत असताना शहरांची वाढ ही नियोजनध्द होत नाही. सांडपाण्याची सोय, शुध्द पाण्याची सोय, रस्ते, त्याच्या बाजूला गटारे यांची उभारणी करुन शहरांची रचना झाली पाहिजे. मात्र तसे न झाल्याने जरा मोठा पाऊस पडला की पुरासारखी स्थिती लहान-मोठ्या शहरात उध्दभवते. पूर हा नैसर्गिक असला तरीही त्यावर आपण मात करु शकतो. माणसाने संशोधनाच्या बळावर अनेक आपत्तीवर आजवर मात केली आहे. त्यामुळे पूरावरही आपण सहजरित्या मात करु शकतो. मात्र त्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. परंतु यापूर्वीच्या व आत्ताच्याही राज्यकर्त्यांकडून कोणतेही ठोस निर्णय घेऊन आपत्ती आल्यास त्याचे नियोजन कसे करावयाचे याबाबत निर्णय होत नाहीत. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रातील व राज्यातील सरकार सत्तेत आल्यावर काही तरी नवीन करुन दाखवेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीच घडलेले नाही असेच दिसते.
-----------------------------------------------------------  

0 Response to "पावसाचा रुद्रावतार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel